सांगलीत शाळा, अनाथाश्रमात पुस्तके भेट देऊन "यिन'चा तिसरा वाढदिवस

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 ऑगस्ट 2017

विद्यार्थ्यांनी पॉकेटमनीत बचत करून केला सामाजिक उपक्रम

विद्यार्थ्यांनी पॉकेटमनीत बचत करून केला सामाजिक उपक्रम
सांगली - येथील बाल कामगार मुलांची शाळा व वेलणकर अनाथाश्रमात पुस्तके भेट देऊन "सकाळ'च्या यंग इन्स्पिरेटरर्स नेटवर्कने (यिन) आपला तिसरा वाढदिवस साजरा केला. "जिथे बदलाचा विचार, तिथे "यिन'चा संचार', असा नारा देत तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनलेल्या तरुणाईने जल्लोष केला. फुगे, फलक आणि रिबन बॅंडने सजलेल्या "सकाळ' विभागीय कार्यालयात तरुणाईंच्या उत्साहाने वातावरण फुलून गेले होते. विशष म्हणजे आपल्या पॉकेटमनीत बचत करून विद्यार्थ्यांनी दोन संस्थांना मदत करून हा सामाजिक उपक्रम केला.

"ऊठ तरुणा जागा हो, "यिन'चा धागा हो', असा आवाज देत ही चळवळ अधिक व्यापक करण्याचा संकल्प करण्यात आला. आपल्या पॉकेट मनीतले पैसे वाचून निराधारांना मदत करण्याचा संकल्प यिन सदस्यांनी केला होता. त्यानुसार येथील वाल्मीकी आवासमधील झोपडपट्टीत राहणाऱ्या कष्टकरी कामगार वर्गाच्या बालकामगार शाळेतील मुलांशी यिनच्या सदस्यांनी आज संवाद साधला. येथे दीडशे पुस्तकांचा संच देऊन मिठाई वाटप केली. शाळेची संपूर्ण माहिती मुख्याध्यापक शिवाजी त्रिमुखे यांनी दिली. तेथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यही "यिन'च्या सदस्यांनी दिले. गोष्टी, सामान्य ज्ञान, प्रेरणादायी चरित्रे अशा पुस्तकांचा समावेश होता. मुलंही पुस्तके वाचनात बुडून गेली होती. आज वेलणकर बालक आश्रमात खाऊ वाटप आणि उपयोगी साहित्य आणि साड तीनशे पुस्तकांचा संच भेट देण्यात आला. या पुस्तकांतून येथे ग्रंथालय निर्मितीचाही संकल्प केला."यिन' सदस्यांनी मुलींसमवेत भरपूर गप्पा मारल्या. त्यावेळी गप्पा, गोष्टी आणि गाणी असा छान संगमही जोडला गेला. निधी संकलनात मिरजेतील डॉ. बापूजी साळुंखे महाविद्यालयातील "यिन' सदस्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. तसेच ग्रंथालयासाठी जिल्ह्यातील विविध महाविद्यालये आणि "यिन' सदस्यांनी पुस्तके संकलित केली. यावेळी आश्रमाच्या अधीक्षिका अनुराधा डुबल, आरती तळवळकर, स्मिता सपकाळ, शीला ओहल, रेश्‍मा पाटील, अनिल तगारे उपस्थित होते.

"सकाळ'चे सहयोगी संपादक शेखर जोशी यांच्या उपस्थितीत केक कापून तरुणाईने "यिन'चा "हॅप्पी बर्थ डे' साजरा केला. यावेळी वरिष्ठ व्यवस्थापक (जाहिरात) उदय देशपांडे उपस्थित होते. जणू कुटुंबातील सोहळा असल्याचा आनंद त्यांच्यात ओसंडत होता. सकाळपासून तरुण-तरुणी सजावटीत रमली होती. फुगे बांधले होते. रिबीन बांधली जात होती.

वर्षभरात "यिन'ने सांगलीतील शासकीय रुग्णालयात रुग्णांसोबत दिवाळी केली. शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी रक्तदान शिबिर झाले. "पक्षी वाचवा' मोहिमेत "यिन'ने सक्रिय सहभाग घेतला. तसेच आमराईत फुलपाखरांचे उद्यान उभारणीसाठी "यिन'चा सहभाग होता. तसेच जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिसप्रमुख, पोलिस उपाधीक्षक, महापालिकेचे आयुक्त, आमदारांशी थेट संवाद साधत परिवर्तनासाठी आवाज दिला."व्हा बिनधास्त' हा मानसोपचार तज्ज्ञांशी संवाद कार्यक्रम झाला. महिला दिन व परिचारिका दिन केला. तसेच महापालिकेच्या वृक्षारोपण मोहिमेतही उत्स्फूर्त सहभाग सदस्यांनी नोंदवला. सेवा सदन लाईफ लाईनतर्फे प्रथमोपचाराचे प्रात्यक्षिक शिबिरही प्रत्येक महाविद्यालयांतील सदस्यांसाठी घेण्यात आले.

"यिन'चे समन्वयक विवेक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशांत जाधव, ओंकार पवार, मोहम्मद मोमीन, साजिद महात, पौर्णिमा उपळावीकर, मृण्मयी माळी, प्रियांका गोडबोले, स्नेहल ढेरे, माधुरी डोंगरे, वृषाली रजपूत, अक्षय बावरे, मनीषा पवार, प्रणोती देसाई, श्रुती गाडवे, आरती कोरेगावे, कविता शिरसाठ, राधिका घोरपडे, मोनिका पाटील यांनी उपक्रमांचे नेटके संयोजन केले.

सहभागी कॉलेज आणि प्रतिनिधी
* शिवाजीराव देशमुख इन्स्टिट्यूट (शिराळा)- सत्यजित कदम
* बळवंत महाविद्यालय (विटा)- आरमान जमादार
* जी. ए. कॉलेज, सांगली-इंद्रजित मोळे
* वारणा महाविद्यालय (ऐतवडे)- श्रीकांत गायकवाड
* भारती विद्यापीठ न्यू लॉ कॉलेज, सांगली- मकरंद शेंडे
* भारती विद्यापीठ इन्स्टिट्यूट, सांगली- विनायक सूर्यवंशी
* राजमती कन्या महाविद्यालय- सुरेखा पाटील
* मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालय- निकिता शिंदे
* एन. डी. पाटील नाईट कॉलेज- पांडुरंग गयाळे

Web Title: sangli news yin third birthday