विजय शिंदे : ‘महाराष्ट्र केसरी’चे स्वप्न राहिले अधुरे

संतोष कणसे
रविवार, 14 जानेवारी 2018

कडेगाव - ‘‘मी रात्री मुक्कामाला घरी येणार आहे. मला न्यायला स्टॅंडवर ये,’’ विजयचा रात्री दहाला फोन आला होता. त्याचा भाऊ रात्री दहाच्या सुमारास रामापूरच्या स्टॅंडवर जाऊन थांबला होता, पण विजय काही आला नाही. त्याच्या मित्राचा फोन आला, किरकोळ अपघात झालाय, आम्ही दवाखान्यात निघालोय... अन्‌ सकाळी बातमी येऊन धडकली विजय गेलाय...

कडेगाव - ‘‘मी रात्री मुक्कामाला घरी येणार आहे. मला न्यायला स्टॅंडवर ये,’’ विजयचा रात्री दहाला फोन आला होता. त्याचा भाऊ रात्री दहाच्या सुमारास रामापूरच्या स्टॅंडवर जाऊन थांबला होता, पण विजय काही आला नाही. त्याच्या मित्राचा फोन आला, किरकोळ अपघात झालाय, आम्ही दवाखान्यात निघालोय... अन्‌ सकाळी बातमी येऊन धडकली विजय गेलाय...

विजय शिंदे अपघातात गेला... बातमी येऊन धडकली आणि रामापूर गाव सुन्न झाले. आज भोगी... सणाचा वार... पण, या गावावर शोककळा पसरली. कुणाच्या तरी सुखाने चूल पेटली नाही. कारण, एक मल्ल घडवायला एक कुटुंब काय कष्ट करते, हे गाव जाणते. त्यामुळे विजय गेला म्हणजे आपल्या घरचा माणूस गेला ही  भावना गावात आहे. त्याला महाराष्ट्र केसरी बनवायचे स्वप्न वडिलांनी पाहिले होते... त्यांचे स्वप्न त्याला  स्वस्थ बसू देत नव्हते. तो त्याच्या मागे धावत होता,  मात्र त्याच्यावर काळाने झडप घातली अन्‌ ते स्वप्न  अधुरे राहिले. 

विजय शिवाजी शिंदे (वय २३) या मल्लाचा अपघाती मृत्यू झाला. सकाळी साडेआठ वाजता मृतदेह गावात आणला. त्याच्या आई-वडिलासह भाऊ, बहीण व नातेवाईकांनी हंबरडा फोडला. त्यांचा आक्रोश हेलावून सोडणारा होता. विजयचे आजोबा नारायण शिंदे नामांकित मल्ल होते. आजोबांप्रमाणे कुस्तीत नाव कमवायचे,  असा त्याने बालवयातच ठरवले होते.

लहानपणापासून त्याला कुस्तीची आवड. गेल्या सहा वर्षांपासून कोल्हापूर येथील मोतीबाग तालमीत धडे घेत होता. सहा वर्षांत त्याने अनेक मैदाने गाजवली. रामापुरातील तमाम  लोकांना त्याचे भारी कौतुक होते. गेल्या  आठवड्यापासून तो कुंडल येथील क्रांती तालीम मंडळामध्ये दाखल झाला होता. त्याचे वडील शिवाजी शिंदे शेतकरी. त्यांनी कुस्तीप्रेम जपले. विजयला नेहमी प्रोत्साहन दिले. पिळदार शरीरयष्टी असलेला विजय एम.ए.च्या पहिल्या वर्षात शिकत होता.

औंध येथे कुस्ती मैदान गाजवून सहकाऱ्यांसोबत जीपमधून परतत असताना जीप कडेपूर येथे आल्यानंतर त्याने आपला बंधू अजय याला रात्री दहाच्या सुमारास फोन केला. ‘‘मी घरी मुक्कामाला येणार आहे. तू मोटारसायकल घेऊन रामापूरच्या बस स्टॅंडवर ये,’’ असा निरोप देला. अजय आपल्या भावाची बस स्टॅंडवर वाट पाहात होता. बराच वेळ झाला तरी तो आला नाही. तो वांगीच्या दिशेने येणाऱ्या प्रत्येक वाहनाकडे टक लावून बसला असता अचानक त्याला फोनवरून विजयच्या सहकारी मल्लाचा फोन आला. विजयला किरकोळ अपघात झाल्याचे सांगितले. ‘तुम्ही काळजी करू नका घरी जा, आम्ही दवाखान्यात जातो’, असे सांगितले गेले. अजयला ते खरे वाटले. तो घरी आला. आज सकाळी दुर्दैवी घटनेची माहिती मिळाली. विजय घरी आलाच  नाही. 
 

Web Title: Sangli News Vijay Shide no more