इस्लामपुर पेठ रस्त्यालगत कापुरवाडीत युवकाचा खून

शांताराम पाटील 
बुधवार, 21 मार्च 2018

इस्लामपुर - इस्लामपुर पेठ रस्त्यालगत कापुरवाडी (पेठ) येथील चारचाकी गाड्यांच्या गॅरेजच्या इमारतीच्या स्लॅबवर एका विवाहित युवकाचा खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे. अमित मोहन विरकर (वय ३५ ) असे या युवकाचे नाव आहे. 

इस्लामपूर - कपड्याच्या उधारी वसुलीसाठी मोटारसायकल काढून घेतल्याचा राग मनात धरून दोघाजणांनी येथील अमित मोहन वीरकर (वय ३०, रा. किसाननगर, इस्लामपूर, सध्या शिराळा) याचा डोक्‍यात बीअरची बाटली घालून व गळा आवळून खून केला. सोमवारी रात्री नऊच्या सुमारास हा खून झाला असावा.  तो  काल दुपारी उघडकीस आला. 

त्यानंतर काही तासांतच इस्लामपूर पोलिसांनी दोघा संशयितांना इस्लामपूर येथून ताब्यात घेतले. खुनाचा संशय असलेल्या दोघांपैकी एकजण पुणे येथे सैन्यात क्‍लार्क आहे. तो दोन दिवसांसाठी सुटीवर आला होता. महेश हणमंत तेवरे (फौजी, वय ३०) व राहुल दिलीप तेवरे (वय ३२ दोघे रा. जावडेकर चौक इस्लामपूर) अशी खून केलेल्या दोघा संशयितांची नावे आहेत. 

याबाबत अधिक माहिती अशी, महेश व राहुल तेवरे हे दोघे सख्खे चुलत भाऊ आहेत. तसेच दोघेही अमित वीरकरचे जवळचे मित्र आहेत. अमितने गेल्या काही महिन्यांपूर्वी शिराळा येथे कोहिनूर कलेक्‍शन हे कपड्याचे दुकान सुरू केले आहे. या दुकानातून महेश व राहुल तेवरेने दीपावलीला २६ हजारांची कपडे उधारीवर आणली होती. त्यानंतर दोघांनीही आजअखेर अमितची उधारी दिलेली नाही. यातून त्यांच्या मैत्रीमध्ये कटुता निर्माण झाली होती. उधारी वसुलीसाठी अमित वीरकरने राहुलची दुचाकी काही दिवसांपूर्वी काढून घेतली होती. दुचाकी काढून घेतल्यानंतर राहुल व त्यांच्या भावकीतील संजय तेवरे (रा. इस्लामपूर) हे दोघेजण अमितचा भाऊ अमोल वीरकर याच्याकडे गेले. लवकरच उधारी देतो असे म्हणून गाडी परत घेऊन आले. त्यानंतर उधारी आजअखेर न दिल्याने अमितचा त्यांच्यामागे वसुलीसाठी तगादा सुरू होता. यातूनच सोमवारी सकाळी उधारी वसुलीसाठी अमितने तेवरेंना फोन केला.

राहुल व महेश या दोघांनी सायंकाळी ये, उधारी देतो असे सांगितले. त्यानुसार अमित शिराळ्याहून इस्लामपूरला सोमवारी सायंकाळी आला. तिघांची भेट झाली. तिघेजण इस्लामपूर येथे मिळून दारू प्यायले. त्यानंतर बीअरच्या बाटल्या व चकना घेऊन हे तिघेजण आणखी दारू पिण्यासाठी पेठ-इस्लामपूर रस्त्यालगत कापूरवाडी हद्दीत असलेल्या महेश तेवरेच्या गॅरेजवर गेले. गॅरेजच्या स्लॅबवर जाऊन दारू पीत बसले. यावेळी त्यांचा वाद  सुरू झाला. या वादातूनच अमितच्या डोक्‍यात दोघांनी बीअरची बाटली फोडली व त्याचा दोरीने गळा आवळून खून केला. खून केल्यानंतर हे दोघेजण तेथून पसार  झाले. 

बराच वेळ झाला. अमित घरी आला नाही म्हणून अमितच्या शोधासाठी त्याचा भाऊ अमोल घरातून बाहेर पडला. शोधाशोध सुरू केली. यावेळी चुलत भाऊ संजय मधुकर वीरकर यांना अमित, महेश व राहुल तेवरे सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास शिवपार्वती थिएटर जवळील पांचाली बार समोर उभे असल्याचे दिसले होते. त्यानुसार राहुल व महेशच्या घरी अमोल चौकशीसाठी गेला. त्यावेळी ते दोघेही घरात नव्हते. त्यानंतर अमोल हा महेश तेवरे याच्या पेठ-सांगली रस्त्यावरील ओमसाई गॅरेजवर शोध घेत गेला. 

गॅरेजच्या टेरेसवर गेला असता अमित वीरकर रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत पडल्याचे दिसून आले. या बाबतची फिर्याद अमोल यांनी इस्लामपूर पोलिस ठाण्यात दिली. घटनास्थळी शहरातील युवकांनी प्रचंड गर्दी केली होती. पोलिस निरीक्षक प्रताप मानकर तपास करीत आहेत. अमित वीरकर याचे तीन वर्षांपूर्वी लग्न झाले आहे.  त्याला दोन वर्षांचा मुलगा, पत्नी, वडील, दोन भाऊ असा परिवार आहे.

Web Title: Sangli News Young ester Murder in Islampur Peth