सांगली : महापुराच्या भीतीत प्रदूषणाकडे कानाडोळा

सांडपाणी, कारखान्यांच्या केमिकलवर बोलणार कोण?
प्रदूषणाकडे कानाडोळा
प्रदूषणाकडे कानाडोळाsakal

सांगली : कृष्णा नदीतील कोल्हापुरी पद्धतीचा सांगली बंधारा पाडण्याचा घाट जलसंपदा विभागाने घातला आहे आणि त्याला विरोध करत सांगलीकर एकवटले आहेत. महापूर हे मोठे संकट आहेच, मात्र बंधारा पाडून त्याला उत्तर शोधणे कितपत व्यवहार्य ठरेल, याचे उत्तर पाटबंधारेला द्यावे लागेल. त्यासोबतच कृष्णा नदीच्या महापुरापेक्षा गंभीर प्रश्‍न नदीच्या प्रदूषणाचा आहे. त्यावर उपाययोजना करायला कोणताच विभाग पुढे का येत नाही, याचेही उत्तर सांगलीकरांनी मागितले पाहिजे. कृष्णा नदीची पंचगंगा होण्याची आपण वाट पाहतोय का?

सांगली बंधारा बचावसाठी भाजपचे प्रदेश सचिव पृथ्वीराज पवार यांनी हाक दिली आणि सांगलीकर प्रचंड संख्येने एकवटले. माजी आमदार नितीन शिंदे, नीता केळकर, सतीश साखळकर यांच्यासह नगरसेवकही मैदानात उतरले. सांगलीत खूप काळाने अशाप्रकारे सामान्य माणसाच्या हितासाठीच्या मुद्द्यावर एकजूट होताना दिसली. ही लढाई राजकीय नसून सांगलीकरांचे आरोग्य आणि सांगलीचे पर्यावरण यासाठीची असल्याची घोषणा करून पृथ्वीराज यांनी पक्षविरहीत चळवळ उभी केली आहे. सांगली बंधाऱ्याचा एक दगड हलवून दाखवा, असे आव्हान त्यांनी दिले आहे. त्यामागची भूमिका, त्यांनी विचारलेले प्रश्‍न अत्यंत महत्त्वाचे आहेत. बंधारा काढला तर संकट उभे राहणार आहे. भले हा बंधारा म्हैसाळचा बॅरेज उभा झाल्यानंतर काढण्याचे नियोजन असले तरी त्यानंतरही उभे राहणारे प्रश्‍न गंभीरच आहेत.

चार लाखांवर लोकसंख्या असलेल्या सांगलीच्या चार नाल्यांतून वाहणाऱ्या सांडपाण्याचे काय करायचे? ते पाणी म्हैसाळला बॅरेजच्या पुढे सोडणार आहात काय? शेरीनाल्याच्या मुद्द्यावर सांगलीच्या निवडणुका गाजल्या, जिंकल्या, पण त्यावर शाश्‍वत उत्तर सापडले नाही. जयंत पाटील आता पालकमंत्री आणि जलसंपदामंत्री आहेत, महापालिकेत महापौर आणि प्रशासनावर त्यांचे कमांड आहे. राज्य सरकारमधून त्यांच्या शब्दावर हवा तेवढा निधी मिळू शकतो. त्यांनी सांगली बंधाऱ्याची घोषणा करण्याआधी शेरीनाल्याचा प्रश्‍न सोडवण्याची भूमिका घ्यायला हवी होती. कृष्णेत थेट मिसळणाऱ्या २९ गावांच्या सांडपाण्याचे नियोजन करायला हवे होते.

म्हैसाळ येथे बॅरेज होणे मिरज, कवठेमहांकाळ, तासगाव, जत तालुक्यांतील पाणी योजनांसाठी फायद्याचे ठरेल, मात्र त्याचा महापुराशी थेट संबंध जोडून सांगलीकरांची दिशाभूल होत नाही ना, असा प्रश्‍न पुढे येतोय. कारण कृष्णेत पाण्याला फूग येईल, असे किमान दोन डझन अडथळे आहेत. त्यात नव्या पुलाची भर पडतेच आहे. कर्नाटकातील अडथळ्यांची संख्या अधिक आहे. या सगळ्यात फक्त सांगलीचा बंधाराच का दिसावा, एवढाच साधा आणि सरळ प्रश्‍न आहे. शिवाय, मगरींचा बंधाऱ्यापलीकडे आणि हरिपूरजवळ असलेला अधिवास पूर्ण डोहात झाला तर धोका वाढणारच आहे. त्याचेही उत्तर द्यावे लागेल.

२९ गावांचे सांडपाणी कृष्णेत

कृष्णा नदीत २९ गावांचे सांडपाणी थेट मिसळते. त्यावर कोणतीही प्रक्रिया केली जात नाही. या गावांना अनेकदा प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोटीस बजावल्या, बैठका झाल्या, मात्र त्यावर काहीच झाले नाही. त्यासाठी काही निधी द्यावा, सक्तीने त्या पाण्यावर प्रक्रिया करण्याची व्यवस्था उभी करावी, असे कोणतेही नियोजन दिसत नाही. अनेक साखर कारखान्यांचे आणि औद्योगिक वसाहतींचे सांडपाणी थेट नदीत सोडले जाते. पावसाळ्यात वाहत्या पाण्यात हे पाप होते. त्याबाबत काही धोरण ठरत नाही. महापूर हा आठ दिवस येतो आणि सारे उद्ध्वस्त करून जातो. प्रदूषणाचा राक्षस हळूवार हल्ला करतोय. कृष्णा नदीची पंचगंगा व्हायची वाट आपण पाहतोय का, याचे उत्तर शोधावे लागेल.

कृष्णा बंधारा ‘सॉफ्ट’ टार्गेट

महापुराचा अभ्यास करून उपाय सूचविणाऱ्या वडनेरे समितीने कृष्णा नदीच्या पात्रातील आणि पूरपट्ट्यातील अतिक्रमणे हटवण्याबाबत स्पष्ट सूचना केल्या आहेत. अर्थात, ते सांगायला वडनेरे समिती कशाला हवी? नदीच्या पात्रात आणि नाल्यांवर मुरुम टाकून अतिक्रमणे केली आहेत, हे उघड्या डोळ्यांनी दिसत आहे. काही अधिकाऱ्यांचे बंगले नाल्यावर आहेत. कित्येक राजकारण्यांच्या संस्था, कंपन्या आणि शोरूम त्यावर आहेत. त्याबाबत ना महापालिका काही कडक भूमिका घेत आहे, ना जलसंपदा विभाग आपल्या याबाबत विशेष अधिकार वापरतो. जिल्हा प्रशासनाला महापूर आल्यानंतर उपाययोजना कराव्याच लागतात, त्यानंतरच्या काळात काय घडते... काहीच नाही. मग, महापूर रोखायच्या प्रयत्नांत बंधारा हटवा, असे मुद्दे पुढे येतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com