सांगलीत गुंडाचा दगडाने ठेचून निर्घृण खून

बलराज पवार
मंगळवार, 2 जानेवारी 2018

रमेश कोळी हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे. त्याने 2006मध्ये स्वरुप टॉकीजजवळ रोहित ऊर्फ बापू झेंडे याचा खून केला होता. या प्रकरणी त्याला न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. तो सध्या अपील जामिनावर बाहेर असल्याचे समजते. तर चौघेही हल्लेखोर हे बेकायदेशीर शस्त्रे बाळगणे तसेच इतर
गुन्ह्यातील संशयित आरोपी आहेत

सांगली - कोल्हापूर रोडवरील हॉटेल वुडलॅंडसजवळ रमेश तमन्ना कोळी
(रा. हरिपूर) या गुंडाचा चौघा गुंडांनीच काल मध्यरात्री दगडाने ठेचून खून
केला. या घटनेनंतर पोलिसांनी वेगाने तपास करुन केवळ दोनच तासात मिरज
स्टॅंडवर चौघाही मारेकऱ्यांना अटक केली. रवी रमेश खत्री (वय 29), जावेद
जहांगीर जमादार (वय 32), सोमनाथ दादासाहेब डवरी (वय 29) आणि अमीर मन्सूर
नदाफ (वय 30) अशी अटक केलेल्या चौघांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, रमेश कोळी हा आपल्या साथीरादासह हॉटेल वुडलॅंडस
येथे दारु पिण्यासाठी आला होता. रात्री हॉटेल बंद झाल्यानंतर दोघेही
बाहेर पडले आणि निघाले होते. त्याचवेळी संशयित तिघे हल्लेखोर गाडीवरुन
जात होते. त्यांनी रमेश कोळी याला पाहिले आणि परत आले. त्यांनी रमेशला
तुझी जास्त नाटक चालली आहेत, असे म्हणत गाडीवरुन उतरुन त्याला
लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण सुरु केली. दरम्यान, त्यांनी जावेद जमादार या
चौथ्या साथीदारास बोलवून घेतले. त्यानेही रमेशला मारहाण सुरु केली. नंतर
त्यांनी जवळच पडलेले दगड उचलून रमेशच्या डोक्‍यात घातले. त्यामुळे रमेश
जागीच ठार झाला.

रमेशचा खून केल्यानंतर हल्लेखोर मिरजेच्या दिशेने गेले. तेथून ते पळून
जाण्याच्या तयारीत होते. त्यावेळी मिरज स्टॅंडवर स्थानिक गुन्हे
अन्वेषणचे पथक पेट्रोलिंग करत फिरत होते. त्यांना हे चौघे संशयितरित्या
फिरताना आढळून आले. त्यांच्या अंगावर रक्ताचे डाग पडलेले कपडे होते.
त्यावरुन त्यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता त्यांनी रमेश
कोळीचा खून केल्याची कबुली दिली.

या प्रकरणी रमेचा साथीदार अजित आनंदराव पवार याने शहर पोलिस ठाण्यात
फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादित रमेश कोळी आणि रवी खत्री
यांच्यात तीन-चार महिन्यांपुर्वी जयसिंगपूर येथे बाचाबाची झाली होती.
त्याचा राग खत्रीच्या डोक्‍यात होता. त्यातून काल मध्यरात्री रमेश
सापडल्यावर त्याचा खून केला, असे म्हटले आहे.

रमेश कोळी हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे. त्याने 2006मध्ये स्वरुप
टॉकीजजवळ रोहित ऊर्फ बापू झेंडे याचा खून केला होता. या प्रकरणी त्याला
न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. तो सध्या अपील जामिनावर बाहेर असल्याचे
समजते. तर चौघेही हल्लेखोर हे बेकायदेशीर शस्त्रे बाळगणे तसेच इतर
गुन्ह्यातील संशयित आरोपी आहेत.

अप्पर पोलिस अधीक्षक शशिकांत बोराटे, शहर उपअधीक्षक धीरज पाटील यांनी
घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर शहर पोलिस ठाण्यात जावून त्यांनी
हल्लेखोरांची चौकशी केली.

Web Title: sangli news: western maharashtra crime murder