
विसापूर येथे भरदिवसा जिल्हा बॅंकेची 25 लाखाची रोकड डोळ्यात चटणी टाकून लुटल्याचा प्रकार 14 जून 2019 रोजी घडला होता. या गुन्ह्याचा तपास आव्हानात्मक होता. त्यामुळे तपास करण्यासाठी पोलिस दलातील सर्व शाखांना
आदेश दिले होते.
सांगली - विसापूर येथील जिल्हा बॅंकेची 25 लाखाची रोकड पंजाबच्या सराईत गुन्हेगारांना टीप देऊन भरदिवसा लुटल्याचा प्रकार सांगली पोलिसांनी उघडकीस आणला. पोलिसांनी पंजाबमध्ये वेशांतर करून पगडी बांधून तपास करून या लुटीचा छडा लावला. पंजाबमधील दोघांसह चौघांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक सुहैल शर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिली.
रोकडबाबत टीप देणारा जिल्हा बॅंकेच्या हातनूर शाखेचा कर्मचारी शैलेश शिवाजी गायकवाड (वय 35, बुधगाव), साथीदार सादीक ताजुद्दीन शेख (वय 29, मुळ रा. लालनगर, इचलकरंजी, सध्या गार्डी ता. खानापूर), पंजाबमधील किरण प्रकाश सूर्यवंशी (वय 35, मुळ रा. गार्डी, सध्या, तरणतारण, पंजाब), विक्रमजित सिंग ऊर्फ टिटू महेंद्र सिंग (वय 42, मुस्तफाबाद, अमृतसर
पंजाब) या चौघांना अटक केली आहे. चौघांना सात दिवसाची पोलिस कोठडी मिळाली आहे.
जबरी चोरीच्या छड्याबाबत माहिती देताना अधीक्षक शर्मा म्हणाले, ""विसापूर येथे भरदिवसा जिल्हा बॅंकेची 25 लाखाची रोकड डोळ्यात चटणी टाकून लुटल्याचा प्रकार 14 जून 2019 रोजी घडला होता. या गुन्ह्याचा तपास आव्हानात्मक होता. त्यामुळे तपास करण्यासाठी पोलिस दलातील सर्व शाखांना
आदेश दिले होते. 15 ते 20 दिवस कसून तपास करण्यात आला. तासगाव पोलिसांबरोबर अन्य पोलिस समांतर तपास करत होते. तांत्रिक तपासात गुन्ह्याचे धागेदोरे पंजाबपर्यंत पोहोचले. त्यामुळे जुलैमध्ये जाऊन आले. कसून तपास केल्यानंतर पंजाबमधील रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे स्पष्ट झाले. परंतू पंजाबमध्ये जाऊन सराईतांना ताब्यात घेणे आव्हानात्मक होते.''
ते पुढे म्हणाले, ""पंजाबमधील कामगिरी फत्ते करण्यासाठी नुकतेच पोलिस उपाधीक्षक संदीपसिंग गिल यांच्या नेतृत्वाखाली पथक तिथे पाठवले. पथकाने इतरांनी वेशांतर करून शिखांप्रमाणे पगडी बांधली. संशयितांच्या अड्डयावर पाळत ठेवली. तेव्हा 20 नोव्हेंबरला विक्रमसिंग उर्फ टिटू याला पंजाब
पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. साथीदार किरण सूर्यवंशी याचे नाव सांगितले. त्याला तरण येथे ताब्यात घेतले. दोघांनी साथीदार शैलेश गायकवाड, सादीक शेख याचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे कबुल केले. त्यानुसार 21 रोजी शैलेश, सादीकला अटक केली.''
शैलेश व सादीकला तासगाव न्यायालयात सात दिवस कोठडी मिळाली. त्यानंतर पंजाबमधून तासगावात आणलेल्या किरण सूर्यवंशी व विक्रमसिंगला न्यायालयासमोर हजर केल्यानंतर त्यांना सहा दिवस कोठडी मिळाली आहे. उपाधीक्षक संदीपसिंग गिल, उपनिरीक्षक प्रविण शिंदे, कर्मचारी संदीप गुरव, उदय साळुंखे, अकीब काझी यांच्या पथकाने कामगिरी बजावली. त्यांना निरीक्षक
श्रीकांत पिंगळे, सहाय्यक निरीक्षक सुनिल हारूगडे, शरद माळी, संदीप नलवडे, सागर टिंगरे आदींचे सहकार्य लाभले.
किरण सूर्यवंशी हा शैलेशचा मेहुणा आहे. किरण पंजाबमध्ये गलाई कामासाठी गेल्यानंतर गुन्हेगारी क्षेत्रात शिरला. टिटूच्या टोळीबरोबरही त्याने काम केले आहे. पंजाबमध्ये चोरी, खून, जबरी चोरी, दरोडा, घरफोडी, एनडीपीएस ऍक्ट, आर्म ऍक्टनुसार गुन्हे दाखल आहे. किरणला शैलेशने टीप दिल्यामुळे
ते इकडे आले होते.
सांगली पोलिसांनी आंतरराज्य कामगिरी केल्यामुळे टोळी हाती लागली. या टोळीविरूद्ध मोका लावण्यासाठी कार्यवाही सुरू आहे. आंतरराज्य टोळीवर मोका लावण्याची ही पहिलीच घटना असेल.