सोनसळला चौरंगीनाथ यात्रेला हजारो भाविकांची उपस्थिती 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

कडेगाव - सोनसळ (ता. कडेगाव) येथील आराध्य दैवत श्री चौरंगीनाथाची यात्रा आज श्रावणातील शेवटच्या सोमवारी हजारो भाविकांच्या उपस्थितीत व भक्तिपूर्ण वातावरणात झाली. "चौरंगीनाथाच्या नावानं चांगभलं'च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. 

कडेगाव - सोनसळ (ता. कडेगाव) येथील आराध्य दैवत श्री चौरंगीनाथाची यात्रा आज श्रावणातील शेवटच्या सोमवारी हजारो भाविकांच्या उपस्थितीत व भक्तिपूर्ण वातावरणात झाली. "चौरंगीनाथाच्या नावानं चांगभलं'च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. 

गावच्या पश्‍चिमेला डोंगरावर चौरंगीनाथाचे मंदिर आहे. श्रावणाच्या शेवटच्या सोमवारी येथे यात्रा भरते. आज मुख्य दिवस असल्याने पहाटे पाचला काकड आरती झाली. होमहवन आदी विधी झाले. दुपारी दीडच्या सुमारास मच्छिंद्रनाथांच्या पालखीचे चौरंगीनाथ डोंगरावर आगमन झाले. "चौरंगीनाथाच्या नावानं चांगभलं', "मच्छिंद्रनाथाच्या नावानं चांगभलं' असा जयघोष करण्यात आला. दुपारी दोनच्या सुमारास यात्रेनिमित्त भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. 

आज पहाटेपासून मंदिर परिसरात भाविकांनी गर्दी केली होती. सांगली, सातारा जिल्ह्यांतील भाविकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली. दर्शनासाठी रांगा होत्या. मंदिर व परिसर भाविकांच्या गर्दीने फुलला होता. यात्रेनिमित्त आयोजित पालखी सोहळ्यासही भाविकांची गर्दी होती. यात्रेनिमित्त येथे मोठ्या प्रमाणात खेळणी व पेढे, मिठाईची दुकाने थाटण्यात आली होती. यात्रेचे औचित्य साधून मंदिरावर रोषणाईही करण्यात आली होती. यात्रा कमिटीतर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. आमदार डॉ. पतंगराव कदम, मोहनराव कदम, भारती विद्यापीठाचे कार्यवाह डॉ. विश्‍वजित कदम, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शांताराम कदम यांनी आज चौरंगीनाथाचे दर्शन घेतले.

Web Title: sangli news yatra