अवकाश-संरक्षण क्षेत्रात 'वालचंद' योगदान देईल - अजित गुलाबचंद

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 मे 2017

सांगली - अवकाश आणि संरक्षण क्षेत्रात खासगी उद्योजकांना गुंतवणुकीची संधी देण्यात आली आहे. वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय पुढच्या काही वर्षांत यात आपले योगदान देऊ शकेल, असा विश्‍वास महाविद्यालयाच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष अजित गुलाबचंद यांनी व्यक्त केला. वालचंद महाविद्यालयाची पुढची वाटचाल "एमआयटी'सारखे जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान विद्यापीठ म्हणून व्हावी, असे आमचे ध्येय आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले, 'शिक्षणात खूप मोठे बदल येत आहेत. जे आपल्याला स्वीकारावे लागतील. एक स्वायत्त संस्था म्हणून कामाची संधी मिळाली आहे. ही स्वायत्तता गुणवत्तेच्या विस्तारासाठी आहे. जागतिक दर्जाचा अभियंता तयार करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी आजवरची शिक्षण व्यवस्थेची परंपरा बाजूला ठेवून पुढे जावे लागेल. अमेरिकेसारख्या देशाची प्रगती ही तिथल्या शिक्षण संस्थांतून होणाऱ्या संशोधनावर अवलंबून आहे. त्यानंतर तिथल्या उद्योगांसोबत या संस्था करीत असलेल्या भागीदारीत आहे. आपल्याला हे करण्यास खूप विलंब झाला. आता आणखी उशीर करणे परवडणारे नाही. केंद्र सरकार त्या दिशेने प्रयत्न करीत आहे. अलीकडेच संरक्षण आणि अवकाश क्षेत्र खासगी गुंतवणुकीसाठी खुले झाले आहे. यात परदेशातून तंत्रज्ञान आयात होईल. आपल्याला यात सतत प्रगतीच करावी लागेल. यासाठीच वालचंदसारख्या महाविद्यालयांना मोकळीक मिळणे गरजेचे आहे.''

Web Title: sangli news walchand support in field of space protection