शड्डू घुमतोय... पण आघाडीचा मल्ल कुठाय?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 मे 2018

सांगली - एकेकाळी कुस्तीमध्ये देशभरात दबदबा असलेल्या जिल्ह्यात आघाडीच्या मल्लांची पोकळी जाणवत आहे. त्यामुळे कोल्हापूर, सोलापूर, साताऱ्यासह उत्तरेकडील मल्ल अलीकडे पहिल्या क्रमांकाच्या कुस्तीत खेळताहेत. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटीलनंतर आघाडीचा मल्ल कोण? असा प्रश्‍न आहे. अपवाद वगळता इतर तालमीतील राजकीय अड्डा बंद करण्याची गरज आहे.

सांगलीचा ‘काळा पहाड’ व्यंकाप्पा बुरूड, वज्रदेही हरिनाना पवार, भारतभीम जोतिरामदादा सावर्डेकर, हिंदकेसरी मारुती माने आदींपासून ते अलीकडचा डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटीलपर्यंत शेकडो मल्लांनी कुस्तीची परंपरा अखंड ठेवली. सांगली कुस्ती पंढरीही बनली होती. शहरांसह खेड्यापाड्यात तालमीत आजही पहाटेपासून शड्डूचा आवाज घुमतोय. दुष्काळी आटपाडीतही मल्ल घडताहेत.

जिल्ह्यात शेकडो मल्ल खेळतात. अनेकांमध्ये कौशल्य आहे. परंतु, मोठ्या वजनी गटातील तुल्यबळ मल्लांची उणीव भासते. ज्यांच्यात क्षमता आहे, त्यांना आर्थिक परिस्थितीशी प्रथम कुस्ती करावी लागते. तर ज्यांची परिस्थिती असते, त्यांच्यात मानसिकतेचा अभाव दिसतो. तसेच मोठ्या गटात खेळताना दुखापतींना सामोरेही जावे लागते. अपवाद वगळता मल्ल दत्तक घेण्याची इथली परंपरा खंडित होत आहे. या सर्वांवर मात करून मल्ल घडवण्याचे खडतर आव्हान तालमी आणि वस्तादांपुढे आहे.  

चंद्रहारनंतर कोण?
तालमीतून अनेक मल्ल खेळतात ही वस्तुस्थिती असली तरी चंद्रहारनंतर दबदबा निर्माण करणारा मल्ल कोण? असा प्रश्‍न आहे. कुस्ती मैदानात, स्पर्धात खेळणाऱ्या चंद्रहार पाटील, अण्णा कोळेकर यांनी विश्रांतीचा निर्णय घेतला आहे. सद्य:स्थितीत मोठ्या वजनी गटात खेळणारा मल्लच नसल्यामुळे कोल्हापूर, सोलापूर, सातारा किंवा उत्तरेकडील मल्ल आणून इथली मैदाने भरतात. लाखोंची मैदाने मारून ते मल्ल जातात.

नवोदित मल्लांना प्रायोजकांची उणीव भासते. परिस्थिती नसल्यामुळे मल्ल ऐन उमेदीत नोकरीकडे वळतात. त्यामुळे आघाडीचे मल्ल निर्माण करण्याचे आव्हान आहे. मल्लांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे.
- राहुल नलवडे , 
कुस्ती प्रशिक्षक

Web Title: Sangli News Wrestling situation in District special