वाळवा पंचायत समितीत अन्उपस्थित अधिकारी रडारवर

धर्मवीर पाटील
मंगळवार, 13 मार्च 2018

इस्लामपूर -  वाळवा तालुक्यातील ग्रामसेवक आणि पंचायत समिती सभेला दांडी मारणारे अधिकारी आज पुन्हा रडारवर आले. सभेत त्यांच्याविषयी संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. यावर ग्रामसेवकांची स्वतंत्र बैठक घेण्याचा निर्णय गटविकास अधिकाऱ्यांना जाहीर करावा लागला.

इस्लामपूर -  वाळवा तालुक्यातील ग्रामसेवक आणि पंचायत समिती सभेला दांडी मारणारे अधिकारी आज पुन्हा रडारवर आले. सभेत त्यांच्याविषयी संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. यावर ग्रामसेवकांची स्वतंत्र बैठक घेण्याचा निर्णय गटविकास अधिकाऱ्यांना जाहीर करावा लागला.

सभापती सचिन हुलवान, उपसभापती नेताजी पाटील, गटविकास अधिकारी राहुल गावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सभा झाली. ग्रामसेवक दाद देत नाहीत, कामावर नसतात अशी तक्रार राहुल महाडिक यांनी केली. अन्य सदस्यांनीही त्यांची री ओढली. त्यावर त्यांची स्वतंत्र बैठक घेऊन चर्चा करण्याचा निर्णय झाला. बैठकीला गैरहजर राहणाऱ्या ग्रामसेवकांवर कारवाई केली जाईल, असे राहुल गावडे यांनी स्पष्ट केले.

ठिबक अनुदान योजनेसाठी शेतकऱ्यांनी १५ मार्चपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन झाले. मरळनाथपुर येथील कृषी विभाग घोटाळा प्रकरण नेमके काय? अशी चौकशी शंकर चव्हाण यांनी केली. त्यावर चौकशी समिती नेमली असल्याचे सांगण्यात आले. या विषयावर विचारलेल्या प्रश्नांची योग्य व पुरेशी माहिती न मिळाल्याने राहुल महाडिक व चव्हाण यांनी माहिती घेऊनच बैठकीला येत चला असे सुनावले.

गावांच्या विकास आराखड्याचा मुद्दा आनंदराव पाटील यांनी उपस्थित केला. मात्र गावविकास आराखडयाविषयी पंचायत समिती सदस्यांना काहीच माहिती दिली जात नसल्याची तक्रार पाटील यांनी केली. बनेवाडी येथे शिक्षक नियुक्त करण्याची मागणी रुपाली सपाटे यांनी केली. विजय खरात यांनी मुलांच्या शिष्यवृत्तीचा विषय मांडला.

शिक्षण विभागाने विद्यार्थी संख्या वाढावी, यासाठी पालक भेटीसारखा उपक्रम राबविण्याची सूचना सदस्यांनी केली.  ग्रामीण रुग्णालयात का सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नाहीत? असा सवाल विजय खरात यांनी उपस्थित केला. आष्टा रुग्णालयात पदे रिक्त आहेत ती लवकर भरावीत, औषध पुरवठा देखील कमी असल्याच्या तक्रारी वसुधा दाभोळे यांनी केल्या. पेठ उपकेंद्राचे काम लवकर सुरू करण्याची मागणी केली. सभेत प्रकाश गुरव यांची विस्तार अधिकारी म्हणून निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

अधिकाऱ्यांविषयी संताप आणि चिंता.
दुसऱ्या बैठकीचे कारण सांगून स्वतः बैठकीला न येता प्रतिनिधी पाठविणाऱ्या अधिकाऱ्यांविषयी संताप व्यक्त झाला. पंचायत समिती सभा यांना किरकोळ वाटते, महत्त्व समजायला काय करावे? अशी चिंता सदस्यांनी मांडली. माहिती द्यायला अधिकारी येत नसतील तर आम्हीच त्यांच्यापर्यंत जाऊ, अशीही खिल्ली उडवण्यात आली.

Web Title: Sangli News Walava Panchayat Samitee meeting