इस्लामपुरात प्लास्टिकवर ‘वॉच’!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 मे 2018

इस्लामपूर - इस्लामपुरात प्लास्टिकपासून बनवल्या जाणाऱ्या पिशव्या व अन्य वस्तूंच्या उत्पादन, वापर व साठवणूक तसेच वितरण व विक्री करण्यावर यापुढे पालिकेचा ‘वॉच’ असणार आहे. शासनाने लागू केलेल्या प्लास्टिकबंदी कायद्यानुसार यापुढे वापर आढळल्यास दंडात्मक कारवाईचा इशारा मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांनी दिला आहे.

पर्यावरण संरक्षण व संवर्धन करण्यासाठी राज्य शासनाने प्लास्टिकबंदी जाहीर केली आहे. याबाबत २००६  मध्येच कायदेशीर तरतूद करण्यात आली आहे. आता नव्याने आदेश जारी झाला आहे. या नियमानुसार  कॅरिबॅग्स ५० मायक्रोनपेक्षा कमी जाडीच्या व आठ बाय बारा इंच आकारापेक्षा कमी असलेल्या बॅगांचे उत्पादन, विक्री करण्यास बंदी आहे. प्लास्टिक पिशव्या व प्लास्टिकची इतर उत्पादने नैसर्गिक व जैविकदृष्ट्या विघटनशील नसल्याने त्याच्या वापरामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडून पर्यावरणीय समस्या निर्माण होतात. जैवविविधतेवर अनिष्ट परिणाम होतो. 

गटाराचे पाणी तुंबून आरोग्यविषयक समस्या वाढतात. जनावरांच्याकडून उघड्यावर पडलेल्या पिशव्या पोटात जाऊन अनेक जनावरे दगावतात. या सर्वांचा परिणाम विचारात घेता प्लास्टिकबंदी गांभीर्याने घेण्याचा विचार इस्लामपूर नगरपालिकेने केला आहे. 

सातत्य राखण्याचे आव्हान!
चार वर्षांपूर्वी पालिकेने प्लास्टिकबंदीची कडक अंमलबजावणी केली होती. काहींवर दंडात्मक कारवाई देखील केली होती; पण नंतरच्या काळात ही कारवाई थंड पडली. आता पुन्हा पालिका प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे.

प्लॅस्टिकबंदीबाबत प्रशासन गंभीर आहे. नियमांची कडक अंमलबजावणी केली जाईल. पहिला गुन्हा घडल्यास ५ हजार, दुसरा गुन्हा घडल्यास १० हजार तर त्यानंतरच्या लागून पुढील होणाऱ्या गुन्ह्यास तीन महिन्यांपर्यंत कारावास तसेच २५ हजार रुपये दंड अशी दंडाची तरतूद आहे.
- दीपक झिंजाड,
मुख्याधिकारी

Web Title: Sangli News watch on Plastic in Islampur