वाहतूक पोलिस उरले पावती फाडण्यापुरते 

sangli traffic
sangli traffic

सांगली - शहर वाहतूक नियंत्रण पोलिसांनी एप्रिल 2016 पासून आतापर्यंत तब्बल 46 हजार जणांवर कारवाई केली आहे, म्हणजेच लोकभाषेत "पावत्या' फाडल्या आहेत. गेल्यावर्षीपेक्षा त्या 15 हजाराने जास्त आहेत. हे भूषणावह आहे का? अर्थातच, वाहतूक पोलिसांचे काम पावती फाडण्यापुरतेच उरले आहे का, असे म्हणायचे की काय, असा सवाल संतप्त जनतेतून व्यक्‍त होत आहे. खरच हा विभाग वाहतूक नियंत्रणासाठी दक्ष असता तर जीवघेणे उसाने भरलेले ट्रॅक्‍टरच नव्हे तर कार वाहून नेणारे अजस्त्र कंटेनर बिनदिक्कतपणे शहरातील मुख्य रस्त्यांवरून फिरले असते का? त्यांना रिंगरोडवरून जाण्याबाबत कडक धोरण राबवून त्याची सक्तीने अंमलबजावणी केली नसती का? हे काहीच होत नाही, याचा अर्थ वाहतूकदार पोलिस यंत्रणेला जुमानत नाहीत. ते कधीच कायदेशीरपणे न दिलेले गेलेले "पावत्या फाडण्याचे टार्गेट' पूर्ण करण्याच्या नादात पोलिसांचे मूळ वाहतूक व्यवस्थेकडेच दुर्लक्ष झाले आहे. 

विश्रामबाग चौकात मंगळवारी उसाने भरलेल्या ट्रॅक्‍टरने रस्त्याच्या कडेला मोपेडसह आपल्या मुलाला घेऊन उभ्या असलेल्या महिलेला धडक दिली. सुदैवाने महिला बचावली, मूल उडून बाजूला पडले. दुचाकी ट्रॅक्‍टरखाली चिरडली. ही घटना सांयकाळी सहा वाजता घडली...आणि सायंकाळी सात वाजता राम मंदिर चौकात भलामोठा कंटेनर वाहून नेणारा ट्रक शहरात घुसला आणि फसला. पुढे जाता येईना, धड मागे सरकता येईना. हा कंटेनर या चौकात आला कसा? तो पुणे-बंगळूरु महामार्गाकडे जाणारा होता तर त्याने पुष्पराज चौकातून कॉलेज कॉर्नरमार्गे बायपास गाठायला हवे होते. दुर्दैव असे की पुष्पराज चौकात पोलिसच नव्हते. एवढ्यावरच हे थांबत नाही, या चौकात कुठल्या मार्गाने कुठली वाहने जावीत, याची निर्देश करणारा फलकपण नाही. जे फलक दिशादर्शकाच्या नावाखाली लावले आहेत ते जाहिरातींनी भरून गेले आहेत. महापालिकेकडील होर्डिंगचा विभाग तर कधी शुद्धीत असतो? अर्थात, सांगलीत प्रॉपर दिशादर्शक कुठल्याच चौकात नाही, कारण असा काही नियम आहे का, इथपर्यंत संशोधन करण्याची गरज आहे. विश्रामबाग चौकाकडून कुपवाडकडे जाणारा रस्ता बांधकामामुळे बंद असल्याने अँम्बेसिडर हॉटेलच्या चौकात प्रचंड कोंडी झाली आहे. येथेही वाहतूक पोलिस नसतात. अंकली-मिरज रस्त्यावर उसाच्या ट्रॉली दिसल्या नसल्याने कारने धडक दिली आणि तिघांचा मृत्यू झाला. आता रिफ्लेक्‍टर बसवा, अशी मोहीम दरवर्षी होते, पण सहा महिन्यापूर्वीच ट्रॉलीला धडकून कवठेमहांकाळ तालुक्‍यातील सहाजण ठार झाले होते. दरवर्षी अशा चार एक घटना जिल्ह्यात घडतात. 1 जानेवारीपासून वाहतूक सुरक्षा सप्ताहाचे सात अंकी "नाटक' सुरू होईल, साध्य काय? दरवर्षी सोहळे करून सुधारणा शून्य. ना लोक सुधारले, ना यंत्रणा सुधारली, ना अपघात कमी झाले, ना मरणाऱ्या माणसांच्या संख्येत घट झाली. एकूणच सर्व विभागांची बेपर्वाई आणि कागदावरच्या मीटिंगा आणि प्रसिद्धीपुरते प्रबोधन यामुळे वाहतूक शिस्तीचा बोऱ्या वाजला आहे, हे रखरखीत वास्तव आहे. 

स्पीड गन... 
काम कमी ढोंग जास्त 
वाहतूक नियंत्रण विभागाने टिबल सीट, फॅन्सी नंबर प्लेट, वन-वे यावर जरूर लक्ष ठेवावे. तो वाहतूक नियमांचा पाया आहे, मात्र न्हानीला बोळा घालताना दरवाजा उघडाच राहतोय. दररोज पाचएक कर्मचारी "स्पीड गन' घेऊन निरनिराळ्या रस्त्यांवर उभे असतात. मुळात सांगलीतील रस्त्यांची अवस्था मनपा कृपेने इतका भारी आहे, की इथे "स्पीड' घेताच येत नाही. त्यामुळे अतिवेगवानांसाठी किती वेळ आणि बळ खर्च करणार आहात? 

नेमणूक काठावर  अन्‌ निम्मे सुटीवर 
सांगली वाहतूक नियंत्रण विभागाकडे 72 कर्मचाऱ्यांची नेमणूक आहे. तीही काठावरच आहे. मुख्य रस्त्यांवर ती पुरेशी होत नाही. त्यात रोज किमान 9 ते 10 कर्मचारी बंदोबस्ताला बाहेर जातात, साप्ताहिक सुटी आणि रजा मिळून रोज किमान 22 ते 25 जण "ऑफ ड्युटी' असतात. रोज 31 लोक उपलब्ध असतात. त्यामुळे ताण येतो, असा अधिकाऱ्यांचा युक्तीवाद आहे. याला जबाबदार कोण? 

रिफ्लेक्‍टर बसवल्यावरच उसाचे बिल 
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दशरथ वाघुले म्हणाले, ""ऊस वाहतूक करणाऱ्यांना ट्रॅक्‍टरला रिफ्लेक्‍टर बसवल्याशिवाय उसाचे बिल आदा करू नये, असे कारखाना व्यवस्थापनास कळवण्यात आले आहे. तसेच प्रबोधनात्मक कार्यक्रम जिल्हा प्रशासन आणि परिवहन विभागातर्फे हाती घेण्यात आले आहेत. एका एजन्सीकडून आम्हाला ताडपत्रीसदृश कापड उपलब्ध होणार आहे. ते ट्रॅक्‍टरच्या चारीही बाजूला लावण्यात येणार आहे. जेणेकरून इतर वाहनचालकांना याची माहिती होईल.'' 

ऊस ट्रॅक्‍टरपुढे हतबल 
वाहतूक पोलिस विभागाचे निरीक्षक दादासाहेब चुडाप्पा यांनी ऊस वाहतूक ट्रॅक्‍टरच्या प्रश्‍नापुढे हतबलता व्यक्त केली. ते म्हणाले, ""कालच्या अपघातानंतर मी बहुतांश साखर कारखान्यांच्या व्यवस्थापकीय संचालकांना नोटीस काढली आहे. नियमांचे पालन, रिफ्लेक्‍टर, चालकांना सक्तीच्या सूचना देण्यास बजावले आहे. परंतु ही वाहने अत्याधुनिक नसतात. शिवाय, प्रमाणापेक्षा अधिक ऊस भरलेला असतो. चालकांच्या समस्या वेगळ्याच. सांगली पश्‍चिम भागातील ऊस कर्नाटकात जातो तर पूर्व भागातील ऊस पश्‍चिम भागातील कारखान्यांकडे जातो. हा शेतकऱ्यांचा अधिकार असला तरी मुख्य शहरातून ऊस वाहतूकीमागे हेच कारण आहे. आम्ही सक्तीने रिंगरोडवरून वाहतूक वळवली आहे.'' 

लोकांनी पुढे यावे 
वाहतुकीच्या प्रश्‍नाची कोंडी फोडण्यासाठी आता लोकांनी स्वत: पुढे यावे. या शहरात रस्त्याच्या कडेला उभा राहणारादेखील आता सुरक्षित नाही. शंभरहून अधिक स्पिडने शहरातून दुचाकी धावत असतात. त्यांना नंबर नसतात. कोणी डॉन लिहिले असते तर कोणी अण्णा किंवा दादा असतो. वाहतूक पोलिसांकडून हे लोक कसे सुटतात आणि सामान्य लोक पावती फाडत असल्याचे दिसतात?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com