झेडपीचा कारभार कसा गोल, शिक्षकांच्या बदल्यांत झोल

झेडपीचा कारभार कसा गोल, शिक्षकांच्या बदल्यांत झोल

सांगली - जिल्ह्याबाहेरून आलेल्या ५१ शिक्षकांना आज समुपदेशनाने शाळा देण्याचा सोपस्कार पार पडला. मात्र त्यानंतर शिक्षकांना शाळा देताना समुपदेशनाच्या नावाखाली झोल झाल्याची चर्चा  झेडपीच्या वर्तुळात सुरू झाली आहे. विशेष म्हणजे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, मुख्यकार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांसमोरच हा प्रकार घडला. वाळवा तालुक्‍यात एकही जागा रिक्‍त नसताना तडजोडी करून काहींना या तालुक्‍यात नेमणुका दिल्याने हा सारा गोलमाल समोर आला आहे.

झेडपीच्या वसंतदादा पाटील सभागृहात दुपारी  आंतरजिल्हा बदल्यांनी जिल्ह्यात दाखल झालेल्या ५१ स्थानिक शिक्षकांना समुपदेशनाने नेमणुका देण्यात आल्या. अर्थात रिक्त जागांच्या प्रमाणात शिक्षक देण्याचे ठरले होते. उपाध्यक्ष सुहास बाबर, सभापती तमणगौंडा रवी-पाटील, अरुण राजमाने, ब्रह्मदेव पडळकर, सुषमा नायकवडी यांच्या समोर ही पारदर्शी प्रक्रिया पार पडली. बदल्यांसाठी पैसे घेणाऱ्यांची संग्रामसिंह यांनी खरडपट्टी काढूनही या विभागात काही फरक पडलेला  दिसत नाही.

प्रत्येक शिक्षकांना समुपदेशनासाठी बोलावले असता त्या ठिकाणी जिल्ह्याच्या बाहेरून आलेल्या शिक्षकांना साधा जिल्ह्याचा नकाशाही पहायला मिळत नव्हता. शिक्षकांना नेमक्‍या किती जागा रिक्त आहेत. आणि त्यांचीही माहिती देण्यात आलेली नव्हती. एकेक शिक्षकांना आत बोलावून मिरज मागितले की जत, आटपाडी, खानापूर तालुक्‍यातील गावांचा पर्याय दिला जात होता. मात्र काही शिक्षकांनी उदाहरणार्थ मिरज आणि वाळवा तालुका मागितला.  अर्थात पदाधिकाऱ्यांच्या कानात बोलणे झाले की त्यांना मागितलेली सोयीची ठिकाणे देऊन सोय केली जात होती, असे चित्र होते.

शिक्षक समुपदेशनासाठी सभागृहात आल्यानंतर सभापती-सदस्य, सदस्य-सदस्य यांच्यात बाचाबाची झाली. जतचे सरदार पाटील, चंद्रकांत पाटील, संभाजी कचरे, नितीन नवले, सुरेंद्र वाळवेकर, शरद लाड, प्रमोद शेडगे हे उपस्थित होते. या सदस्यांनी मागितलेल्या  गावात एखाद्या शिक्षकांची नेमणूक करून त्यांनाही शांत करण्याचा प्रयत्न प्रशासन आणि शिक्षण विभागाने चाणाक्षाने हाताळला. हेही विशेष आहे. 

आंतरजिल्हा बदल्यांनी आलेल्या शिक्षकांना सोयीची ठिकाणे मिळावीत, यासाठी गेली काही दिवस फिल्डिंग लावली जात आहे. याचमुळे जिल्ह्यात आलेले शिक्षक झेडपीत हजर होण्यासाठी टाळाटाळ करीत होते. यामागेही प्रशासकीय सेवेतील काही हुशार अधिकाऱ्यांचीच फूस असल्याची चर्चा आहे. काही एजंटाचाही आठवड्यापासून वावर सुरू होता. आंतरजिल्हा बदल्यांवेळी ना-हरकत प्रमाणपत्रासाठी वीस हजार रुपयांची मागणी केल्याचे उदाहरण ताजे आहे. शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांची संग्रामसिंह यांनी खरडपट्टी काढली. त्यामुळे पैसे घेणाऱ्यांवर पैसे परत देण्याची वेळ आली. 

प्राधान्याने भरावयाच्या रिक्त जागा 
झेडपीच्या शिक्षण विभागाने प्राधान्य क्रमाने भरावयाच्या रिक्त जागांची दिलेली माहिती अशी- जत-१२७, आटपाडी- ५७, कवठेमहांकाळ-१२, तासगाव-१६, खानापूर-४०, कडेगाव-२३, शिराळा-१८, मिरज-२०, पलूस-१ आणि वाळवा तालुका शून्य. 

शिक्षण पुन्हा चर्चेत...
आंतरजिल्हा बदल्यांसाठी ना-हरकत देणे असो, बदल्या असोत किंवा शिक्षकांच्या शाळा तपासणीचा विषय असो. प्रत्येक वेळी शिक्षणच्या निर्णयाला वेगळाच सुगंध येतो. हे सध्या आंतरजिल्हाबदल्यांनी आलेल्या शिक्षकांबाबतही येतो आहे. १५-२० वर्षे परजिल्ह्यात नोकरी केलेले  काही शिक्षक शिरोळ तालुक्‍यात २५ किलोमीटर  अंतरावर होते. सांगलीत आल्यानंतर त्यांना आता  तासगाव तालुक्‍यातील नरसेवाडी सारख्या ३५ किलोमीटरवरील गावात जाण्याची वेळ आली आहे.

जिल्हा परिषदेच्या शिक्षक नेमणूक प्रक्रियेवरच प्रश्‍न चिन्ह उपस्थित होत आहे. सर्वच उपस्थित सदस्य, पदाधिकाऱ्यांना तडजोडी करून शांत करण्याचा हा उद्योग ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’ असा मामला आहे. ज्या वाळवा तालुक्‍यात एकही रिक्‍त जागा रिक्‍त दाखवलेली नाही तेथे प्रशासनाने कोणाच्या सोयीसाठी नेमणुका केल्या?
 -जितेंद्र पाटील, सदस्य, जिल्हा परिषद

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com