दत्त इंडियाकडून उद्या होणार​ "वसंतदादा' चा हंगाम सुरू 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 ऑक्टोबर 2017

सांगली - येथील वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या गव्हाणीत उद्या (ता. 30) श्री दत्त इंडिया कंपनीकडून पहिली मोळी टाकली जाणार आहे. हा केवळ गळीत हंगामाचा प्रारंभ नाही, तर या कारखान्यावर विसंबून असलेल्या हजारोंच्या गाळात रुतलेल्या गाडीला धक्का मिळणार आहे.

सांगली - येथील वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या गव्हाणीत उद्या (ता. 30) श्री दत्त इंडिया कंपनीकडून पहिली मोळी टाकली जाणार आहे. हा केवळ गळीत हंगामाचा प्रारंभ नाही, तर या कारखान्यावर विसंबून असलेल्या हजारोंच्या गाळात रुतलेल्या गाडीला धक्का मिळणार आहे.

जिल्ह्यात साखर उद्योगाची गती वाढेलच, शिवाय वाढत्या ऊस क्षेत्रालाही आधार मिळणार आहे. यंदा कारखाना किती गाळप करतो, त्याची बिले कशी अदा केली जातात, याकडे विशेष लक्ष असेल. 

सकाळी 10 वाजता मोळी टाकली जाईल. कारखान्याकडे तब्बल 40 हजार एकर उसाची नोंद झालीय. सगळा नोंद ऊस कारखान्याकडे आला तरी प्रतिएकर 40 टन या जिल्ह्याच्या सरासरीनुसार 16 लाख टन होतो. इतका मोठा आकडा गाठण्याची कारखान्याची क्षमता नसली तरी हक्काच्या उसाची खात्री आहे. तोडणीसाठी टोळ्या दाखल झाल्या आहेत. साडेतीन हजार कामगारांच्या लसीकरणाचीही सोय केली आहे. एकूणच "वसंतदादा' च्या कार्यस्थळावर लगबग सुरु आहे. बैलगाड्या, ट्रॅक्‍टरची रेलचेल दिसतेय. स्लीप बॉय धावपळ करीत आहेत. 

"वसंतदादा' कारखाना श्री दत्त इंडियाने दहा वर्षांसाठी भाडेकरारावर चालवण्यास घेतला आहे. सन 2000 पासून सातत्याने कारखान्याने अडचणींचा सामना केला. तो विकावा लागेल, इथपर्यंत संकट होते. जिल्हा बॅंकेने हात दिला. अध्यक्ष दिलीप पाटील यांनी राजकीय फायद्या-तोट्याचा मुद्दा बाजूला ठेवून हात दिला. शेतकरी संघटनांचे काही आक्षेप असले तरी गाळात रुतलेली गाडी वर येण्यासाठी पहिला धक्का बसला. कामगारांच्या बंद चुली पुन्हा पेटल्या. मुलांचे शिक्षण, मुलींचे लग्न अशा समस्यांना तोंड देत इथला कामगार पुरता घाईला आला. 

एफआरपी कमी, पण दर जास्तच 

"वसंतदादा' ची गेल्या आठ-दहा वर्षांतील कामगिरी अतिशय खराब राहिली. बराच काळ कारखाना बंदच राहिला. जो काही चालला त्यातून शेतकऱ्यांची डोकेदुखीच जास्त वाढवून ठेवली. कारखान्याचा सरासरी उताराही कमी राहिला. एफआरपी इतर कारखान्यांच्या तुलनेत कमी आहे. श्री दत्त इंडियाकडून मात्र जुन्या एफआरपीनुसार दर दिला जाणार नसून स्पर्धात्मक दराची घोषणा त्यांनी केली आहे. ही शेतकऱ्यांसाठी जमेची बाजू आहे. 

Web Title: Sangli News Vasantdada sugar factory season starts