युवक राष्ट्रवादीच्या खांद्यावरून जयंत पाटलांचा निशाणा

बलराज पवार
रविवार, 1 एप्रिल 2018

पदांवरून वादातच पदाधिकारी दंग
शहर जिल्हा संघटनेच्या पदावरून वाद रंगला. शहराध्यक्ष संजय बजाज यांच्याविरोधात विधानसभा क्षेत्राध्यक्ष कमलाकर पाटील यांनी दंड थोपटले आणि जयंत पाटील यांच्या निर्णयाला आव्हान दिले. शिवाय काही नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्षांना पत्र लिहून आपल्या मनातील खदखद मांडली. त्यावर अद्याप काही निर्णय आलेला नाही. पण यामुळे शहर राष्ट्रवादीतील वाद राज्याच्या वेशीवर टांगला गेला. आजही या दोन गटांतील वाद धुमसत आहेच.

सांगली - जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे हल्लाबोल आंदोलन बुधवारी आणि गुरुवारी होत आहे. यानिमित्त नुकत्याच झालेल्या पक्षाच्या बैठकीत  राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील यांनी युवक आघाडीच्या खांद्यावरून वरिष्ठांवर निशाणा साधताना राजकारण ‘जमत नसेल तर पदे सोडा’ असा सज्जड इशारा दिला आहे. गेल्या वर्षभरात पक्षात शिथिलता आल्याने पदाधिकाऱ्यांना जागे करण्यासाठी त्यांनी हा निशाणा साधला. मात्र त्याला वरिष्ठ राष्ट्रवादीचे पदाधिकारी किती गांभीर्याने घेतात ते हल्लाबोल आंदोलनात दिसून येणार आहे.

भाजपने जिल्ह्यावर ताबा घेतल्यानंतर एकेकाळी निर्विवाद वर्चस्व असणाऱ्या राष्ट्रवादीला खिंडार पडत गेले. सर्व प्रमुख संस्था भाजपच्या ताब्यात गेल्या. त्यातच तीन वर्षांपूर्वी माजी मंत्री आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली. ती अद्याप भरून निघालेली नाही. त्यानंतर जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली पक्ष जिल्ह्यात स्थिरावेल असे वाटत होते. पण त्यांनाही पक्षात स्थिरता आणणे शक्‍य झालेले नाही.

वाळवा वगळता जिल्ह्यात राष्ट्रवादीची ताकद कुठल्याही तालुक्‍यात म्हणावी तशी दखलपात्र नाही. सर्व प्रमुख नेते भाजपवासी झाल्याने राष्ट्रवादी खिळखिळी झाली. खरे तर या काळात नव्या तरुणांना संधी देऊन पक्षाला उभारी देण्याची संधी होती. पण त्यादृष्टीने वरिष्ठांकडून कोणतीही पावले टाकली गेली नाहीत. त्यामुळे पक्ष सतत  बॅकफुटवर जात राहिला आहे. 

भाजपने चार आमदार आणि खासदार जिंकल्यानंतर नगरपालिका, ग्रामपंचायती आणि जिल्हा परिषद या सर्व निवडणुकांमधून तळागाळापर्यंत आपले अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना रोखण्याची ताकद राष्ट्रवादी दाखवू शकली नाही. काँग्रेसला सोबत घेऊन ते शक्‍य होते. पण, आघाडी करायची की नाही? या  गोंधळात राष्ट्रवादी आपले अस्तित्वच हरवत चालली आहे.

युवक राष्ट्रवादी जोमात
युवक राष्ट्रवादीच्या कामावरून जयंत पाटील यांनी कळ काढली. पण, गेल्या वर्षभरात युवक राष्ट्रवादीने जिल्ह्यात सुमारे अडीचशे नवीन शाखा सुरू केल्या. वाढती महागाई, म्हैसाळचे पाणी अशा मुद्द्यांवरून त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चेही काढले. युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांनी  तीन वेळा जिल्हा दौरा केला. या तुलनेत वरिष्ठ राष्ट्रवादी कोमातच होती. एकीकडे राज्यात स्वत: शरद पवार यांच्यासह अजितदादा, सुप्रिया सुळे, जयंत पाटील हे सर्व नेते सत्ताधाऱ्यांविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करत असताना जिल्हा राष्ट्रवादीत मात्र शांतता होती. शेतकऱ्यांची कर्जमाफी, महागाई, शेतकरी आत्महत्या, नोटबंदी, ताकारी, म्हैसाळचा प्रश्‍न यापैकी कोणत्याही विषयांवर वरिष्ठ राष्ट्रवादीकडून आवाज उठवला गेला  नाही. त्यामुळे गेल्या वर्ष-दोन वर्षांत राष्ट्रवादी कोमात गेली काय? असे वाटण्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे.

हल्लाबोलची तयारी मंदगतीने
जिल्ह्यात हल्लाबोल आंदोलन सभा बुधवारी आणि गुरुवारी होणार आहे. त्याची तयारी ग्रामीण भागात सुरू आहे. इस्लामपूर येथील सभेची तयारी जोरदार सुरू  आहे. पण, सांगली आणि मिरज या दोन शहरात होणाऱ्या सभेची तयारी अजून दिसत नाही. महापालिका निडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर या दोन सभा होत आहेत. दोन्ही सभा यशस्वी करा, असे आवाहन जयंत पाटील यांनी केले आहे. मात्र त्या दृष्टीने शहर राष्ट्रवादी अजून तयारीला लागल्याचे दिसत नाही. या दोन्ही सभांना गर्दी गोळा करा, अशा सूचना नेत्यांनी दिल्या आहेत. पण त्याकडे डोळेझाक केल्याचे दिसत आहे. अजितदादा, सुप्रियाताई यांच्यासारखे नेते असल्याने गर्दी होणारच  अशी अटकळ बांधून गर्दी जमवण्याच्या नादाला लागण्याची गरज नाही, असे पदाधिकाऱ्यांना वाटते.

जयंतराव उघड बोलण्याचे धाडस करा
युवक राष्ट्रवादीच्या मिरज तालुक्‍यातील पदाधिकाऱ्याने वरिष्ठांकडून सहकार्य मिळत नसल्याची तक्रार केल्यानंतर जयंत पाटील यांनी ‘राजकारणात अडचणी येतातच, जमत नसेल तर पद सोडा’ असा इशारा दिला. पण वरिष्ठ राष्ट्रवादीत आलेल्या शिथिलतेबद्दल त्यांनी उघडपणे कानपिचक्‍या देण्याची गरज आहे. केवळ त्यांच्या दौऱ्यात त्यांच्याभोवती पिंगा घालणे इतकेच काम शहरातील पदाधिकारी करत आहेत. त्यामुळे महापालिकेत विरोधी पक्षनेतेपद असूनही राष्ट्रवादीचा ठसा उमटलेला नाही.  यावर आताच रामबाण उपाय शोधला काही, तर येणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादी अडचणीत येऊ शकते.

Web Title: sangli news youth ncp jayant patil politics