मलेशियातून परतलेल्या चौघांचा लवकरच जबाब

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 फेब्रुवारी 2018

सांगली - एजंटांकडून फसवणूक झाल्याने ‘वर्किंग’ व्हिसा नसल्यामुळे मलेशियात शिक्षा झालेले चारही मराठी तरुण प्रजासत्ताकदिनी आपापल्या गावी परतले. मलेशियातून सुटका झाल्यानंतर ते हैदराबादला विमानाने परत आले होते. तेथून चौघेही आपापल्या गावी परतले. याप्रकरणी सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद नोंद असल्याने चौघांना जबाबासाठी लवकरच बोलवण्यात येणार आहे.

सांगली - एजंटांकडून फसवणूक झाल्याने ‘वर्किंग’ व्हिसा नसल्यामुळे मलेशियात शिक्षा झालेले चारही मराठी तरुण प्रजासत्ताकदिनी आपापल्या गावी परतले. मलेशियातून सुटका झाल्यानंतर ते हैदराबादला विमानाने परत आले होते. तेथून चौघेही आपापल्या गावी परतले. याप्रकरणी सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद नोंद असल्याने चौघांना जबाबासाठी लवकरच बोलवण्यात येणार आहे.

कराड येथील एका हॉटेल मॅनेजमेंट महाविद्यालयात हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स घेतलेल्या गुरुनाथ इराण्णा कुंभार (शिरवळ, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर), मोहन शिंदे (बेलवंडी, ता. कर्जत, जि. नगर), दीपक लिंबाजी माने (व्हन्नूर, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) आणि समाधान धनगर (जळगाव) या चार तरुणांना सांगलीतील पोलिस पुत्र कौस्तुभ पवार आणि त्याचा साथीदार धीरज पाटील या दोघांनी या तरुणांना मलेशियात हॉटेलमध्ये मॅनेजर म्हणून नोकरी लावण्याचे आमिष दाखवले होते. त्यानंतर त्यांच्याकडून प्रत्येकी दीड लाख रुपये घेऊन त्यांना मलेशियात ‘वर्किंग व्हिसा’ न देता, ‘ट्रॅव्हल व्हिसा’वर पाठवले. तेथे त्यांना हॉटेलात फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये वेटरची 
नोकरी मिळाली.

दरम्यान, या तरुणांना दिलेल्या ट्रॅव्हल व्हीसाची मुदत संपली तरी वर्किंग व्हीसा त्यांना मिळाला नाही. त्यामुळे व्हीसा नसताना देशात रहात असल्यामुळे गुरुनाथ कुंभार, मोहन शिंदे, दीपक माने आणि समाधान धनगर यांना मलेशियात अटक झाली. न्यायालयाने त्यांना तीन महिन्यांची शिक्षा सुनावली. 
मात्र काही कालावधी पूर्वीच तुरुंगात काढला असल्यामुळे त्यांची १२ जानेवारीला सुटका झाली. त्यानंतर त्यांना पुढील कार्यवाही होईपर्यंत बुकीट जेलच्या इमिग्रेशन कॅम्पमध्ये ठेवण्यात आले.

दरम्यान या तरुणांच्या परतीची फाईल तयार करण्यात आली आणि विमानाची तिकिटेही गुरुनाथ कुंभारचे नातेवाईक नामदेव कुंभार यांनी काढली. हे चौघेही तरुण ता. २५ जानेवारीस 
मलेशियाहून मध्यरात्री हैदराबाद येथे पोचले. नामदेव कुंभार यांनी चौघांनाही घेऊन ता. २६ रोजी सकाळी अक्कलकोट येथे आणले. तेथून दुपारी शिंदे, माने आणि धनगर हे तिघे आपापल्या गावी परतले.

दरम्यान, या फसवणूक प्रकरणी गुरुनाथ कुंभारचे नातेवाईक नामदेव कुंभार यांनी सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानंतर कौस्तुभ पवार आणि धीरज पाटील यांना अटक करण्यात आली. आता फसवणूक झालेले चारही तरुण परत आल्याने त्यांना लवकरच जबाबासाठी बोलवण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: Sangli News visa Fraud issue