तक्रार टाळाल, तर वेतनवाढ रोखू - नांगरे-पाटील

घनश्‍याम नवाथे
रविवार, 16 जुलै 2017

सांगली - ‘शहाण्याने पोलिस ठाण्याची पायरी चढू नये,’ असे अनेकदा म्हटले जाते; कारण अनुभवच तसा येतो. तक्रार देण्यासाठी गेल्यानंतर अनेकदा ठाणे अंमलदाराची बोलणी खावी लागतात. ‘तक्रार नको... चला परत’ असा निर्णय घेतला जातो. ठाण्यात ‘सौजन्याची ऐसी की तैसी’ असाच अनुभव येतो. त्यामुळे तक्रारदारांच्या हक्कावरच गदा येते. 

सांगली - ‘शहाण्याने पोलिस ठाण्याची पायरी चढू नये,’ असे अनेकदा म्हटले जाते; कारण अनुभवच तसा येतो. तक्रार देण्यासाठी गेल्यानंतर अनेकदा ठाणे अंमलदाराची बोलणी खावी लागतात. ‘तक्रार नको... चला परत’ असा निर्णय घेतला जातो. ठाण्यात ‘सौजन्याची ऐसी की तैसी’ असाच अनुभव येतो. त्यामुळे तक्रारदारांच्या हक्कावरच गदा येते. 

अनेकदा तक्रार दिल्यानंतर गुन्ह्याचे स्वरूप कमी करण्याचा किंवा दडपण्याचा प्रयत्न होतो. विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी याबाबत गंभीर दखल घेत ‘डमी’ तक्रारदार पाठवून खात्री केली. तेव्हा काही ठाण्यांत असा अनुभव आला. संबंधित पोलिसांची वेतनवाढ रोखून त्यांना चांगलाच दणका दिला. त्यामुळे तक्रार घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या ठाणे अमलदारांनो सावधान...! म्हणण्याची वेळ आली आहे. तक्रार न घेतल्यास तुमच्यावरही कारवाई होऊ शकते.

पोलिस ठाण्यातील कामकाज, तेथील पोलिसांची भाषा यांमुळे अनेक समज-गैरसमज आहेत. प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो. ठाण्यात येणाऱ्या नागरिकांशी सौजन्याने वागण्याचे आदेश पोलिसांना यापूर्वी बऱ्याचदा दिले गेले आहेत. क्वचितच असे अनुभवायला येते. एखादी तक्रार देण्यास किंवा गुन्हा दाखल करण्यास गेल्यानंतर बहुतेकवेळा आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जाते. ‘मोबाईल बाजारात चोरीला गेला तर तुम्हाला काळजी घेता येत नाही काय?’ असे उत्तर मिळते. चोरीला गेला तरी बऱ्याचदा गुन्हा दाखल करण्यापेक्षा कच्च्या वहीत ‘गहाळ’ अशी नोंद केली जाते. तसेच दखलपात्र गुन्ह्यांचे स्वरूप कमी करून अदखलपात्र गुन्हे नोंदवले जातात. तपास करण्याची झंझट नको किंवा पोलिस ठाण्याचा ‘क्राईम रेट’ वाढू नये म्हणून हा खटाटोप केला जातो. अनेकदा गुन्हा दाखल करण्याऐवजी चौकशीवर बोळवण केली जाते.

ठाण्यात तक्रारीची दखल घेतली जात नसल्याबद्दलच्या अनेक तक्रारी आहेत. तक्रार दाखल करून घेण्यासाठीसुद्धा ओळखीच्या व्यक्तींना घेऊन जावे लागते किंवा बऱ्याचदा पोलिस ठाण्यात तक्रार घेतली नाही तर पोलिस अधीक्षकांपर्यंत धाव घ्यावी लागते. आंदोलनाचा इशारा द्यावा लागतो. तरच दखल घेतली जाते. तक्रारदारांचा अनुभव खरा की खोटा, याची खात्री करण्यासाठी विशेष पोलिस महानिरीक्षक नांगरे-पाटील यांनी काही दिवसांपूर्वी ‘डमी तक्रारदार’ तयार केले. परिक्षेत्रातील सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर ग्रामीण, पुणे ग्रामीण येथील काही पोलिस ठाण्यांत डमी तक्रारदार पाठवून खात्री केली. 

‘आयजीं’चा प्रयोग
श्री. नांगरे-पाटील यांनी परिक्षेत्रात ‘डमी’ तक्रारदार पाठवून खात्री केल्यानंतर काही ठिकाणी गुन्हा दडपण्याचे किंवा स्वरूप कमी करण्याचे प्रकार दिसून आले. या प्रकरणी संबंधितांवर वेतनवाढ रोखण्याची कारवाई केली. यापुढेही अधूनमधून असे प्रकार घडू शकतात. त्यामुळे ‘पुढच्यास ठेच मागचा शहाणा’ याप्रमाणे पोलिसांनी काम करण्याची गरज आहे.

अंमलदारांना राहावे लागेल सावधान
काही ठाण्यांत तक्रार व्यवस्थित नोंदवून घेतली; तर काही ठाण्यांत तक्रारीची दखल घेतलीच नाही. डमी तक्रारदारांकडून अहवाल मागवला गेला. ज्या ठाणे अंमलदारांनी गुन्ह्याचे स्वरूप कमी केले किंवा दडपण्याचा प्रकार केला, त्यांच्यावर कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत वेतनवाढ रोखली गेली. नागरिकांना सौजन्याची वागणूक आणि तक्रारीची दखल घेणे अपेक्षित असते. कसूर करणाऱ्या ठाणे अंमलदारांना सावधान राहावे लागेल.

Web Title: sangli news vishwas nangare patil talking