सांगलीत दोन वर्षांत 4000 मुले दृष्टिदोषाची शिकार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 मे 2018

शाळकरी मुलांना चष्मा लागण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामागे टीव्ही, मोबाईलचा वापर, अभ्यासाचा ताण अशी कारणे सांगून मुलांना त्याबद्दल दोष दिला जातो. वास्तविक, चष्मा लागण्यामागे अनुवंशिकता आणि जन्मजात डोळे कमकुवत असणे, ही प्रमुख कारणे असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. केवळ ग्रामीण भागातील मुलांचे आकडे थक्क करणारे आहेत. गेल्या दोन वर्षांत ४ हजार १७ मुला-मुलींना दृष्टिदोष आढळला असून त्यांना चष्मा देण्यात आला आहे. शहरी भागात हे प्रमाण अजूनच धक्कादायक आहे. 

ग्रामीण मुलांत प्रमाण वाढले
ग्रामीण भागातील मुलांत चष्मा लागण्याचे प्रमाण वाढत असल्याचे निरीक्षण सिव्हिल सर्जन डॉ. ए. व्ही. सोनटक्के यांनी ‘सकाळ’शी बोलताना नोंदवले. जिल्हा अंधत्व निवारण कार्यक्रमांतर्गत शाळांत जाऊन त्यांची तपासणी केली जाते. त्यातून दृष्टिदोष असणाऱ्या मुलांसाठी चष्मे दिले जातात. दरवर्षी दोनशेवर मुलांना चष्म्यांचे वाटप केले जाते. साधारण तीन लाखांपर्यंतचे अनुदान खर्च होते. हे प्रमाण वाढतेय, असेही त्यांनी स्पष्ट केले.  

अशी होते तपासणी
जिल्हा आरोग्य यंत्रणेमार्फत ग्रामीण भागात सरकारी, खासगी शाळांतील विद्यार्थ्यांच्या डोळ्यांची तपासणी केली जाते. दृष्टिदोष आढळणाऱ्या मुलांना चष्मा वाटप केले जाते. सन २०१६-१७ आणि २०१७-१८ या दोन  वर्षांत ४ हजार १७ विद्यार्थ्यांना चष्मा लागला. त्यापैकी २७५७ मुलांना चष्मे दिले आहेत. १३६१ मुलांना २७५ रुपये अनुदान आले आहे, तसेच एका स्वयंसेवी संस्थेने हे चष्मे जूनपर्यंत पाठवण्याचे कबूल केलेय. 

चष्मा लागण्यामागचे प्रमुख कारण अनुवंशिकता आहे. पण टीव्‍ही आणि मोबाईचा अतिवापर हे सुद्धा धोकादायक ठरू लागले आहे. पूर्वीपेक्षा आता चष्मा लागण्याचे प्रमाण जास्त दिसते, कारण जागरूकता आली आहे. मुलांच्‍या तक्रारीनंतर डॉक्‍टरांकडे जाऊन तपासणी केली जातेय. ही चांगली बाब आहे.
- डॉ. शशिकांत टेके, 

नेत्ररोग तज्ज्ञ, सांगली

डॉक्‍टर म्हणतात...

  •  फार जवळून जास्त वेळ टीव्ही पाहू नका.
  •  मोबाईलचा अतिरेकी वापर टाळाच.
  •  दिवसांतून भरपूर वेळा डोळे स्वच्छ धुवा.
  •  पालेभाज्यांचे प्रमाण वाढवा.
  •  वर्षातून एकदा तरी डोळे तपासाच.
  •  नंबर लपवून ठेवू नका, ते जास्त धोकादायक.
Web Title: Sangli news Vision defects to four thousand childs