महिला सुरक्षेचे फक्त भाषण, कुठाय ॲक्‍शन?

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 सप्टेंबर 2017

वाळवा तालुक्‍यातील भाटवाडीतील बारावीत शिकणाऱ्या युवतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून टवाळखोर तरुणांकडून सातत्याने होणाऱ्या त्रासाविरुद्ध दाद मागितली. तिच्या पत्राने जिल्हाभरातील शाळा, महाविद्यालयांत शिकणाऱ्या मुली, युवतींच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न पुन्हा चर्चेत आला आहे.

वाळवा तालुक्‍यातील भाटवाडीतील बारावीत शिकणाऱ्या युवतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून टवाळखोर तरुणांकडून सातत्याने होणाऱ्या त्रासाविरुद्ध दाद मागितली. तिच्या पत्राने जिल्हाभरातील शाळा, महाविद्यालयांत शिकणाऱ्या मुली, युवतींच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न पुन्हा चर्चेत आला आहे.

‘घरातून निघालेली मुलगी संध्याकाळी सुरक्षित परतेल का’, या काळजीचे जाळे घरोघरी ‘निर्भया’ प्रकरणानंतर विणले गेलेय. बहुतांश शहर, गावांत टवाळखोरीचा त्रास होत असल्याचे अनुभव आहेत. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी त्याविरुद्ध भाषणांतून आक्रमक पवित्रा जाहीर केला; मात्र वास्तवात कारवाईत आक्रमकता दिसली नाही. आता पुरे झाले भाषण, घ्या कडक ॲक्‍शन, असेच म्हणण्याची वेळ आली आहे.  

गेल्या आठ-दहा महिन्यांपासून टवाळखोर तरुणांची एक टोळी कॉलेजला जाताना त्रास देतेय, अशी तक्रार एका युवतीने पोलिसांकडे केली. पोलिसांनी त्यांना बोलावून घेतले, गावकऱ्यांसोबत चर्चा केली. मुलांना ताब्यात घेऊन सोडून दिले. पुन्हा त्यांनी डोके वर काढले आहे. पुन्हा छळ सुरू झाला आहे. त्यामुळे तिने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून ‘मी कॉलेजला जाऊ की नको?’ असा सवाल केला. भाटवाडी गावातील युवतीचे हे प्रातिनिधिक उदाहरण. सांगली, मिरज आणि जिल्ह्यात शाळा, कॉलेजच्या आवारांत हा प्रकार प्रचंड वाढल्याचे मुलींनी ‘सकाळ’शी बोलताना स्पष्ट केले. ही टवाळखोरी रोखण्यासाठी पोलिसांनी निर्भया पथके नेमली आहेत. त्याचा काहीअंशी फायदा होतोय; मात्र कुणी तक्रार केली तर त्याविरुद्ध कडक ॲक्‍शन होत नाही, असा अनुभव आहे. विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी प्रत्येक भाषणात यावर कडक भूमिकेची ग्वाही दिली; मात्र सुधारणा शून्य. प्रत्यक्ष कारवाईचा दणका दिल्याशिवाय टवाळखोरांना जाग येणार नाही.  

कुणाचा दबाव आहे?
भाटवाडी गावातील त्या प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेविषयी प्रश्‍नचिन्ह उभे राहिले आहे. पोलिस ठाण्यात युवतीने तक्रार दाखल केल्यानंतर सदर मुलांना चौकशीला बोलावले होते. त्यांतील एकजण पोलिसांच्या देखत मुलीच्या वडिलांच्या अंगावर धावून गेला. पोलिसांनी त्याला दरडावलेदेखील नाही... नेमका कुणाचा दबाव आहे पोलिस यंत्रणेवर?

‘त्या’ पत्रावर काम होईल?
जिल्हाधिकारी विजयकुमार काळम यांनी महापालिका आयुक्त आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र लिहून ‘शाळकरी लेकी सुरक्षित आहेत का?’ असा सवाल केला आहे. त्याच्या सर्वेक्षणाच्या सूचना दिल्या आहेत. या पत्रावर तरी काम होईल का, याकडे लक्ष असणार आहे.

‘मसुचीवाडी’ची पुनरावृत्ती
वाळवा तालुक्‍यातील मसुचीवाडी येथील शाळकरी मुलींची शेजारील बोरगावात शाळेला जाताना छेडछाड केली जात होती. त्यामुळे ग्रामसभेने ठराव घेऊन मुलींना शाळेत न पाठवण्याचा निर्णय वर्षापूर्वी घेतला होता. राज्यभर हे प्रकरण चर्चेत आले. राज्य महिला आयोगाने याची दखल घेतली. पोलिसांनी या प्रकरणात संबंधितांवर कारवाई केली. त्यानंतर पुन्हा एकदा भाटवाडीत मसुचीवाडीची पुनरावृत्ती घडली आहे.

‘सकाळ’ने फोडली ‘ती’च्या प्रश्‍नाला वाचा
भाटवाडीतील युवतीने मुख्यमंत्री, विशेष पोलिस महानिरीक्षक, जिल्हा पोलिस अधीक्षक या तिघांनाही पत्र लिहिले; मात्र त्यावर काहीच ॲक्‍शन झाली नाही. पोलिस अधीक्षकांनी शनिवारी ‘हा विषय मला माहितीच नाही’, असे स्पष्ट केले. ‘सकाळ’ने तिच्या प्रश्‍नाला वाचा फोडली. ते पत्र प्रसिद्ध झाल्यानंतर यंत्रणा हलली. पोलिस उपअधीक्षकांसह फौजफाटा गावात गेला, गावकऱ्यांशी चर्चा केली. 

पोलिसांकडे तक्रार झाल्यानंतरही तिला त्रास होत असेल, तर प्रकरण गंभीर आहे. ‘स्वाभिमानी’चे कार्यकर्ते त्यात लक्ष घालून, तिला साथ देताहेत. अशा प्रकरणांत पोलिसांनी तत्काळ कारवाई केली पाहिजे. भाटवाडीतील प्रकरणात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी  मी बोलतोय. त्या मुलीला सुरक्षित वातावरणात कॉलेजला जाता येईल, अशी व्यवस्था करू.
-  राजू शेट्टी, खासदार

ज्या ठिकाणी कॉलेज आहेत, तेथे पोलिसांनी जागता पहारा दिला पाहिजे. अशा प्रकारच्या तक्रारी आल्यानंतर वास्तविक कडक भूमिका घेऊन कारवाई करायला हवी. मी स्वतः या प्रकरणात लक्ष घालतोय. त्या मुलीला भविष्यात त्रास होणार नाही, याची खबरदारी आम्ही घेऊ.
-आमदार जयंत पाटील, राष्ट्रवादीचे नेते

 

Web Title: sangli news Women's Security issue