सांगली : सफाई कर्मचाऱ्याची आत्महत्या

महिला सावकाराच्या त्रासाला कंटाळून कृत्य
अतुल विकास गर्जे-पाटील
अतुल विकास गर्जे-पाटील sakal

सांगली : येथील शहर पोलिस ठाण्यात सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत असलेल्या अतुल विकास गर्जे-पाटील (वय ३६, रा. बदाम चौक) याने पोलिस ठाण्याच्या टेरेसवर विष पिऊन आत्महत्या केली. आज सायंकाळी हा प्रकार उघडकीस आला. अतुल याने आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहिली आहे. सावकार महिला सुवर्णा पाटील हिच्या वसुलीच्या तगाद्याला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे.

पोलिसांनी दिलेली व घटनास्थळी मिळालेली माहिती अशी, अतुल गर्जे-पाटील हा शहर पोलिस ठाण्यात गेल्या काही वर्षांपासून सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत होता. मित्तभाषी असलेला अतुल पत्नी, दोन मुली, आई-भाऊ यांच्यासह जुनी पोलिस लाईनजवळील बदाम चौकात राहत होता. आज सकाळपासून तो चिंताग्रस्त होता. सकाळी साडेअकरापर्यंत पोलिस ठाण्यातील सफाईचे काम आटोपले. त्यानंतर तो कोणाला दिसला नाही.

दरम्यान, महापालिकेचे चार ते पाच कर्मचारी सायंकाळी पाचच्या सुमारास पोलिस ठाण्यात आले. पोलिस ठाण्यावरून गेलेल्या केबलची दुरुस्ती करायची असल्याचे त्यांनी सांगितले. ठाणे अंमलदारांनी खात्री करून त्यांना टेरेसवर पाठवले. कर्मचारी टेरेसवर गेले तेव्हा एका कोपऱ्यात अतुल तोंडातून फेस आलेल्या अवस्थेत निपचिप पडलेला दिसला. त्यामुळे कर्मचारी घाबरून खाली आले. त्यांनी ठाणे अंमलदारांना हा प्रकार सांगितला. त्यांनी कर्मचाऱ्यांसह वरती जाऊन पाहणी केली. तेव्हा अतुलच्या बाजूला विषाची बाटली पडलेली दिसली. तत्काळ त्याला उचलून सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेव्हा डॉक्टरांनी तो मृत झाल्याचे घोषित केले.

पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात अतुलने आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी आढळली. त्यात त्याने सावकार महिला सुवर्णा पाटीलच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचा मजकूर लिहिलेला आहे. पोलिसांनी ही चिठ्ठी जप्त केली आहे. अतुलने आत्महत्या केल्याची माहिती मिळताच पोलिस उपाधीक्षक अजित टिके यांनी सिव्हील हॉस्पिटलमध्ये येऊन माहिती घेतली. पोलिस निरीक्षक अजय सिंदकर, सहाय्यक निरीक्षक समीर ढेरे, विश्रामबागचे सहायक निरीक्षक अमितकुमार पाटील आदी उपस्थित होते. महिला सावकार पाटील हिच्याविरुद्ध रात्री उशिरानंतर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संशयित महिलेवर अनेक गुन्हे

शामरावनगर येथील महिला सावकार सुवर्णा माणिक पाटील हिच्यावर नुकतेच सावकार सेलने गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आणखी तीन गुन्हे तिच्याविरुद्ध दाखल झाले आहेत. गुन्हा दाखल झाल्यामुळे तिचा सावकारी परवाना रद्द करण्यात आला होता. त्यानंतरही तिची सावकारी सुरू होती. काही दिवसांपूर्वी ती जामिनावर मुक्त झाली होती. त्यानंतर तिच्या वसुलीच्या तगाद्यामुळे अतुलने आत्महत्या केली असल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com