पोलिस दलातही झिरो पेंडन्सी उपक्रम राबवण्याचा निर्णय

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 डिसेंबर 2017

सांगली - महसूल विभागापाठोपाठ पोलिस दलातही झिरो पेंडन्सी उपक्रम राबवण्याचा निर्णय अधीक्षक सुहेल शर्मा यांनी घेतला आहे. या निर्णयामुळे पोलिसांची टेंडन्सी बदलण्यात मदत होणार आहे. या उपक्रमातून नागरिकांना वेळेत ना हरकत प्रमाणपत्र मिळण्यासह प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी मदत होणार आहे.

सांगली - महसूल विभागापाठोपाठ पोलिस दलातही झिरो पेंडन्सी उपक्रम राबवण्याचा निर्णय अधीक्षक सुहेल शर्मा यांनी घेतला आहे. या निर्णयामुळे पोलिसांची टेंडन्सी बदलण्यात मदत होणार आहे. या उपक्रमातून नागरिकांना वेळेत ना हरकत प्रमाणपत्र मिळण्यासह प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी मदत होणार आहे. पोलिसांसह पोलिस ठाणेही स्मार्ट होणार आहेत. त्याची काटेकोर अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. 

महसूल विभागातील झिरो पेंडन्सी उपक्रमामुळे प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यास गती आली. त्यामुळेच आता हा उपक्रम पोलिस दलातही सुरू करण्यात आला आहे. सांगली पोलिस दलात वर्षारंभी हा उपक्रम सुरू केला जाणार आहे. पोलिस ठाण्यात दाखल होणाऱ्या तक्रारीचे वेळेत निर्गत होणार आहे. नागरिकांना वेळेत सेवा  देण्याचा दबाव आता पोलिसांवर राहणार आहे. अदखलपात्र गुन्हांवर कारवाई करणे, स्थानिक अर्जांचा तपास, पासपोर्ट व्हेरिफिकेशन, कार्यक्रमांची परवानगी देणे, शस्त्र परवाना, दाखल गुन्हे वेळेत कोर्टात हजर  करणे अशा कामांना गती येणार आहे.

तीन हजार तक्रारी
जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांतील तब्बल तीन हजार तक्रारी दाखल आहे. या उपक्रमांमुळे त्याचे निवारण होण्यासाठी आता गती येईल. 

आता लाय डिटेक्‍टर अन्‌ ब्रेन मॅपिंग

गुन्ह्यातील तपासासाठी पोलिसांकडून लाय डिटेक्‍टर, ब्रेन मॅपिंग आणि कॉल रेकॉर्डचा अधिक वापर केला जाणार आहे. नव्या यंत्रणांचे वापर होणार असून गुन्हेगारांचा जरब बसणार आहे. 

अनिकेत कोथळे प्रकरणानंतर गुन्हा वदवून घेताना कराव्या लागणाऱ्या क्‍लृप्त्यांबद्दल पोलिसांवर आरोप-प्रत्यारोप सुरू झालेत. त्यामुळे तपासात अत्याधुनिक यंत्रणेचा वापर केला जाणार आहे. गंभीर गुन्ह्यातील आरोपींकडून कबुली मिळवण्यासाठी अत्याधुनिक तंत्र-यंत्रणांचा वापर केला जाणार आहे. यापूर्वीही या यंत्रणेचा वापर केला जात  होता. मात्र तो फारच कमी. अधीक्षक सुहेल शर्मा यांनी सूत्रे स्वीकारल्यानंतर पोलिस दलातील बदलांना सुरवात केली आहे. विविध बदल केले जात आहेत. त्याचा हा एक भाग आहे. संशयित गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डसह तपासासाठी विविध यंत्रणांचा वापर केला जाणार आहे.

Web Title: Sangli News Zero pendancy in Police department