‘ती’ही जाते नियमित जिमला

अजित झळके
सोमवार, 30 एप्रिल 2018

स्थूलता दूर करण्यासाठी, तंदुरुस्त राहण्यासाठी, वैद्यकीय सल्ला, व्यक्तिमत्त्व विकास या चार गोष्टींसाठी महिलांची व्यायामशाळेकडे पावले वळू लागली आहेत. तीन-चार वर्षांत त्याचा वेग वाढलाय. सांगली, मिरजेत महिलांसाठीच्या स्वतंत्र व्यायामशाळा किंवा स्वतंत्र तुकड्यांची सोय केली जात आहे. व्यायाम मार्गदर्शनाचे शास्त्रोक्त शिक्षण घेतलेल्या महिलांसाठी व्यवसायाची कवाडे खुली झाली. 

व्यायामशाळा संचालिकांच्या मते, केवळ उच्चशिक्षित, नोकरदार महिला पूर्वी व्यायामशाळेत यायच्या. आता तसं राहिलं नाही. लग्नापूर्वी व्यायामाद्वारे वजन नियंत्रणासाठी तरुणींची संख्या वाढलीय. लग्न, मुले झाल्यावर वजन वाढू लागते, त्यामुळेही महिला व्यायामासाठी जिममध्ये येत आहेत. ‘व्यायाम बंद केला तर वजन वाढेल’, अशी धास्ती त्यांना आहे. पण ‘व्यायाम बंद करायचाच का?’ या प्रश्‍नात त्याचे उत्तर दडले आहे. एकूणच ‘ती’ आता ठरवून व्यायामाला जातेय.  

वजन कमी करणे, वाढविणे या महिलांच्या प्रमुख अपेक्षा आहेत. विवाहितांपेक्षा युवतींची संख्या जास्त आहे. भविष्यात महिलांचे प्रमाण वाढायला हवे. पस्तीशीनंतर व्यायाम केलाच पाहिजे. 
- धनश्री कोकरे, 
मार्गदर्शिका, सांगली

मी कापड व्यापारी आहे. कंबर दुखायची. वजनही वाढले होते. चार वर्षे व्यायामशाळेत जातेय. खूपच फायदा झाला. महिलांनी नियमित व्यायाम केलाच पाहिजे.
- मिनाज डिग्रजे, मिरज

चार वर्षे फक्त महिलांसाठी व्यायामशाळा चालवतेय. स्वतंत्र जिममध्ये त्या सुरक्षित फील करतात. त्यांना शास्त्रोक्त प्रशिक्षण, आहारविषयक मार्गदर्शन, मानसिक स्वास्थ्यासाठी समुपदेशन या तिन्ही गोष्टींची गरज असते. ही त्रिसूत्री सांभाळली की तंदुरुस्तीचे प्रमाण वाढते.
- प्राची इनामदार, बालाजी जिम, मिरज

महिला जिमची वैशिष्ट्ये
झुम्बा नृत्य, यंत्रावरील व्यायाम, एरोबिक्‍स, योगासने, गरोदरपणासाठी व्यायाम आणि आहार नियोजन.

 

Web Title: Sangli News women Jim special story