सांगली : खाकी वर्दीला लाचखोरीचा डाग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 police bribed

सांगली : खाकी वर्दीला लाचखोरीचा डाग

सांगली : पोलिस दलातील तिघेजण लाचेच्या प्रकरणात अडकल्याचे आठवडाभरातील कारवाईने स्पष्ट झाले; तर जानेवारीपासून लाचखोरीच्या तीन गुन्ह्यांत चौघा पोलिसांवर कारवाई झाली आहे. लाचखोरीमध्ये महसूल विभाग आघाडीवर असून त्याखालोखाल पोलिस दल असल्याचे स्पष्ट होते. या आठवड्यात एका हवालदारास लाच प्रकरणात शिक्षा झाली; तर काल जत येथे दोन पोलिस कर्मचाऱ्यांना लाच घेताना पकडले. त्यामुळे खाकी वर्दीतील खाबुगिरी चव्हाट्यावर आली आहे.

जिल्ह्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जानेवारी ते जुलै या सात महिन्यांत विविध विभागांतील लाचखोरीबद्दल १२ कारवाया केल्या आहेत. या कारवाईमध्ये महसूल विभागाच्या चार गुन्ह्यांमध्ये सहाजणांवर कारवाई करण्यात आली. लाचखोरीमध्ये ‘महसूल’च्या खालोखाल पोलिस दलाचा क्रमांक लागतो. सात महिन्यांत लाचखोरीच्या तीन गुन्ह्यांत चार पोलिसांवर कारवाई झाली. मिरजेतील गांधी चौक पोलिस ठाण्यातील सहायक फौजदारास रिक्षावर कारवाई न करण्यासाठी लाच घेताना पकडले.

पलूस पोलिस ठाण्यातील एका हवालदाराचा लाचेच्या प्रकरणात सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे त्याच्यावर आठवड्यापूर्वी गुन्हा दाखल केला; तर काल जत पोलिस ठाण्यातील दोघांवर लाचप्रकरणी गुन्हा दाखल झाला. आठवड्यात तीन पोलिस लाचेच्या गुन्ह्यात अडकल्याचे स्पष्ट झाले; तर एका हवालदारास लाचेच्या गुन्ह्यात शिक्षा झाली.

पोलिस दलातील कर्मचाऱ्यांचे पगार गेल्या काही वर्षांत चांगलेच वाढले आहेत, तरीही ‘वरकमाई’साठी लाचखोर पोलिस मागेपुढे पाहत नाहीत. अशा लाचखोरांना कायद्याच्या कचाट्यात पकडण्यासाठी तक्रारदार धाडस करताना दिसून येत आहे.

तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडूनही तक्रारदारांना सातत्याने आवाहन केले जाते. त्याचा परिणाम म्हणून पोलिस दलातील लाचखोरांविरुद्ध तक्रारदार पुढे येत आहेत. या कारवाईमुळे पोलिसांच्या खाकी वर्दीला लाचखोरीचा डाग लागल्याचे दिसून येते.

...येथे तक्रार करा

लाचेसंदर्भात तक्रार असल्यास दूरध्वनी ०२३३/२३७३०९५ वर हेल्पलाईन क्रमांक १०६४ वर तक्रार करता येते. तसेच व्हॉट्सॲप क्रमांक ७८७५३३३३३३ व मोबाईल क्रमांक ८९७५६५१२६२ वर संपर्क साधण्याचे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केले आहे.

Web Title: Sangli Police Force Bribed Khaki Uniform

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :SanglicrimePolice Bribe
go to top