पोलिसांची दुसरी कसोटी निर्विघ्न 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 जानेवारी 2017

सांगली - बहुजन क्रांती मोर्चाच्या निमित्ताने आज पुन्हा एकदा पोलिस यंत्रणेची कसोटी लागली. सुमारे हजारावर पोलिसांचा फौजफाटा आज बंदोबस्तात व्यस्त होता. मोर्चाचा मार्ग मोकळा करण्यासाठी वाहतुकीचे नियंत्रण करण्यात आले होते. विविध संघटनांनी मोर्चा मार्गावर पाण्याची व अल्पोपाहाराचीही सोय केली होती. 

सांगली - बहुजन क्रांती मोर्चाच्या निमित्ताने आज पुन्हा एकदा पोलिस यंत्रणेची कसोटी लागली. सुमारे हजारावर पोलिसांचा फौजफाटा आज बंदोबस्तात व्यस्त होता. मोर्चाचा मार्ग मोकळा करण्यासाठी वाहतुकीचे नियंत्रण करण्यात आले होते. विविध संघटनांनी मोर्चा मार्गावर पाण्याची व अल्पोपाहाराचीही सोय केली होती. 

मराठा क्रांती मोर्चाचे काटेकोरपणे नियोजन पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी यापूर्वी केले होते. त्याच पद्धतीने बहुजन क्रांती मोर्चासाठीही नेटका बंदोबस्त तैनात ठेवला गेला. अधीक्षक शिंदे यांनी स्वत: नियोजन केले. मोर्चामध्ये एक अपर अधीक्षक, उपाधीक्षक- 2, निरीक्षक- 19, सहायक निरीक्षक/ उपनिरीक्षक- 72, वाहतूक पोलिस- 96, महिला कर्मचारी- 69, पुरुष कर्मचारी 650, व्हिडिओग्राफर-8 याप्रमाणे बंदोबस्त मोर्चासाठी सकाळपासून सज्ज होता. साध्या वेशात आणि गणवेशात पोलिस सर्वत्र नेमले होते. मोर्चाच्या मार्गाला जोडणारे रस्ते बॅरिकेडस्‌ने अडवले होते. त्या ठिकाणी पोलिस होते. 120 ठिकाणी बॅरिकेडस्‌ लावण्यात आले होते. बॅरिकेडस्‌जवळ सर्व वाहने अडवून सर्वांना पायी सोडले जात होते. 

स्टेशन चौक, आझाद चौक, कॉंग्रेस भवन, राममंदिर, पुष्पराज चौक हा मोर्चाचा प्रमुख मार्ग होता. या मार्गावर मनाई आदेश लागू केला होता. तसेच या मार्गाला जोडणारे सिव्हिल हॉस्पिटल रस्ता, कॉलेज कॉर्नर ते आपटा पोलिस चौकीमार्गे पुष्पराज चौकात येणारा रस्ता, शंभरफुटीकडून पुष्पराज चौकात येणारा रस्ता, धनगर गल्ली ते राममंदिरकडे जाणारा रस्ता येथेही मनाई आदेश होता. तसेच मिरज, तासगाव-विटा, इस्लामपूरहून शहरात येणाऱ्या वाहनांसाठी पर्यायी मार्ग दिला होता. त्यामुळे वाहतुकीचेही नेटके नियोजन दिसून आले. मोर्चाच्या मार्गापासून दूरवर पार्किंगची व्यवस्था केल्यामुळे कोंडी झाल्याचे चित्र दिसले नाही. 

सोशल भिंतींवर "बहुजन' धूम 
फेसबुक, व्हॉटस्‌ऍपवर गेल्या आठ दिवसांपासून बहुजन क्रांती मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले जात आहे. मोर्चामागील उद्देश, बहुजनांच्या मागण्या आदींचे सविस्तर वृत्त गेल्या काही दिवसांपासून शेअर केले जात होते. आजही सकाळपासून मोर्चात सहभागी होण्यासाठी आवाहन केले जात होते. क्षणाक्षणाचे अपडेट विविध ग्रुपवर शेअर केले जात होते. सहभागी झाल्यानंतर सेल्फीही फेसबुक आणि व्हॉट्‌सऍपच्या भिंतींवर अपलोड केल्या जात होत्या. "एक पर्व, बहुजन सर्व' हे वाक्‍य दिवसभर सर्वत्र होते.

Web Title: sangli police bahujan kranti morcha