सत्कार आजचा, कर्तृत्ववान-धैर्यवानांचा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 फेब्रुवारी 2017

‘सकाळ’ सांगलीचा वर्धापन दिन - भावे नाट्यमंदिरात आयोजन - अतुल कहाते यांचे व्याख्यान - वाचकांचा स्नेहमेळावा 
 

‘सकाळ’ सांगलीचा वर्धापन दिन - भावे नाट्यमंदिरात आयोजन - अतुल कहाते यांचे व्याख्यान - वाचकांचा स्नेहमेळावा 
 

दैनिक ‘सकाळ’च्या सांगली कार्यालयाचा ३३ वा वर्धापन दिन मंगळवारी (ता. २८) सायंकाळी ५.३० वा. साजरा होत आहे. सांगली जिल्ह्याच्या विकासाच्या वाटचालीत ‘सकाळ’ने नेहमीच कृतिशील योगदान दिले आहे. आजच्या वर्धापन दिनाच्या सांगलीतील भावे नाट्यगृहात विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील लोकप्रिय लेखक अतुल कहाते यांचे व्याख्यान होत आहे. त्यांच्या हस्ते ‘सकाळ’च्या परंपरेप्रमाणे गेल्या वर्षभरात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या कर्तृत्ववान-धैर्यवान व्यक्तींचा गौरव होत आहे. या सत्कारमूर्तींचा हा अल्पपरिचय.

गजानन नरळे - मगरीवर चाल करणारा जिगरबाज
येथील आयर्विन पुलाजवळ गेल्या वर्ष-दीड वर्षापासून अजस्र मगरींचा वावर आहे. अर्थात ते त्यांचं घरच. सांगलीतील अनेक मंडळी आजही माई घाटावर पहाटेपासून आंघोळीसाठी जात असतात. गेल्या २९ नोव्हेंबरलाही पहाटेपासून लोक नेहमीप्रमाणेच कृष्णा नदीपात्रात डुंबत होते. 

अचानकपणे काठावरच्या मंडळींनी आरडाओरडा सुरू केला. वसंतदादा स्मारकाजवळ अगदी घाटालगत मगर आली होती. पोहणाऱ्यांपैकी दोघे निवांतपणे पोहत होते; मात्र त्यांच्यापर्यंत हा आवाज काही केल्या पोचत नव्हता. आवाजाने शेजारीच नव्याने सुरू झालेल्या बोट क्‍लबच्या विश्रांतीगृहात झोपलेल्या गजानन नरळे याला जाग आली. कोणी तरी पाण्यात बुडत असावे, असा अंदाज बांधून तो धावतच बाहेर आला. धावतच त्याने नदीपात्र गाठले आणि इंजिन बोटीवर स्वार झाला. त्या वेळी अवघ्या ४०-५० फुटांवर मगर आणि तिच्यापासून चार-पाच फुटांवर पोहणारे ते दोघे, असा बाका प्रसंग होता. प्रसंगावधान राखत गजाननने बोटीचे इंजिन सुरू केले आणि चित्याच्या वेगाने तो मगरीच्या दिशेने रवाना झाला. जणू त्याने बोटीसह थेट मगरीवर चालच केली. बोटीच्या लाटा आणि आवाजांनी मगर बिथरली आणि कृष्णेच्या डोहात गायब झाली. गजाननच्या धाडसी कृतीने त्या दोघांना जणू दुसरे आयुष्यच प्राप्त झाले. बाका प्रसंगात त्याने दाखवलेले धैर्य प्रेरणादायक आहे. एक चांगला जलतरणपटू आणि बोटिंगपटू असलेल्या गजाननच्या या धाडसी कामगिरीला ‘सकाळ’चा सलाम !

लतादेवी बोराडे - संघर्ष सौभाग्य लेण्यांसाठीचा 
काल-परवापर्यंत कोणत्याही समारंभात सन्मानाचे स्थान असणारी स्त्री वैधव्यानंतर मात्र अपशकुनी ठरते. आजच्या २१ व्या शतकातही अशा वाईट चालीरीती कायम आहेत. कमी-अधिक प्रमाणात त्या शहरांतही आहेत. आई, बहीण, आजी, मावशी अशी सर्व नाती वैधव्यानंतर कशी काय अपशकुनी ठरतात?

समाजाला काच ठरणारी रूढी परंपरांचे हे जोखड फेकून देणारा सावित्रीच्या लेकीचे व्रत घेतले आहे, आटपाडीच्या समाजसेविका लतादेवी बाळकृष्ण बोराडे-साळुंखे यांनी. जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षिका असलेल्या लतादेवींनी ‘विधवा महिला विकास प्रतिष्ठान’ची स्थापना केली. स्वतःवर ओढवलेल्या वैधव्याच्या दुःखाचा डोंगर बाजूला सारून इतरांचे दुःख सावरण्यासाठी त्या पुढे आल्या आहेत. गेली सहा वर्षे त्यांनी गावोगाव फिरून विधवांना समाजात प्रतिष्ठा मिळावी, त्यांना सौभाग्यवतीप्रमाणेच सर्व हक्क आणि धार्मिक विधींचे अधिकार मिळावेत, यासाठी संघर्ष करीत आहेत. त्यांच्या या प्रयत्नांचे यश म्हणून नुकताच मराठा समाजात विधवांना सौभाग्य लेणी बहाल करण्याचा कार्यक्रमही झाला. सौभाग्य लेणी उतरवून महिलांना ती विधवा असल्याची दृश्‍य जाणीव करून दिली जाते. त्याला कायद्याने बंदी यावी, यासाठीही त्यांचे सरकारदरबारी प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्या या समाजासुधारणेच्या चळवळीशी सकाळच्या ‘तनिष्का’ चळवळीनेही नाते सांगीतलेय. त्या तनिष्का सदस्या आहेत. हा सत्कार त्यांच्या रूढी बदलाच्या प्रयत्नांना बळ देणारा आहे.

अजित काशीद - प्राणी-पक्ष्यांचा ‘सहारा’ 
अजित नामदेव काशीद. त्यांच्या पंचशीलनगरातील छोट्या घरात गेलात तर तिथं कुत्री, मांजरे, पक्षी अशा नाना मुक्‍या प्राण्यांच्या गोंगाटानेच तुमचे स्वागत होईल. हे सारे मुके जीव अजितचेच नव्हे, तर त्यांच्या कुटुंबीयांचे आप्तस्वकीय... सारे काही आहेत. अजित यांच्या या पॅशनला आपली पॅशन मानणाऱ्या पुष्पा या त्यांच्या जीवनसखी. त्यांनीही हे काम व्रत म्हणूनच स्वीकारले आहे. जवळपास दोन दशकांपासून अजित या मुक्‍या जिवांचा मित्र म्हणून काम करतो आहे. अनेकविध कारणांमुळे जखमी झालेल्या प्राणी-पक्ष्यांना जीवदान द्यायचं त्यांचं व्रत आहे. आता या कामी समाजही यावा, या हेतूने त्यांनी प्राणी-पक्षी संवर्धनासाठी एक संस्थाही काढली. प्राणी-पक्षी पाळणे हा उच्चभ्रूंचा शौक. मध्यमवर्गीय कुटुंबातील अजित यांच्यासाठी हा शौक नाही तर व्रत आहे. लहानपणापासून प्राणी-पक्ष्यांचे त्याला वेगळे आकर्षण होते. आवडीपोटी ते प्राण्यांच्या सहवासात आले. त्यांच्या व्यथा समजून घेऊ लागले. प्राणी-पक्ष्यांच्या अदिवासावर आलेल्या संक्रांतीबद्दल त्यांच्या मनात सतत चिंता असते. ती गरज ओळखून ‘सहारा’ संस्थेच्या माध्यमातून समविचारींचा ग्रुप जमलाय. आता महापालिका क्षेत्रात ‘ॲनिमल सहारा फाऊंडेशन’ नानाविध उपक्रम राबवत आहे. ‘सकाळ’ही त्यांच्या उपक्रमात सहभागी होत आहे. हे काम पुढं सुरू राहावं, यासाठी कौतुकाची ही थाप.

लक्ष्मण जाधव - गुन्हा प्रतिबंध हेच पोलिसिंग 
गुन्हा घडला की शोध घेणे हे पोलिसांचं काम, असाच सर्वसामान्यांचा समज. हे काम आहेच; मात्र गुन्हा घडण्याआधी त्याचा प्रतिबंध करणं हे पोलिसांचं खरं काम. त्यासाठी आज लक्ष्मण जाधव यांचा सत्कार. त्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मिरजेत नुकतीच दरोडेखोरांची टोळीही पकडली. 

या टोळीने डॉक्‍टरांच्या घरातील प्लंबरकडून मोठी रोकड घरी असल्याची माहिती काढली होती. त्यानंतर त्यांनी बंगल्याची रेकी करून सारा काही कट रचला. दरोड्याच्या आदल्या दिवशी त्यांनी डॉक्‍टरांच्या घरच्या वॉचमनला वाटेत किरकोळ अपघात करून जखमीही केले, जेणेकरून तो दुसऱ्या दिवशी ड्यूटीवर येऊ नये. ठरल्याप्रमाणे सर्व जण दरोड्याच्या तयारीनिशी रात्री बंगल्याजवळ आले. तेथे आल्यानंतर ते मोटारगाडीच्या नंबरप्लेटला चिखल फासत होते. हा प्रकार जाधव यांना संशयास्पद वाटला. त्यांनी तत्काळ अन्य सहकाऱ्यांना घटनास्थळी बोलावले आणि छापा टाकून सर्वांना पकडले. त्यांच्याकडून जीवघेणी हत्यारे, दरोड्याचे साहित्य पकडले. तपासात त्यांचा कट उघड झाला. प्रसंगी हत्या करून दरोड्याचा कट यशस्वी करायचे कारस्थान त्यांनी रचले होते. जाधव यांच्या धडाडीमुळे हा कट उधळला. यामुळे एकच नव्हे, तर अनेक गुन्ह्यांना पायबंद बसला. आजचा हा सत्कार अशाच बेसिक पोलिसिंगबद्दल. 

स्मृती मानधना - सांगली क्रिकेटची ब्रँड 
स्मृती मानधना हिनं सांगलीची ओळख देशातच नव्हे, तर जगाच्या नकाशावर नेली आहे. एक महिला क्रिकेटपटू म्हणून तिने भारताकडून धावांचे डोंगर रचले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेने जागतिक क्रिकेट संघाची नुकतीच निवड केली. त्यात एकमेव भारतीय खेळाडू म्हणून सांगलीकर स्मृतीची निवड झाली.

आज ती भारतीय क्रिकेट संघातील स्टार खेळाडू आहे. तडाखेबाज फलंदाज आहे. नवव्या वर्षी १५ वर्षांखालील महाराष्ट्र संघात तिची निवड झाली आणि यशाचा सिलसिला सुरू झाला. दोनच वर्षांत १९ वर्षांखालील संघात स्थान मिळाले. आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेताना प्रचंड कष्ट घ्यावे लागतात. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात शतक झळकावल्याने आत्मविश्‍वास दुणावला. पुढे सातत्य राखले. तिची क्रिकेटमधील कामगिरी आता यशाच्या शिखरावर पोचली आहे. तिचा सत्कार सांगलीच्या क्रिकेट विश्‍वात तिच्यासारखेच नवे तारे घडावेत, यासाठी.

महावीर साबण्णावर - राष्ट्रीय ‘ध्वनी’मुद्रा  
धनगर समाजाच्या जीवनाचं वास्तव प्रतिबिंब ठरावा, असा अलीकडचा मराठीतला ‘ख्वॉडा’ हा सिनेमा चित्रपट समीक्षकांच्या कौतुकास पात्र ठरला तो त्या सिनेमातील व्हिज्युअल्समुळे आणि ध्वनिमुद्रणामुळे. थेट जागेवरचं, कोणत्याही तंत्राच्या वापराविना ध्वनिमुद्रण करणं तसं बिकटच.

ते काम केलंय एका सांगलीकरानं. त्याबद्दल त्यांना मानाचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. महावीर साबन्नावर असं त्या ध्वनिमुद्रकाचं नाव. सांगलीच्या कस्तुरबाई वालचंद महाविद्यालयात बी.एस्सी.नंतर पुण्यात एफटीआयमध्ये विशेष अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या महावीर यांचे नाव आता या क्षेत्रात कौतुकाने घेतले जाते. इंग्लंडमध्ये ‘ब्लू पॅलेस’ ही १९ मिनिटांची हिंदी शॉर्ट फिल्म केली आणि त्याला ‘नो लिमिट फिल्म फेस्टिव्हल’मध्ये बेस्ट साऊंड डिझाइनिंगचा पुरस्कार मिळाला. तसेच लंडन फिल्म फेस्टिव्हलसाठीही त्यांची निवड झाली. आता त्यांचे अनेक मराठी, हिंदी, कन्नड, तमिळ आणि गुजराती चित्रपट झाले आहेत, होत आहेत. सांगलीकरांसाठी ही गौरवाची बाब. त्यांचा आजचा सत्कार राष्ट्रीय पुरस्कारासाठी.

Web Title: sangli sakal anniversary