सत्तारोहणात दोन मंत्र्यांचा पासंग निर्णायक

जयसिंग कुंभार
गुरुवार, 23 मार्च 2017

भाजपने स्वत:च्या चिन्हावर २५ कमळे फुलवली ही मोठीच कामगिरी आहे; मात्र जिल्हा परिषदेतील भाजपच्या सत्तारोहणाचा मार्ग वाटतो तितका सहजासहजी झालेला नाही. राज्यभरात शिवसेना भाजपविरोधात भूमिका घेत असताना  सांगलीत पूर्ण आणि कोल्हापुरातील शिवसेनेच्या मोठ्या गटाने भाजपसोबत जायच्या घेतलेल्या निर्णयामागे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आणि सांगलीचे पालकमंत्री सुभाष देशमुख या दोन्ही मंत्र्यांनी शेवटच्या क्षणी टाकलेले पासंग महत्त्वाचे आहे. त्याचवेळी जिल्हा परिषदेतील सत्ता ताब्यात घेण्यात पतंगराव कदम आणि जयंत पाटील या दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांनी खरेच गंभीरपणे प्रयत्न केले असे वाटत नाही.

भाजपने स्वत:च्या चिन्हावर २५ कमळे फुलवली ही मोठीच कामगिरी आहे; मात्र जिल्हा परिषदेतील भाजपच्या सत्तारोहणाचा मार्ग वाटतो तितका सहजासहजी झालेला नाही. राज्यभरात शिवसेना भाजपविरोधात भूमिका घेत असताना  सांगलीत पूर्ण आणि कोल्हापुरातील शिवसेनेच्या मोठ्या गटाने भाजपसोबत जायच्या घेतलेल्या निर्णयामागे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आणि सांगलीचे पालकमंत्री सुभाष देशमुख या दोन्ही मंत्र्यांनी शेवटच्या क्षणी टाकलेले पासंग महत्त्वाचे आहे. त्याचवेळी जिल्हा परिषदेतील सत्ता ताब्यात घेण्यात पतंगराव कदम आणि जयंत पाटील या दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांनी खरेच गंभीरपणे प्रयत्न केले असे वाटत नाही. सत्तेची प्रदीर्घकाळची सुस्ती दोन्ही काँग्रेसने अद्यापही झटकलेली नाही, असाही या घडामोडींचा अर्थ आहे.
 

शिवसेनेशिवायही आमची बहुमताची जुळणी पूर्ण झाली आहे, असे जाहीर विधान जिल्हा परिषद अध्यक्षपद निवडीआधी दहा दिवस भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी केले होते. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या हालचालींवर भाष्य करताना मोहनराव कदम यांनी वाटेल ते करावे, असेही ते म्हणाले. श्री. देशमुख यांचे यामागचे गणित काय असावे? जिल्हा परिषद अध्यक्षपदी त्यांचे पुतणे संग्रामसिंह यांनी स्वतःच आधी निवड केली होती. कारण त्यांना आव्हान देऊ शकतील असे एकमेव डी. के. पाटील भाजपमधून निवडून आले होते. मात्र तासगाव आणि कवठेमहांकाळ या होमग्राऊंडवर खासदार संजय पाटील यांचा उडालेला धुव्वा आणि त्याचवेळी पलूस, कडेगाव तालुक्‍यात पृथ्वीराज देशमुख यांनी केलेली प्रबळ कामगिरी पाहता संग्रामसिंहच या पदाचे दावेदार होणार होते. माधवनगरचे शिवाजी डोंगरे जरी दावेदार असले तरी त्यांचे राजकीय बळ आणि त्यांच्यासाठी सांगली-मिरजेचे आमदार किती प्रयत्न करतील हे सर्वज्ञातच होते. या साऱ्या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेकडून दबावाची खेळी झाली तरी ती निस्तरण्यासाठी मंत्री चंद्रकांत पाटील सक्षम होते, याची पक्की जाणीव देशमुख यांना होती. अनिल बाबर यांना सत्तेत घेऊ नये या मताशी भाजपमधील अनेकजण होते. मात्र बाबर यांना सोबत घ्यावे असे चंद्रकांत पाटील यांनी खूप आधीच ठरवले होते. आमदार बाबर यांचा भाजपशी असलेला दोस्ताना शिवसेनेच्या आणि भाजपच्या वरिष्ठ वर्तुळात सर्वज्ञात आहे. त्यामुळे ‘मातोश्री’च्या दूत असलेल्या नीलम गोऱ्हे यांनी सांगली दौऱ्यात भाजपच्या विरोधातील भूमिकेबद्दल बाबर यांना पुरेशी कल्पनाही दिली होती. तरीही भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी ठोकरल्यानंतरही आमदार बाबर यांनी सांगितल्याप्रमाणे स्वतःच्या ‘सोयीची’ भूमिका घेत काँग्रेस-राष्ट्रवादीचा कथित अध्यक्षपदाचा प्रस्ताव फेटाळत भाजपसोबत उपाध्यक्षपदाचा प्रस्ताव स्वतःहून स्वीकारला. त्यांच्या आणि उल्हास पाटील यांच्या भाजपसोबत जायच्या निर्णयामागे भविष्यातील राजकीय समीकरणांचे संकेत आहेत.

भाजपमध्ये सध्या खासदार संजय पाटील आणि जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख अशी थेट विभागणी झाली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सत्तासोपानासाठी प्रयत्न करायचा निर्णय घेतला, त्यामागेही भाजपमधील हे बेसूर कारणीभूत होते. रयत आघाडीतील महाडिक, नायकवडी यांनी जरी वेगळा सूर लावला तरी राज्यातील सत्तेपासून फारकत घेण्याचे धैर्य दाखवण्याची शक्‍यता कमीच होती. खासदार राजू शेट्टी यांच्यासाठी विरोधाचे दोर पुरते कापले गेले होते. त्यामुळे त्यांच्यासमोरही शेवटच्या क्षणी सत्तेसोबत जाण्याशिवाय पर्याय उरले नाहीत. भाजपचा सत्तेचा वारू रोखण्याबाबत दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांमध्ये एकमत जसे नव्हते तसा आत्मविश्‍वासही. शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांना दोन्ही काँग्रेसने अध्यक्षपदाची ऑफर दिल्याची चर्चा सोमवारी रात्री सुरू झाली, ती मंगळवारी सकाळपर्यंत कायम होती. मात्र त्याआधीच भाजपने बाबर यांना आवश्‍यक ती ‘मात्रा’ दिली होती. भाजपची जिल्हा परिषदेतील सत्ता कडबोळ्याची वाटत असली तरी अशा कडबोळी करून याच मंडळींनी पूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या झेंड्याखाली सत्ता राबवली आहे. त्यामुळे भाजपच्या झेंड्याखालीही वाद होत राहिले तरी त्यामुळे सत्तेला फारसा फरक पडणार नाही. कारण ही सारीच काँग्रेस-राष्ट्रवादीच्या तालमीतली. आता फक्त झेंड्याचे आणि फेट्यांचे रंग बदलले. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीप्रमाणेच ते इथेही पायात पाय घालायचेच उद्योग करीत राहतील, हे सांगायला कुणा ज्योतिषाची गरज नाही.

Web Title: sangli politics