कुंडल योजना निकामी झाल्याने पलूस तालुक्यात १७ गावांत पाणी प्रश्न

कुंडल योजना निकामी झाल्याने पलूस तालुक्यात १७ गावांत पाणी प्रश्न

पलूस - तालुक्‍यातील १७ गावे व वाड्या-वस्त्यांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारी कुंडल प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजना निकामी झाली आहे. पाईपलाईन उद्‌ध्वस्त झाल्याने वारंवार बंद पडते. नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. ही बाब नित्याची झाली आहे. योजनेचे त्वरित नूतनीकरण करावे, अशी मागणी होत आहे.

कुंडल योजना ४० वर्षापूर्वी सुरू झाली. सार्वजनिक नळांच्या माध्यमातून पाण्याचा पुरवठा सुरू होता. काही वर्षांनंतर सार्वजनिक नळ बंद करण्यात आले. वैयक्तिक नळांची संख्या वाढली. हळूहळू नळ धारकांची संख्या प्रचंड वाढली. मात्र योजनेची क्षमता तेवढीच होती. 

पलूस, कुंडल, दुधोंडी, सांडगेवाडी, सावंतपूर, नागराळे, पुणदी, रामानंदनगर, कुंभारगाव, आमणापूर व तालुक्‍यातील अन्य अशा १७ गावे व वाड्या-वस्त्यांवर योजनेतून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. कनेक्‍शनधारक वाढले, क्षमता तीच राहिली. त्यामुळे मुबलक, पुरेशा दाबाने पाणी मिळत नाही. काही ठिकाणी अजिबात पाणी मिळत नाही. 

योजनेच्या क्षमतेत वाढ झाली नाहीच, योजना जुनी झाल्याने वारंवार घोगाव येथील कृष्णा नदीवरील जॅकवेलमधील पंप बंद पडणे, घोगाव - कुंडल दरम्यान मुख्य जलवाहिनीला वारंवार गळती लागणे, यामुळे योजना बंद ठेवावी लागते. त्याचप्रमाणे योजनेवरील ग्राहकांचीही मोठ्या प्रमाणावर पाणीपट्टीची थकबाकी आहे. त्यामुळे योजनेचे वीज बीलही मोठ्या प्रमाणावर थकीत आहे. या सर्व कारणांमुळे योजना वारंवार बंद असते. 
नूतनीकरण झाल्यास योजनेवर अवलंबून असलेल्या सर्वच गावांना नियमित पाणीपुरवठा होऊ शकतो. जिल्हा परिषद व लोकप्रतिनिधींनी योजनेच्या नूतनीकरण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. ही गेल्या अनेक वर्षापासून मागणी आहे. मात्र लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने कधी पाहिलेच नाही. निधी उपलब्धता, नव्या प्रकल्पाचा शासन दरबारी पाठपुरावा केलाच नाही. निवडणुका आल्या की आश्‍वासने आणि तक्रारदारांना गप्प बसवणे एवढेच त्यांनी केले. ‘हा करतो म्हणतोय, तो करतो म्हणालाय’ एवढ्याच वावड्या उठल्या. लक्ष मात्र कोणीच देत नाही. योजनेचे नूतनीकरण करून योजना पूर्ण क्षमतेने सुरू करावी. अन्यथा पिण्याच्या पाण्यासाठी रस्त्यावर उतरण्याच्या इशारा नागरिकांनी दिला आहे.

स्वतंत्र योजनांची गरज
कुंडल व आमणापूरसारख्या गावांनी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना सुरू केल्याने तेथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सुटला. इतर गावांनाही स्वतंत्र योजना सुरू करण्याशिवाय पर्याय नाही. लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेण्याची गरज आहे. कृष्णा नदी जवळ असूनही पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागते, हे दुर्दैवच आहे.

योजनेवरील गावे, लोकसंख्या व नळ 
गाव     लोकसंख्या(अंदाजे)     नळ ग्राहक संख्या 
१) पलूस     (३५,०००)     (३०८७)
२) दुधोंडी     (८०००)     (४५०)
३) नागराळे     (३५००)    (३९७)
४) बुर्ली    (७०००)    (५२८)
५) रामानंदनगर    (६०००)    (९४२)
६) सावंतपूर    (६०००)    (७१३)
७) पुणदी    (३०००)    (४४३)
८) पुणदीवाडी    (५००)    (७८)
९) कुंभारगाव    (३०००)    (९९)
१०) दह्यारी    (२०००)    (८५)
११) कुंडल    (२०,०००)    (८०६)
१२) सांडगेवाडी    (७०००)    (३६०)
१३) घोगाव    (४०००)    (१७९)
१४) देवराष्ट्रे    (५०००)    (४४०)
  लोकसंख्या १ लाख १० हजार
  नळ ग्राहक संख्या ७,८८७
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com