सांगली : पावसाळ्यासाठी १०७ गावांत सज्जता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sangli Structural audit schools buildings for monsoon 107 villages

सांगली : पावसाळ्यासाठी १०७ गावांत सज्जता

सांगली : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने महापुराला तोंड देण्यासाठी संभाव्य पूरग्रस्त १०७ गावांत बोटी, पथके सज्ज ठेवण्याचे आदेश दिले असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी आज सांगितले. तसेच जिल्हा परिषदेच्या शाळा, इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करणे, आरोग्य विभागाने साथीच्या रोगाचे सर्वेक्षण करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.

मुख्य कार्यकारी अधिकारी डुडी यांनी आज पत्रकार परिषदेत प्रशासनाने केलेल्या आपत्ती व्यवस्थापन आराखड्याची माहिती दिली. ते म्हणाले, ‘जिल्ह्यात १०७ पूरबाधित गावांतील पूर आराखडे केले आहेत. त्या गावांमध्ये पुराचा संभाव्य धोका लक्षात घेऊन आपत्ती व्यवस्थापन करण्यात आले आहे. या गावांसाठी ८३ बोटी आणि त्यांचे चालक तयार ठेवण्यात आले असून त्यांची चाचणी घेण्यास सांगितले आहे. ८३ बोटी, लाईफ जॅकेट या साहित्याची तज्ज्ञांकडून तपासणी, दुरुस्ती करून त्याची चाचणी घ्यावी. त्याचबरोबर गाव समित्या सक्रिय करण्यात याव्यात. पूर परिस्थिती उद्‌भवल्यास स्थलांतराची प्रक्रिया गतीने राबविण्यास मदत होईल. सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्ह्यातील सर्व पूलांचे स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण करून घ्यावेत. पुरामुळे पाण्याखाली जाणाऱ्या रस्त्यावर ठिकाणी बॅरिकेटिंग, रिफलेक्टर लावण्याच्या सूचना दिल्या आहेत.

नागरिकांचे स्थलांतर गरज भासल्यास निवारागृहांची उपलब्धता ठेवण्याचे नियोजन करण्यात येत आहे. तसेच पाणीपुरवठा यंत्रणेने पूरग्रस्त भागात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी नियोजन करण्याचे आदेशही देण्यात आल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डुडी यांनी सांगितले. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे उपस्थित होते.

१९ प्राथमिक आरोग्य केंद्रांना सूचना

वाळवा प्राथमिक आरोग्य केंद्राने त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या गावांचे डेंगी, मलेरियाचे सर्वेक्षण केले आहे. त्याप्रमाणे पूरबाधित गावांच्या कार्यक्षेत्रात १९ प्राथमिक आरोग्य केंद्रांकडून पुराचा धोका असणाऱ्या गावांतील नागरिकांचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना आरोग्य विभागाला दिल्या आहेत. संभाव्य पूर परिस्थितीत आवश्यक ती आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवावी. साथीच्या रोगाबाबत सर्तकता बाळगावी. तसेच पूरपरिस्थिती, वादळी वारे, साथीचे रोग, पर्यायी मार्ग, तात्पुरता निवारा, औषध साठा, अन्न-धान्य वितरण, विद्युत पुरवठा, पशुधनाचे लसीकरण, औषधाचा साठा व चारा याबाबतीत संबंधित विभागांनी दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

एक जूनपासून कॉल सेंटर

संभाव्य पुराच्या कालावधीत धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गाबद्दल दर दोन तासांनी माहिती देण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित ठेवण्यात येणार आहे. या काळात धरणातील पाणीसाठा, पाणलोट क्षेत्रात पडणारा पाऊस, धरणातील विसर्ग, पुराची पातळी याची सविस्तर माहिती नागरिकांना तत्काळ उपलब्ध होण्यासाठी १ जूनपासून कॉल सेंटर सुरू केला जाणार असल्याचे श्री. डुडी यांनी सांगितले.

कोरोना आणि महापुराच्या कालावधीत जिल्ह्यातील नागरिकांनी मोलाची साथ दिली. त्यामुळे त्यातून आपण सहीसलामत बाहेर पडलो यंदाही प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे वेळोवळी पालन करावे आणि सहकार्य करावे.

- जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सांगली

Web Title: Sangli Structural Audit Schools Buildings For Monsoon 107 Villages

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top