शस्त्रतस्करांना मोका लावणार - विश्‍वास नांगरे-पाटील

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 ऑक्टोबर 2017

सांगली - सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने मध्य प्रदेशातून अवैध अग्निशस्त्रांची तस्करी करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश केला आहे. त्यांच्याकडून पिस्तूल, गावठी कट्टे आणि रिव्हॉल्व्हर अशी एकूण २६ अग्निशस्त्रे आणि ६४ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. या प्रकरणी सांगलीतील दोघे, मध्य प्रदेशातील एक आणि नागठाणे (ता. कऱ्हाड) येथील एक असे चार आरोपी आहेत. 

सांगली - सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने मध्य प्रदेशातून अवैध अग्निशस्त्रांची तस्करी करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश केला आहे. त्यांच्याकडून पिस्तूल, गावठी कट्टे आणि रिव्हॉल्व्हर अशी एकूण २६ अग्निशस्त्रे आणि ६४ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. या प्रकरणी सांगलीतील दोघे, मध्य प्रदेशातील एक आणि नागठाणे (ता. कऱ्हाड) येथील एक असे चार आरोपी आहेत. शस्त्र तस्करी करणाऱ्या टोळीला मोका लावणार असून सापडलेली शस्त्रे म्हणजे हिमनगाचे टोक आहे. त्याच्या मुळापर्यंत जाऊन तपास करण्यात येईल, अशी माहिती विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी दिली.

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने आठवडाभरात शस्त्र तस्करी करणाऱ्या आंतरराज्य टोळीस जेरबंद केले. मध्यप्रदेशातील धार जिल्ह्यात लालबाग येथे देशी बनावटीच्या अवैध शस्त्र निर्मितीच्या एका कारखान्यावर छापा घातला. याची माहिती कोल्हापूर पोलिस परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिली. या वेळी पोलिस अधीक्षक  दत्तात्रय शिंदे, अप्पर अधीक्षक शशिकांत बोराटे,  स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक राजन माने उपस्थित होते.   

ते म्हणाले,‘‘सांगलीत हॉटेल जय मल्हारसमोर सातारा जिल्ह्यातील सनीदेव खरात आणि संतोष कुंभार या युवकांना अटक करून त्यांच्याकडून सात देशी  बनावटीची पिस्तुले आणि २७ जिवंत काडतुसे जप्त केली होती. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीवरून स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने मध्य प्रदेशात जाऊन मोठी कामगिरी केली आहे.

तेथे धार जिल्ह्यातील धामनोद येथे फिरत असताना प्रतापसिंग बहादूरसिंग भाटिया याला ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सहा देशी बनावटीची पिस्तुले घटनास्थळीच ताब्यात घेतली. त्याच्या घरातच अग्निशस्त्रे बनवण्याची फॅक्‍टरी असल्याचे त्याने सांगितले. तेथून एक रिव्हॉल्व्हर, एक पिस्तूल, आठ गावठी कट्टे आणि २७ जिवंत काडतुसे  जप्त केली. शस्त्र बनवण्याचे साहित्यही त्याच्या घरातून  जप्त करण्यात आले आहे. भाटियाने पोलिस कोठडीत असताना दिलेल्या माहितीवरून नागठाणे (ता. कऱ्हाड, जि. सातारा) येथील अजमीर अकबर मुल्ला या एजंटाला ताब्यात घेतले. त्याच्याकडून दोन पिस्तूल, रिव्हॉल्व्हर आणि दहा जिवंत काडतुसे जप्त केली.’’
विश्‍वास नांगरे-पाटील म्हणाले,‘‘या गुन्ह्यात बेकायदा  शस्त्र निर्मिती व विक्री केल्याचे निष्पन्न झाल्याने आर्म ॲक्‍ट कलम ५ व २९ ही वाढीव कलमे लावले आहेत. कारवाईत एकूण १६ पिस्तूल, दोन रिव्हॉल्व्हर, आठ गावठी कट्टे आणि ६४ जिवंत काडतुसे तसेच शस्त्रे निर्मितीचे साहित्य असा ९ लाख ९३ हजार ०७५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.’’

पथकाला २६ हजारांचे बक्षीस
स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रवीण शिंदे, अशोक डगळे, अझहर पिरजादे, सचिन कनप, राहुल जाधव, सूर्यकांत सावंत, सागर पाटील, अमित परीट, सुनील लोखंडे, विकास भोसले, जितेंद्र जाधव, मारुती साळुंखे, संदीप पाटील, उदय साळुंखे, किशोर काबुगडे, अरुण सोकटे, महिला पोलिस सुरेखा कुंभार, स्नेहल पाटील सहभागी झाले होते. या पथकाने २६ शस्त्रे पकडल्याने त्यांना २६ हजारांचे बक्षीस श्री. नांगरे-पाटील यांनी जाहीर केले. 

हे तर हिमनगाचे टोक
विश्‍वास नांगरे-पाटील म्हणाले,‘‘सापडलेली अग्निशस्त्रे हे हिमनगाचे एक टोक आहे. त्याच्या मुळाशी जाऊन  सखोल तपास करू. यामागे मोठी टोळी असून शकते. सध्या चार आरोपी सापडले आहेत. हा संघटित गुन्हेगारीचा प्रकार आहे. आरोपी भाटियावर इंदोर, धामनोंद येथे गुन्हे नोंद आहेत. तर अजमीर मुल्लावर कऱ्हाड, सातारा, इस्लामपूर, ठाणे या ठिकाणी गुन्हे नोंद आहेत. त्यामुळे या टोळीवर मोका कायद्याखाली कारवाई करणार.’’

 

Web Title: Sangli News Vishwas Nangare Patil Press