आपण लोकांसाठी आहोत याचे भान ठेवा - चंद्रकांत दळवी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 ऑगस्ट 2017

सांगली - शासकीय कामासाठी कार्यालयात येणाऱ्या लोकांचे स्वागत करा. त्यांची कामे वेळेवर करा. आपण लोकांसाठी आहोत याचे भान ठेवा. झिरो पेंडन्सी अभियानात तुम्ही उत्कृष्ट काम केले आहे. आता ‘डेली डिस्पोजल’ झाले पाहिजे याकडे लक्ष ठेवा. शासकीय कारभार रामभरोसे आहे लोकांना वाटू नये, अशा शब्दात विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना समज दिली.

सांगली - शासकीय कामासाठी कार्यालयात येणाऱ्या लोकांचे स्वागत करा. त्यांची कामे वेळेवर करा. आपण लोकांसाठी आहोत याचे भान ठेवा. झिरो पेंडन्सी अभियानात तुम्ही उत्कृष्ट काम केले आहे. आता ‘डेली डिस्पोजल’ झाले पाहिजे याकडे लक्ष ठेवा. शासकीय कारभार रामभरोसे आहे लोकांना वाटू नये, अशा शब्दात विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना समज दिली.

जिल्हा परिषदेतील झिरो पेंडन्सी आणि डेली डिस्पोजल अभियानाच्या कामाची तपासणी करण्यासाठी आज विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी जिल्हा दौऱ्यावर आले होते. मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने यांच्यासह सर्व खातेप्रमुख, कर्मचारी उपस्थित होते. गेले दीड महिने कर्मचाऱ्यांनी सुटी दिवशीही कामावर येऊन रेकॉर्ड रूममधील कागदपत्रांचे वर्गीकरण केले. त्याचे गठ्ठे करून ते सील केले आहेत. श्री. दळवी यांनी रेकॉर्ड रूमची, कर्मचाऱ्यांच्या टेबलची पाहणी या वेळी केली.

आयुक्त दळवी म्हणाले, ‘‘सांगली जिल्हा परिषदेने झिरो पेंडन्सीचे काम उत्कृष्ट केले आहे. यासाठी सर्व कर्मचारी, अधिकाऱ्यांनी योगदान दिले आहे. इतर कामे बाजूला ठेवून फाईलींचे अ, ब, क आणि ड असे वर्गीकरण करण्यास त्यांनी प्राधान्य दिले. शासकीय कार्यालयात पाठपुरावा केल्याशिवाय फाईल हलत नाही. 

लोकांना हेलपाटे मारावे लागतात. शासकीय कारभार रामभरोसे चालतो हे चित्र बदलायचे आहे.’’

दोन महिन्यांपेक्षा जास्त पेंडिंग नको 
जिल्हा परिषदेत येणाऱ्या फायलींची अनेकवेळा नोंद होत नसल्याचे दिसते. आता जिल्हा परिषदेत दोन महिन्यांपेक्षा जास्त दिवस फाईल पेंडिंग राहता कामा नये. तर तालुक्‍याला एक महिन्यापेक्षा जास्त पेंडिंग राहणार नाही याची दक्षता घेण्याची सूचना त्यांनी केली.

ठेकेदाराचे डिपॉझिट सहा वर्षांनी दिले
बांधकाम विभागातील एका ठेकेदाराने कामे पूर्ण करून सहा वर्ष झाली तरी त्याची नस्तीची फाईल मिळत नसल्याने त्याचे डिपॉझिट थकले होते. ती फाईल या अभियान काळात सापडली आणि त्याला सहा वर्षांनी डिपॉझिट परत देण्यात आले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

१३० वर्षांची फाईल मिळाली
आरोग्य विभागातील फाईलींचे वर्गीकरण करताना सन १८८६ सालची देवीच्या रोगाबद्दलची फाईल मिळाली. नियमानुसार ही फाईल ३० वर्षांनी म्हणजे १९१५ मध्ये नष्ट करायला हवी होती. पण ती १०१ वर्षांनी नष्ट केली, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राम हंकारे यांनी दिली.

पदाधिकाऱ्यांचे आभार
अभियान कामात अधिकारी, कर्मचारी गेले दीड महिने व्यस्त होते. या काळात जिल्हा परिषदेतील पदाधिकाऱ्यांनी चांगले सहकार्य केले. अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना झिरो पेंडन्सीच्या कामासाठी प्रोत्साहन देऊन सहकार्य केले. याबद्दल आयुक्त दळवी यांनी पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले.

Web Title: sangli news we are for the people be aware