सळसळत्या उत्साहात ‘यिन’साठी मतदान

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 ऑगस्ट 2017

दुसऱ्या टप्प्यालाही उत्स्फूर्त प्रतिसाद - निवडक महाविद्यालयात राबविली प्रक्रिया; काही ठिकाणी बिनविरोध निवड

दुसऱ्या टप्प्यालाही उत्स्फूर्त प्रतिसाद - निवडक महाविद्यालयात राबविली प्रक्रिया; काही ठिकाणी बिनविरोध निवड

सांगली - गेल्या दहा दिवसांपासून कॉलेज कॅम्पसमध्ये एकच चर्चेला उधाण आले आहे. ‘यिन’ची निवडणूक.... निवडणुकीला कोण उभारणार इथपासून आजच्या शेवटच्या क्षणापर्यंत ईर्षा दिसून आली. मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यात आज जिल्ह्यातील निवडक महाविद्यालयात ही प्रक्रिया राबवण्यात आली. सकाळापासून मतदानासाठी रांगा अन्‌ तरुणाईचा सळसळता उत्साह अखेरपर्यंत कायम होता. तर काही महाविद्यालयात प्रतिनिधींची निवड थेट प्राचार्यांनी केल्याने बिनविरोध निवडी झाल्या. ‘डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन’च्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कतर्फे (यिन) निवडणुका घेण्यात आल्या.

महाविद्यालयातील नेतृत्वाला वाव देणाऱ्या ‘यिन’ प्रतिनिधीपदाच्या निवडणुकीत ईर्षेने मतदान झाले. काल (ता. १०) शहरातील निवडक महाविद्यालयात ही प्रक्रिया राबवण्यात आली. आज दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्यातील महाविद्यालयात मतदान घेण्यात आले. इस्लामपूर येथील श्रीमती मालतीताई वसंतदादा पाटील कन्या महाविद्यालयात आज चुरशीने मतदान झाले. सकाळी दहाच्या ठोक्‍याला मतदानाला सुरवात झाली. दोन तास ही प्रक्रिया सुरू होती. विद्यार्थ्यांनी ग्रुपने मतदान केले. मतदानासाठी युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला. मतदान प्रक्रियेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य अंकुश बेलवटकर यांनी मोलाचे सहकार्य केले. तरुणाईने केवळ मतांची बेरीज न करता ही प्रक्रिया समजून घेण्यावर भर दिला. आजवर बोटाला कधीही शाई लागलेली नाही, अशा तरुणाईने कुणाला मतदान करायचे, याचा निर्णय घेतानाही सारासार विचार केला. आपले नेतृत्व कुणी करावे, याविषयी त्यांनी ठामपणे एकमेकांशी भूमिका शेअर केल्या. त्याचे प्रतिबिंब मतदानातून उमटताना दिसले. नावनोंदणी, मतदान केल्याची खूण म्हणून शाई लावणे आणि मतपत्रिका घेऊन मतदान असे टप्पे होते. मुलींचा उत्साह वाखाणण्याजोगा होता.

इथे बिनविरोध निवड....
दरम्यान, जिल्ह्यातील काही महाविद्यालयात मुलाखतीद्वारे थेट प्राचार्य नियुक्त ‘यिन’ प्रतिनिधींची निवड करण्यात आली. त्यात वारणा महाविद्यालय (ऐतवडे खुर्द), शिवाजीराव देशमुख इन्स्टिट्युट (शिराळा), कन्या महाविद्यालय (मिरज), श्रीमती राजमती नेमगोंडा पाटील, भारती विद्यापीठाचे न्यू लॉ कॉलेज (सांगली) या महाविद्यालयांचा सहभाग होता. 

महाविद्यालयांचा प्रतिसाद 
वारणा महाविद्यालय (ऐतवडे खुर्द) येथे प्राचार्य डॉ. डी. के. पाटील, प्रा. संतोष जाधव, तर शिवाजीराव देशमुख इन्स्टिट्युट (शिराळा) येथे प्राचार्य अमित साळुंखे यांनी सहकार्य केले. कन्या महाविद्यालय (मिरज) येथे प्राचार्य आर. पी. झाडबुके, प्रा. जे. पी. चंदनशिवे, प्रा. एम. एम. कुलकर्णी, श्रीमती राजमती नेमगोंडा पाटील येथे प्राचार्य मानसी गानु, प्रा. स्नेहल पाटील, तर भारती विद्यापीठाचे न्यू लॉ कॉलेज (सांगली) येथे डॉ. पी. पी. नारवाडकर या सर्वांचे बहुमोल सहकार्य लाभले.

आज निकाल...
गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यातील निवडक महाविद्यालयात ‘यिन प्रतिनिधी’ पदासाठी निवडणूक घेण्यात आली. उद्या (ता.१२) सकाळी ११ वाजता सकाळच्या सांगली विभागीय कार्यालयात मतमोजणी होणार आहे. त्यामुळे आपल्या महाविद्यालयात कोण निवडणून येणार याची उत्स्कुता लागली आहे. उमेदवारांनी वेळेपूर्वी अर्धा तास उपस्थित रहावे.
 

‘यिन’ टीमचे नियोजन

‘यिन’चे जिल्हा समन्वयक विवेक पवार यांच्यासह प्रशांत जाधव, ओंकार पवार, इंद्रजित मोळे, महंमद मोमीन, पांडुरंग गयाळे, शारंगधर पाटील, माधुरी डोंगरे, सुप्रिया घोरपडे, केतन अनुसे, आशुतोष वाकळे. 

Web Title: sangli news yin election