''वालचंद'ला जागतिक स्तरावरील तंत्रज्ञान विद्यापीठ करण्याचे ध्येय"

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 मे 2017

अवकाश-संरक्षण क्षेत्रात 'वालचंद' योगदान देईल

अवकाश आणि संरक्षण क्षेत्रात खासगी उद्योजकांना गुंतवणुकीची संधी देण्यात आली आहे. वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय पुढच्या काही वर्षात यामध्ये आपले योगदान देऊ शकेल.

सांगली, : अवकाश आणि संरक्षण क्षेत्रात खासगी उद्योजकांना गुंतवणुकीची संधी देण्यात आली आहे. वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय पुढच्या काही वर्षात यामध्ये आपले योगदान देऊ शकेल असा विश्‍वास महाविद्यालयाच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष अजित गुलाबचंद यांनी व्यक्त केला. वालचंद महाविद्यालयाची पुढची वाटचाल 'एमआयटी'सारखे जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान विद्यापीठ म्हणून व्हावी असे आमचे ध्येय्य असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 

ते म्हणाले, 'शिक्षणामध्ये खूप मोठे बदल येत आहेत. जे आपल्याला स्विकारावे लागतील. एक स्वायंत्र संस्था म्हणून कामाची संधी मिळाली आहे. ही स्वायतत्ता गुणवत्तेच्या विस्तारासाठी आहे. जागतिक दर्जाचा अभियंता तयार करणे हे आमचे उद्दीष्ठ आहे. त्यसाठी आजवरची शिक्षण व्यवस्थेची रुढी बाजूला ठेवून पुढे जावे लागेल. अमेरिकेसारख्या देशाची प्रगती ही तिथल्या शिक्षण संस्थांमधून होणाऱ्या संशोधनावर अवलंबून आहे. त्यानंतर तिथल्या उद्योगांसोबत या संस्था करीत असलेल्या भागीदारीत आहे. आपल्याला हे करण्यास खूप विलंब झाला आहे.

आता आणखी उशीर करणे परवडणारे नाही. केंद्र सरकार त्यादिशेने प्रयत्न करीत आहे. अलीकडेच संरक्षण आणि अवकाश क्षेत्र खासगी गुंतवणुकीसाठी खुले झाले आहे. यात परदेशातून तंत्रज्ञान आयात होईल. आपल्याला यात सतत प्रगतीच करावी लागेल. यासाठीच वालचंद सारख्या महाविद्यालयांना मोकळीक मिळणे गरजेचे आहे. आम्हाला त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून मदत हवी आहे. ही मदत अर्थिक नव्हे तर शासनाच्या विविध उद्योगांमध्ये सहभागीदार होण्यासाठीची.'' 

महाराष्ट्र टेक्‍नीकल सोसायटी आणि वालचंद महाविद्यालयाच्या वादावर श्री.गुलाबचंद म्हणाले,'' वालचंद महाविद्यालय ग्लोबल इन्स्टिट्युट म्हणून घडवणे हे अंतिम उद्दीष्ठ आहे. ते साध्य करताना काही अडचणी जरूर आल्या आहेत मात्र त्या दूर होतील. आमची भूमिका राज्य सरकारला पटवून दिली आहे. एमटीई आणि वालचंद महाविद्यालय दिर्घकाळ चांगल्या हेतूने एकत्र काम करीत आले आहे. मात्र काही लोक सूडबुध्दीने वागत आहेत. त्यांच्यामुळे प्रगतीत काही अडचणी आल्या तरी नक्की दूर होतील.'' 

Web Title: sangli news walchand aims to become world class technical institute