करारानंतर शेतकरी, कामगारांची देणी - विशाल पाटील

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 मे 2017

सांगली - वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना भाडेकरारावर चालवण्यास देण्याचा ठराव विशेष सर्वसाधारण सभेत सभासदांनी एकमताने मान्यता दिली. कारखाना चालवण्यास देण्यासाठी लवकरच करार होईल.

त्यानंतर आठ दिवसांत शेतकरी आणि कामगारांची देणी देणार आहे. नवीन कंपनीतर्फे यापुढे कारखाना चालू राहील. चांगला दरही मिळेल. कारखाना भाडेतत्त्वावर चालवायला देण्यातील अडथळे आणणाऱ्या विरोधकांचे प्रयत्न हाणून पाडू, असा इशारा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांनी सभेत बोलताना दिला. सभासदांनी या निर्णयाचे स्वागतच केले. 

सांगली - वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना भाडेकरारावर चालवण्यास देण्याचा ठराव विशेष सर्वसाधारण सभेत सभासदांनी एकमताने मान्यता दिली. कारखाना चालवण्यास देण्यासाठी लवकरच करार होईल.

त्यानंतर आठ दिवसांत शेतकरी आणि कामगारांची देणी देणार आहे. नवीन कंपनीतर्फे यापुढे कारखाना चालू राहील. चांगला दरही मिळेल. कारखाना भाडेतत्त्वावर चालवायला देण्यातील अडथळे आणणाऱ्या विरोधकांचे प्रयत्न हाणून पाडू, असा इशारा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांनी सभेत बोलताना दिला. सभासदांनी या निर्णयाचे स्वागतच केले. 

वसंत बझारच्या सभागृहात कारखाना सभासदांची विशेष सर्वसाधारण सभा झाली. अध्यक्षस्थानी विशाल पाटील होते. विशाल पाटील यांनी कारखाना चालवायला देण्याचा ठराव मांडल्यानंतर उपस्थित सभासदांनी एकमताने मंजुरी दिली. उपाध्यक्ष अमित पाटील, बाळगोंडा पाटील, डी. के. पाटील, शिवाजी पाटील, महावीर पाटील, विक्रमसिंह सावर्डेकर, रणजितसिंह सावर्डेकर, अण्णासाहेब कोरे, प्रकाश कांबळे, राजेश ऐडके, जिनेश्वर पाटील, महावीर पाटील, अण्णासाहेब पाटील, संपतराव माने, माजी सभापती सदाशिव खाडे, कार्यकारी संचालक संजय पाटील प्रमुख उपस्थित होती.

अध्यक्ष श्री. पाटील म्हणाले, ‘‘गेल्या काही सर्वसाधारण सभांतील सभासदांच्या मागणीनुसारच भाडेतत्त्वाचा निर्णय घेतोय. जिल्हा बॅंकेची निविदा प्रक्रिया सुरू झाल्यानंतर अनेकांनी त्यामध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न केला. कुणाच्या तरी सांगण्यावरून शेतकरी संघटनेचे संजय कोले, सुनील फराटे आदींनी भाडेकरारात खोडा घालण्यासाठीच उच्च न्यायालय गाठले. कारखान्याच्या हितासाठी न्यायालयात गेलेल्यातील पाचपैकी चोघे सभासदच नाहीत. त्यांनी गेल्या १० वर्षांत कारखान्याला ऊस घातला नाही. आम्ही त्यांना दहा वेळा चर्चेला बोलावले. पण त्यांनी रस दाखवला नाही. न्यायालयात जाण्यासाठी कुणी पैसे दिले आहेत, हे आम्हाला समजलेय. कितीही खोड्यांचा प्रयत्न झाला तरी तो अयशस्वी होईल. कारखाना सुरू होईल अन्‌ विरोधकांचे प्रयत्न हाणून पाडले जातील.’’

ते म्हणाले, ‘‘जिल्हा बॅंकेने कारखाना ताब्यात घेऊन भाडेपट्ट्याने चालवायला देण्याची प्रक्रिया सुरू केल्यानंतर निविदेला चांगला प्रतिसाद मिळाला. मुंबईच्या दत्त इंडिया कंपनीने प्रतिटनाला २६१ रुपयांची राज्यात नव्हे देशात उच्चांकी भाडे दिले. नियमाप्रमाणे करार करून देणी दिली जातील. भाडेकरारात त्याबाबत अट घालण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने कंपनी आणि बॅंक अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. कंपनीकडून उत्पादकांची बिले बुडणार नाहीत, याबाबतची दक्षता घेतली जाईल. चंद्रशेखर बुटाले यांनी कारखाना भाड्याने देण्याच्या निर्णयाबद्दल अभिनंदनाचा ठराव मांडला.

शेतकरी, कामगारांचे पैसे वेळेवर मिळतील, कारखाना सभासदांचा राहील याची दक्षता घेऊन कराराचा सल्ला त्यांनी दिला. अनिल पाटीलांनी सभासदांना वर्षाला साखरेची मागणी मांडली. संचालकांनी सभासदांना ओळखपत्र देणे, शेअर भांडवल सुरक्षित ठेवावे, अशी विनंती केली. दिनकर साळुंखेंनी शेतकऱ्यांची देणी व्याजासह द्या, सर्व उपप्रकल्प चालवा, असे सुचवले. 

कामगार नेते प्रदीप शिंदे म्हणाले की, कामगार संघटना नोंदणीकृत आहे. संबंधित कंपनीने संघटनेशी स्वतंत्र कामगार करार करावा. प्रभाकर पाटीलांनी सभेचे इतिवृत्त तत्काळ लिहा, तासगावप्रमाणे अवस्था नको, ऊस घालणाऱ्या शेतकऱ्यांना संबंधित कंपनीने तत्काळ पैसे द्यावेत, अशी अट घालण्यास सांगितले. राजेंद्र माळी यांनी कारखान्याच्या पाणी योजना चालवण्यास देण्याची विनंती केली. गुंडा माळी, महादेव मोहिते, मीनाक्षी पाटील, आनंदा शेळके, बाळासाहेब चौगुले, भूपाल खोत, तुकाराम पवार, अनिल शिंदे, एकनाथ कदम, बाळासाहेब पाटील आदींनी मते मांडली.

कंपनीशी संवादासाठी डी. के. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती
कंपनीच्या संवाद साधण्यासाठी समिती नियुक्त केली जाईल. त्यामध्ये माजी उपाध्यक्ष डी. के. पाटील, लेखापरीक्षकांचा समावेश असेल. अडचणी येणार नाहीत. दारूबंदीचा विषय गाजतो आहे. यामुळे डिस्टीलरीला निविदेत जादा रक्कम मिळाली नाही. मात्र डिस्टीलरीसाठी पुन्हा निविदा काढली जाणार आहे. सभेत कारखाना चांगला सुरू राहण्यासाठी सभासदांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले.

दत्त इंडियाशी माझा संबंध नाही - पाटील 
वसंतदादा कारखाना भाडेतत्त्वावर मुंबईच्या  श्री दत्त इंडिया कंपनीने चालवायला घेतला. दत्त इंडिया कंपनीत विशाल पाटील यांची भागीदारी असल्याची चर्चा रंगली होती. दत्त इंडियाचे मालक देशातील सर्वांत मोठा साखर व्यापारी आहेत. याबाबत अध्यक्ष श्री. पाटील म्हणाले,‘‘साखर व्यवसायाशी निगडित अनेक व्यवसाय असून या कंपनीशी माझा, माझ्या कुटुंबीयांचा तसेच आमच्या पै-पाहुण्यांचा कोणताही संबंध नाही.’’

Web Title: sangli news vishal patil talking