पावसाच्या हुलकावणींने शेतकरी चिंतेत 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 जून 2017

सांगली - यंदा पावसाचा चांगल्या अंदाज होता. शेतकऱ्यांनी खरिपाच्या आगाप पेरण्या केल्या; मात्र पावसाने हुलकावणी दिल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ 20 टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. सध्या खरिपाच्या पेरण्या थांबल्या आहेत. शिराळ्यात भाताच्या धूळवाफेवर पेरण्या झाल्या तरी पावसाअभावी वाढ खुंटली आहे. नदीकाठावर सोयाबीन आणि भुईमुगाची टोकणी सुरू आहे. दुष्काळी जत,आटपाडी तालुक्‍यांत ज्वारी, बाजरीचे मोठे क्षेत्र आहे, तेथे अपवादात्मक पेरण्या झाल्या. 

सांगली - यंदा पावसाचा चांगल्या अंदाज होता. शेतकऱ्यांनी खरिपाच्या आगाप पेरण्या केल्या; मात्र पावसाने हुलकावणी दिल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ 20 टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. सध्या खरिपाच्या पेरण्या थांबल्या आहेत. शिराळ्यात भाताच्या धूळवाफेवर पेरण्या झाल्या तरी पावसाअभावी वाढ खुंटली आहे. नदीकाठावर सोयाबीन आणि भुईमुगाची टोकणी सुरू आहे. दुष्काळी जत,आटपाडी तालुक्‍यांत ज्वारी, बाजरीचे मोठे क्षेत्र आहे, तेथे अपवादात्मक पेरण्या झाल्या. 

जिल्ह्यात खरिपाचे क्षेत्र 3 लाख 47 हजार 442 हेक्‍टर आहे. खरीपपूर्व मशागतींची कामे पूर्ण झाली आहेत. हवामान विभागाने सुरवातीपासून पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तविल्याने शेतकरी खुशीत होते; मात्र पावसाने दडी मारली आहे. कृषी विभागाने खते आणि बियाणांचे नियोजन केले आहे. जिल्ह्यासाठी साडेसात हजार क्विंटल बियाण्यांची विक्री झाली आहे. खताची आतापर्यंत बारा हजार टन विक्री झाली आहे. जूनमध्ये शेतकरी उसाला लागवडीचा डोस देतात, त्यासाठीच खताची विक्री अधिक दिसते. शेतकरी पसंतीच्या बियाणे वाणाची खरेदी करू लागला आहे. कृषी सेवा केंद्राने सुगीचे दिवस सुरू होणार असल्याने सर्व बियाणे विक्रीसाठी सज्ज ठेवले आहे. जूनच्या पंधरवड्यात जिल्ह्यात दमदार पाऊस बरसला, त्यानंतर जोर कायम राहण्याची अपेक्षा होती. पावसानंतर पश्‍चिम भागात पेरणीला सुरवात झाली. जिल्ह्यात आतापर्यंत 50 हजार हेक्‍टरवरील पेरणी पूर्ण झाली आहे. शिराळा तालुक्‍यात जूनच्या सुरवातीस धूळवाफेवर भाताची लावण झाली. शिराळ्यात बावीस हजार हेक्‍टर भाताचे क्षेत्र असून त्यापैकी 17 हजार सहाशे हेक्‍टरवर लावण झाली. पिकाची वाढ चांगली आहे, मात्र पावसाने दडी मारल्याने अडचणी भाताची वाढ खुंटल्याचे चित्र आहे. कृष्णा, वारणा नदी काठावर सोयाबीन आणि भुईमुगाची टोकणीला गती आहे. वाळवा, पलूस, कडेगाव, शिराळा आणि मिरज पश्‍चिम भागात दोन्ही पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. सोयाबीनचे 58 हजार 760 हेक्‍टर क्षेत्र असून 4 हजार हेक्‍टरवर पेरणी झाली. भुईमुगाचे 26 हजार हेक्‍टरपैकी 3 हजार हेक्‍टरवर टोकण झाली आहे. आठ दिवसांत वाढ होण्याची शक्‍यता आहे. 

जत, आटपाडी, कवठेमहांकाळ आणि खानापूर या तालुक्‍यात ज्वारी आणि बाजरीचे मोठे क्षेत्र आहे. तेथील शेतकरी पावसावर अवलंबून आहेत, त्यामुळे त्यांचे डोळे पावसाकडे लागले आहेत. ज्वारीचे 63 हजार 460 हेक्‍टर क्षेत्र असून अद्याप एक हजार हेक्‍टरवरही पेरणी झाली नाही. बाजरीचे 43 हजार 420 हेक्‍टर क्षेत्र असून पेरणी झालेली नाही. मक्‍याचे तीन हजार हेक्‍टर क्षेत्रापैकी 1 हजार हेक्‍टर, मूग 6 हजार नऊशे हेक्‍टरपैकी पाचशे, उडीद 7 हजार सातशे हेक्‍टरपैकी 1 हजार, इतर कडधान्ये 1 हजार हेक्‍टवर पेरणी झाली. पावसाने उघडीप दिल्याने पेरण्या पूर्णपणे खोळंबल्या आहेत. जिल्ह्यात गेल्यावर्षी याचवेळी 25 टक्के पेरण्या झाल्या होत्या. पण, यावर्षी मात्र ती सरासरीही गाठू शकली नाही. 

जिल्ह्यातील पीकनिहाय पेरण्या (हेक्‍टरमध्ये) 

पीक, क्षेत्र, पेरणी 
भात, 22500, 17160 
सोयाबीन, 58760, 3500 
भुईमूग, 25580, 3179 
ज्वारी, 63460, 1234 
बाजरी, 43420, 00 
मका, 28112 1178 
सूर्यफूल, 1720 350 
कापूस, 2664, 00 
तूर, 7700, 00 
मूग, 6900, 860 
उडीद, 7700, 1200 

Web Title: sangli news weather farmer