सांगली : ‘हळद ब्रॅंड’ला झटका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Turmeric

सांगली : ‘हळद ब्रॅंड’ला झटका

सांगली : ठाकरे सरकारने शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यासाठी हळद संशोधन व प्रक्रिया धोरण राबवण्याचा निर्णय घेतानाच बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्र मराठवाड्यात हिंगोलीला जाहीर केले. ‘हळद ब्रँड’ सांगणाऱ्या सांगली जिल्ह्यासाठी हा मोठा झटका मानला जातोय.

ऊस, द्राक्ष आणि डाळिंब पिकांमध्ये जिल्ह्याने आघाडी घेतली असून, तरी हळद उत्पादनात आपण अकराव्या स्थानावर आहोत आणि क्रमांक एकवर असलेल्या हिंगोलीने आता मोठी बाजी मारली आहे. ही हळद उत्पादक, व्यापारी, उद्योजकांसाठी चिंतनाची वेळ आहे. सांगलीने या केंद्रासाठी मागणी केली होती. मात्र, त्यासाठी फार ताकद लावली गेली नाही. आता राज्यात दोन ठिकाणी असे केंद्र व्हावे आणि दुसरे सांगलीकडे यावे, यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.

केळी म्हणजे जळगाव, द्राक्ष म्हणजे नाशिक, संत्री म्हणजे नागपूर हा ब्रँड... तसाच हळद म्हणजे सांगली हाही ब्रँडच. त्याला जीआय मानांकनदेखील मिळालेले आहे. हा ब्रँड वाजवावा, गाजवावा, असे धोरण अलीकडेच राबवण्याची चर्चा सुरू झाली होती. महापालिकेने शहरातील घरांच्या भिंतीचा काही भागतरी पिवळ्या रंगात रंगवावा, असे आवाहन करत ‘यलो सिटी’ची संकल्पना मांडली आणि त्याचे अनावरणही करण्यात आले. हा प्रयत्न पुढेही सुरू राहील. मात्र, दुसरीकडे मराठवाड्यातील एका मागास जिल्ह्याने हळदीतील ही मक्तेदारी हळूहळू आपल्याकडे घ्यायला सुरुवात केली आहे.

हिंगोली जिल्हा राज्यात हळद उत्पादनात अग्रेसर झाला आहे. कमी पाणी, ठिबकचा वापर आणि प्रयोग करत हिंगोलीने ४९ हजार हेक्टर क्षेत्रावर हळदीची लागवड सुरू केली आहे. या तुलनेत जिल्ह्यात फक्त ७७४ हेक्टर क्षेत्रावर हळद पिकते आहे. सांगली ही हळदीची उतारपेठ आणि प्रक्रिया उद्योग केंद्र आहे. येथे हळद पिकते कमी. ती पिकवण्याचे प्रमाण वाढले पाहिजे, ‘काळ्या मातीत यलो ब्रॅंड’ झाला पाहिजे, अशी बातमी नुकतीच ‘सकाळ’ने प्रसिद्ध केली होती.

दरम्यान, ठाकरे सरकारने जाता-जाता हिंगोलीचे हळदीतील महत्त्व विशद करणारा निर्णय घेतला आहे. हळद संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र हे महत्त्वाचे असणार आहे. आता जीएसटी रद्द झाली म्हणून पेढे वाटण्यापलीकडे जिल्ह्यात काय होतेय, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

सांगलीत संशोधन केंद्र हवेच

हिंगोलीत हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्र होत आहे, त्याचे स्वागतच, मात्र असेच एक केंद्र सांगलीत झाले पाहिजे. कारण, हिंगोलीत सर्वाधिक हळद पिकते हे खरे असले तरी सांगलीत हळद पिकते आणि विकतेदेखील. देशभरातील उलाढालीचे हे प्रमुख केंद्र आहे. या स्थितीत भिंती रंगवण्याबरोबरच कागदोपत्री सांगलीची बाजू राज्य शासनाकडे मांडून त्याला मंजुरी घेणे गरजेचे आहे.

उत्पादनात हिंगोली अव्वल

महाराष्ट्रात हळद पिकवणाऱ्या जिल्ह्यांच्या यादीत सांगलीचे स्थान अकरावे म्हणजे बरेच खालचे आहे. जिल्ह्यात ७७४ हेक्टर क्षेत्रावर हळद पीक घेतले जाते. पहिल्या क्रमांकावर हिंगोली असून, तेथे ४९ हजार ७६४ हेक्टर क्षेत्रावर हळदीचे पीक घेतले जाते. नांदेड दुसऱ्या क्रमांक (१३ हजार १३१ हेक्टर), वाशिम (४ हजार १४९) हे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी आहेत. देशातील १९ राज्यांत हळद पिकवली जाते. त्यात तेलंगना राज्य पहिल्या स्थानावर असून, तेथील ५६ हजार ५८९ हेक्टर क्षेत्रावर

हळद पीक घेतले जाते. तेथील उत्पन्न २ लाख ९५ हजार ६७५ टन इतके आहे. महाराष्ट्रात ५४ हजार ८८५ हेक्टर क्षेत्रावर हळद घेतली जाते.

सांगलीची होती मागणी

सांगलीतील हळद व्यापारी, अडते, उद्योजकांनी संशोधन केंद्राची मागणी केली होती. त्याबाबत अनेक बैठका झाल्या होत्या. मात्र, त्याला प्रतिसाद मिळाला नाही. देशभरातील हळद सांगलीत येत असल्याने त्यावर येथेच संशोधन करणे शक्य असल्याने सांगलीची ती मागणी होती.

सांगलीला संशोधन केंद्र व्हावे, अशी मागणी आम्ही अनेकदा केली होती. कारण, भारतातील हळद येथे येते. हिंगोलीत हळद पिकते. मात्र, तेथे संशोधन करावे, असे काही नव्हते. सांगलीत संधी अधिक होती. सांगली हळदीची ‘काशी’ आहे. शासनाने याबाबत फेरविचार करावा.

- मनोहर सारडा, हळद व्यापारी

Web Title: Sangli Turmeric Brand Balasaheb Thackeray Turmeric Research Hingoli

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..