नेदरलँडच्या दात्यांनी थांबवली धनगरवाड्यांची वणवण

नेदरलँडच्या दात्यांनी थांबवली धनगरवाड्यांची वणवण

सांगली - उशाला चाळीस टीएमसीचा जलाशय, जिल्ह्यातील सर्वात अतिवृष्टीचा प्रदेश तरीही अनादी काळापासून आणि अगदी स्वातंत्र्याची सत्तरी ओलांडत आली तरी चांदोलीतील धनगरवाडे आणि वस्त्यांना काही किलोमीटरची पायपीट करून पिण्यासाठी पाणी आणावे लागत होते.

ऐन उन्हाळ्यात तर हे पाण्यासाठीचे हाल न बघवणारे, मात्र या चांदोली जंगलाच्या सीमाभागावर विसावलेल्या सुमारे ३२ धनगरवाड्यांमधील सुमारे दहा हजार लोकसंख्येला यंदा प्रथमच वस्तीवर पाणी पोचले. त्यासाठी आपले मायबाप सरकार नव्हे तर नेदरलँडमधील उद्योजक धावून आले. या उद्योजकांच्या मदतीतून येरळा प्रोजेक्‍ट सोसायटीने केलेले हे काम यासाठी महत्त्वाचे की जिथे शासन यंत्रणा अपयशी ठरल्या तिथे स्थानिक लोकांच्या मदतीने, त्यांच्या श्रमातून छोट्या छोट्या अशा २३ पाणी योजना अस्तित्वात आल्या आहेत. या वस्त्यांसाठी यंदाचा गुढी पाडवा म्हणजे आनंद पोटात मावेना,अशी अवस्था आहे.

पायी पाऊलवाटेने दोन-तीन किलोमीटरची पायपीट आजही करावी लागते. अशा या धनगरवाड्यांवरील महिला चार घागरी पाण्यासाठी रोज किलो दोन किलोमीटरची पायपीट करीत होत्या. तिथली मुले आजही पहिलीच्या वर्गात जायचे म्हटले तरी चार-पाच किलोमीटरचा डोंगर उतरून येत असतात.

पावसाळ्यात बाहेर डोकावू देत नाही, असा पाऊस आणि ते कमी की काय म्हणून साप-श्‍वापदांची भीती कायम मानगुटीवर. आजही सांगली जिल्ह्यातील किमान नव्वद टक्के लोकांनी आपल्याच जिल्ह्यातील हे वास्तव कधी अनुभवले नसेल, मात्र इथे पोचली नेदरलँडची टीम. तिथल्या रोटरी व वाईल्ड गीज या स्वयंसेवी संस्थांनी येरळाच्या मदतीने या वाडीवस्तीवरील उपेक्षितांसाठी हक्काचे पुरेसे पाणी द्यायचा संकल्प जानेवारी २०१६ मध्ये केला आणि आत्तापर्यंत तब्बल २३ पाणी योजना मार्गी लागल्या आहेत.

या योजना म्हणजे तरी काय आहेत. डोंगरच्या कपारीला एखादा कायमस्वरूपी वाहणारा झरा असतो. एखादी खोल जंगलात विहीर असते. किंवा गावातील मुख्य वस्तीलगत शिवकालीन विहीर असते. या जलस्त्रोतापासून अवघ्या एक किलोमीटर हवाई अंतरावर राहणारी एखादी वस्ती असते, मात्र या वस्तीला तिथून पाणी आणण्यासाठी रोज दोन तीन किलोमीटरची पायपीट करावी लागते.  जगात देशात कितीही स्थित्यंत्तरे झाली तरी ते विकासाचे वारे तिथं पोचले नाही. नाही म्हणायला आता तिथे व्हाटस्‌अप फेसबुक पोचले आहे, मात्र तिथल्या प्रत्येक वस्तींवर अद्यापही पाणी-शिक्षणाची सोय मात्र सरकार पोचवू शकले नव्हते. 

मात्र या वस्त्यांचे भाग्य २०१४ मध्ये फळफळले. जिल्ह्याला वीज पुरवणाऱ्या चांदोली जलविद्युत प्रकल्पाजवळील या वस्त्यांवर अद्यापही तेव्हा वीज पोचली नव्हती. (आजही तेच बहुतांशी वास्तव). वीज नाही तर सौर दिवे लावावेत, असा विचार घेऊन कोकरुडच्या अंध-अपंग बहुउद्देशीय संस्थेचे विश्‍वस्त मारुती पवार एकदा ‘येरळा’च्या नारायण देशपांडे यांच्याकडे आले.

जत तालुक्‍यातील दुर्लक्षित भागात काम करणाऱ्या येरळाने मग आपला मोर्चा जिल्ह्याच्या दुसऱ्या टोकाला चांदोलीकडे वळवला. नेदरलॅन्ड रोटरीच्या मदतीतून त्यांनी पहिल्यांदा या वस्त्यांवर तब्बल साडेपाचशे सौर दिवे लावले. या भागात अनादी काळापासून सुरू झालेल्या मानवी संस्कृतीच्या प्रवासात तसे हे क्रांतिकारी पाऊलच. कारण विज्ञानाच्या तांत्रिक करामतीचा तोच तिथल्या झोपड्यांमध्ये पहिला प्रकाश. हे काम करताना तिथल्या आयाबहिनींनी देशपांडे आणि त्यांच्या टीमला आम्हाला पाणी द्या असे साकडे घातले. 

पाण्यासाठीचे हाल पाहून येरळाने कोणत्याही फंडस्‌ची वाट न पाहता तिथल्या घोडमळी या वस्तीवर नैसर्गिक उताराने सुमारे १६५० फूट लांबीची पाईपलाईन टाकून पहिली पाणी योजना यशस्वीपणे पूर्ण केली. त्यासाठी वस्तीवरच्याच जाणत्यांनी पुढे येऊन पाईपलाईनचा मार्ग सांगितला. मग सुरू झाला योजनांचा सिलसिला. ३१ वस्त्यांचे सर्व्हे झाले. त्यासाठी चाळीस लाख रुपयांचे अंदाजपत्रक तयार झाले. दरम्यानच्या काळात या वस्त्यांना दरवर्षी भारत भेटीवेळी आवर्जून भेट देणारे नेदरलॅन्डच्या दात्यांच्या गळी हे सारे उतरवण्यात आले.

या संस्थेचे पदाधिकारी असलेले आणि नेदरलॅन्डमध्ये मोठे मोठे उद्योजक-प्रशासकीय अधिकारी असलेले रॉब टॉम्पॉट, ड्रीक हॉल्ड, मोनिका मुसेन यांनी निधी उभा करून द्यायचा शब्द दिला. नोव्हेंबर २०१६ पासून मग या योजनांना सुरवात झाली. जिथे नैसर्गिक उताराने शक्‍य असेल तिथे त्या पद्धतीने, जिथे पाणी उचलून टाकायची गरज आहे तिथे सौर पंपाद्वारे, जिथे बोअरची सोय आहे तिथून किंवा जिथे पारंपरिक रित्या वापरात विहिरी आहेत त्या जलस्त्रोतापासून योजनांना सुरवात झाली.

येरळाचे मिलिंद कुलकर्णी, मुकुंद वेळापूरकर, अपर्णा कुंटे, सांगलीतील पाणी टाक्‍या पुरवणारे सांगलीचे वर्धमान ट्रेडर्सचे रितेश शहा, बजरंग माळी मलकापूरचे श्रीराम ट्रेडर्स मुकेश पटेल, प्लबंर विजय काबरे, श्रीधर गुरव यांनी घरचे काम असावे या आस्थेने स्थानिकांच्या मदतीने या साऱ्या योजना पूर्ण केल्या आहेत. चांदोलीच्या डोंगर कडाकपाऱ्यांमधून आता जवळपास ३२ हजार फूट लांबीच्या पाईप्स फिरल्या आहेत.

त्यातून आत्तापर्यंत २३ वस्त्यांवरील  साडेआठ हजार लोकसंख्येला आणि तब्बल १२ हजार जनावरांना हक्काचे पाणी उपलब्ध झाले आहे. खोपटाच्या शेजारी उभी असलेली पाण्याची टाकी आणि त्याच्या नळातून वाहणारे पाणी पाहताना इथल्या मायमाऊलींच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत आहे. 

या वस्त्यांत पहिलाच पाणीदार पाडवा...
घोडमळी, शिबे, कळकेवाडी, खेळते, करुंगळे, पिंगळेवाडी, वालूर धनगरवाडा, कांडवन धनगरवाडा, अंबाईवाडा जळकी वस्ती, अंबाईवाडी झोरेवस्ती, अंबाईवाडी मराठवाडी, जुळेवाडी, आळतूर, पेंगुवाडा, चौकीवाडीची पांढऱ्या पाण्याची वस्ती, शिराळे माळेवाडी, शित्तूर पाटीलवाडी, शित्तूर पाटील वाडी वस्ती दोन, वारूण मालेवाडी, तुपार वाडी, रिंगेवाडी, कदमवाडी, शित्तूर फोंडेवस्ती आदी २३ वस्त्यांरील साडेआठ हजार लोकसंख्येसाठी आणि १२ हजार जनावरांच्या पाण्याची सोय झाली असून आणखी आठ वस्त्यांसाठी योजना प्रस्तावित आहेत. या योजनांसाठी आत्तापर्यंत ३५ लाखांचा खर्च झाला, हाच खर्च शासन यंत्रणेतून करायचा झाला असता कोट्यवधी खर्च झाले असते अशी प्रतिक्रिया शाहूवाडीचे आमदार सत्यजित पाटील यांनी नोंदविली.
..........

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com