घनवट, दीपक पाटीलकडे उत्पन्नापेक्षा जादा मालमत्ता

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 ऑक्टोबर 2017

सांगली - वारणानगर (ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) येथे एका बांधकाम व्यावसायिकाच्या फ्लॅटमधील सव्वातीन कोटी रुपयांच्या चोरी प्रकरणी अटक असलेले निलंबित पोलिस निरीक्षक विश्‍वनाथ घनवट आणि हवालदार दीपक पाटील यांच्याकडे उत्पन्नापेक्षा जादा मालमत्ता असल्याचे राज्य गुन्हे अन्वेषण (सीआयडी) विभागाच्या चौकशीत निष्पन्न झाले आहे.

सांगली - वारणानगर (ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) येथे एका बांधकाम व्यावसायिकाच्या फ्लॅटमधील सव्वातीन कोटी रुपयांच्या चोरी प्रकरणी अटक असलेले निलंबित पोलिस निरीक्षक विश्‍वनाथ घनवट आणि हवालदार दीपक पाटील यांच्याकडे उत्पन्नापेक्षा जादा मालमत्ता असल्याचे राज्य गुन्हे अन्वेषण (सीआयडी) विभागाच्या चौकशीत निष्पन्न झाले आहे. त्यांना या मालमत्तेचा खुलासा करण्याच्या नोटिसा बजावल्याचे पोलिस अधीक्षक नरेंद्र गायकवाड यांनी सांगितले.

वारणानगर येथे झुंजार सरनोबत यांच्या फ्लॅटच्या एका खोलीतील सव्वातीन कोटींवर तपासाच्या नावाखाली डल्ला मारला होता.  याबद्दल सरनोबत यांनी कोडोली (ता. पन्हाळा) पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यावरून विश्‍वनाथ घनवट, सहाय्यक पोलिस निरीक्षक सूरज चंदनशिवे, शरद कुरळपकर, दीपक पाटील, शंकर पाटील, कुलदीप कांबळे व रवींद्र माने यांच्यासह मुख्य संशयित मैनुद्दीन मुल्ला याच्यावर कोडोली पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद आहे. यातील कुरळपकर वगळता इतर सर्व संशयित ‘सीआयडी’ला शरण आले आहेत. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. घटनेपासून गायब असलेला सहायक पोलिस निरीक्षक शरद कुरळपकर सापडत नसल्याने त्याला फरारी घोषित करण्याच्या हालचाली ‘सीआयडी’ने सुरू केल्या आहेत.

‘सीआयडी’ने दोन दिवसांपूर्वी घनवट, चंदनशिवे, दीपक पाटील व कुलदीप कांबळे यांच्याविरुद्ध एक हजार २७० पानांचे दोषारोपपत्र पन्हाळा न्यायालयात सादर केले आहे. यात शासकीय पदाचा गैरवापर करणे, वरिष्ठांना चोरीचा चुकीचा अहवाल सादर करून शासनाची दिशाभूल व चोरीचा कट रचणे, स्थावर मालमत्ता यासह तपासातील अन्य बाबींचाही दोषारोपपत्रात समावेश आहे. अन्य संशयितांविरुद्धही दोषारोपपत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

याबाबत अधिक माहिती अशी - गेल्या वर्षी मार्चमध्ये घनवट, चंदनशिवेसह सात जणांनी मिरजेतील बेथेलहेमनगरमध्ये मैनुद्दीन मुल्लाच्या झोपडीवजा घरात छापा टाकून सव्वातीन कोटींची रोकड जप्त केली होती. मुल्लाने ही रक्कम वारणानगर येथून चोरल्याची कबुली दिली होती.

त्यावरून घनवट आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मुल्लाला सोबत घेऊन वारणानगरमध्ये सरनोबत यांच्या फ्लॅटवर छापा टाकून मोठ्या प्रमाणात रोकड जप्त केली होती. मात्र, प्रत्यक्षात कारवाईवेळी त्यांनी संगनमताने तीन कोटी १८ लाख रुपये हडप केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सरनोबत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ‘सीआयडी’ने सहा महिन्यांपासून तपास केला आहे. सर्व संशयितांच्या घरावर छापे टाकून झडती घेण्यात आली. त्यांच्या मालमत्तेबाबत चौकशी केली आहे. त्यांची बॅंक खातीही तपासण्यात आली आहेत. 

नोटिसा बजावणार
विश्‍वनाथ घनवट आणि दीपक पाटील यांच्याकडे उत्पन्नापेक्षा जादा मालमत्ता असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले. त्यामुळे जादा मालमत्तेचा स्रोत कुठला, याचा पुराव्यासह खुलासा करण्याची नोटीस त्यांना ‘सीआयडी’ने बजावली आहे. याबरोबरच शंकर पाटील, रवींद्र पाटील, कुलदीप कांबळे यांचीही मालमत्ता तपासली जात आहे. त्यांची मालमत्ताही उत्पन्नापेक्षा जादा असल्यास त्यांनाही खुलाशाच्या नोटिसा बजावण्यात येणार आहेत.

 

Web Title: Sangli News warananagar Theft Case