सांगली : पाऊस लांबला, जलसाठा घटला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जलसाठा.

सांगली : पाऊस लांबला, जलसाठा घटला

सांगली : २०१९ आणि २०२१ च्या महापुरावेळी त्यात धरणांतील पाणीसाठ्याचे नियोजन चुकल्याचे समोर आले होते. त्या पार्श्‍वभूमीवर धरणातील पाणीसाठा जल आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार तंतोतत ठेवावा, असा आग्रह यावर्षीही होता; परंतु पाटबंधारे विभागाने पाऊसकाळ लांबण्याची शक्यता लक्षात घेऊन थोडा अधिकचा साठा ठेवला आणि तोच आज तारणहार ठरत आहे.

कारण पाऊस लांबल्यानं, तेथील जलसाठा घटत चालला आहे. सध्या जिल्ह्यातील वारणा धरणात १०.८८ टीएमसी पाणीसाठा आहे. धरणाची क्षमता ३४.४० टीएमसी एवढी आहे. जूनमध्ये अजिबात पाऊस झाला नसल्याने हे आधीचेच पाणी आहे. धरण रिकामे केले असते, तर परिस्थिती बिकट झाली असती, हे उघड आहे. कोयना धरणातही १४.८७ टीएमसी पाणीसाठा असून, क्षमता १०५ टीएमसी आहे. विविध धरणांतून सांडवा, कालवा व विद्युतगृहाद्वारे सोडलेला विसर्ग (क्यूसेक्समध्ये) असा ः कोयना १०५०, धोम ०.०, कण्हेर ०.०, वारणा ५९२, दूधगंगा ५०, राधानगरी १०००, तुळशी ५०, कासारी २५०, पाटगाव ०.०, धोम बलकवडी ०.०, उरमोडी २५०, तारळी ०.० व अलमट्टी ४५१.

सांगली भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार सांगली जिल्ह्यात गेली दोन दिवस हलका पाऊस होत आहे. तो आणखी तीन दिवस राहील. खरीप हंगामासाठी पाऊस उपयुक्त आहे; मात्र तो पुरेसा नाही. जिल्ह्यातील ४७ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. यामध्ये जत तालुक्यातील पिकांना तर जीवदानच मिळणार आहे. उर्वरित क्षेत्रात पेरणीसाठी अद्यापही पेरणीयोग्य पाऊस झालेला नसल्याचे कृषी विभागातून सांगण्यात आले. सध्या पाऊस सुरू झाला नसता, तर फेरपेरणीची स्थिती निर्माण झाली असती. ती सध्या टळल्याचे चित्र आहे. सांगली जिल्ह्यात पावसाबद्दलचे हवामान विभागाचे अंदाज चुकत आहेत.

जून संपला, जुलै सुरू झाला तरी पेरणीयोग्य पाऊस झालेला नाही. कृषी विभागाने पुरेसा म्हणजे किमान ७५ मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरण्या करू नये, आवाहन केले होते. तेच आवाहन सध्याही लागू पडते. जिल्ह्यात शिराळा, जत वगळता सर्वाधिक म्हणजे अनुक्रमे ९० व ८० टक्के पेरणी झाली आहे. अन्य तालुक्यांत पेरण्या कमी झाल्या आहेत. आणखीच पाच दिवस पाऊस झाला नसता तर पेरणी झालेल्या वाया जातील, असा सर्वांचाच अंदाज होता. जिल्ह्यात जत, शिराळा तालुक्यांत सर्वाधिक म्हणजे सुमारे ९० टक्क्यांहून अधिक क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. अन्य तालुक्यांत हे क्षेत्र सर्वसाधारण ३० ते ५५ टक्क्यांपर्यंत आहे.

तालुकानिहाय पाऊस

जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी ११.३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, शिराळा तालुक्यात सर्वाधिक ५१ मि.मी. पाऊस झाला. तालुकानिहाय पाऊस (कंसात एकूण पाऊस)- मिरज ८.६ (८८.४), जत ०.१ (९५.२), खानापूर-विटा ११.१ (८६.३), वाळवा-इस्लामपूर ९.३ (७९.६), तासगाव २.९ (७१.९), शिराळा ५१ (१९५.५), आटपाडी ०.१ (६८.१), कवठेमहांकाळ २०.६ (७९.३), पलूस ५ (५१), कडेगाव ९ (७०.२).

जिल्ह्यात खरिपाची ४७ टक्के पेरणी झालेली आहे. गेल्या दोन दिवसांपासून वातावरण बदलले आहे. उर्वरित क्षेत्रात पेरणीसाठी शेतकऱ्यांनी बियाणे, खतांची तयारी केली आहे, तरीही पुरेसा पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी; मात्र हलक्या पावसात अद्यापही शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. सध्याच्या पावसाने पेरलेल्या पिकांना जीवदान मिळेल. अद्यापही चांगला पाऊस गरजेचा आहे.

- प्रकाश सूर्यवंशी, प्रभारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सांगली

Web Title: Sangli Rains Water Storage Has Decreased Tmc Water Balance

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..