आमदार कोण ? "कदम की गोरे'

आमदार कोण ? "कदम की गोरे'

सांगली - राष्ट्रवादीशी काडीमोड घेऊन कॉंग्रेसने ईर्षेने लढवलेल्या सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निकालाकडे राज्याचे लक्ष लागले आहे. उद्या (ता. 22) मतमोजणी असून सकाळी अकरापर्यंत निकाल लागण्याची शक्‍यता आहे. निवडणुकीसाठी 570 पैकी 569 मतदान झाले असल्याने 285 मते मिळवणारा उमेदवार विजयी होणार आहे.

निवडणुकीतील चुरस पाहता दुसऱ्या पसंतीची मते निर्णायक ठरण्याची शक्‍यता आहे.

विधान परिषदेच्या सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी माधवनगर रस्त्यावरील सर्किट हाऊसजवळच्या महसूल सांस्कृतिक भवनच्या इमारतीत होणार असून याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. मतमोजणी केंद्रावरील तयारीची निवडणूक निर्णय अधिकारी शेखर गायकवाड आणि निवडणूक निरीक्षक एन. के. पोयाम यांनी आज पाहणी केली. जिल्हा पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, अपर जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी आदी उपस्थित होते. सकाळी आठ वाजता मतमोजणी प्रक्रियेस प्रारंभ होणार आहे. यासाठी मतमोजणी केंद्राच्या परिसरात मोठा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

मतमोजणीसाठी 15 अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना मतमोजणीचे प्रशिक्षण देण्यात आले. वैध व अवैध मतदानाबाबत योग्य ती दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

दोन्ही जिल्ह्यातील आठ मतदान केंद्रांवर शनिवारी (ता. 19) मतदान झाले. 570 पैकी 569 मतदारांनी हक्क बजावला. यात सातारा जिल्ह्यात 304 तर सांगली जिल्ह्यात 265 मतदान झाले. सांगली महापालिकेचे नगरसेवक सुनील कलगुटगी यांची प्रकृती बरी नसल्याने त्यांचे मतदान झाले नाही.

अशी होईल मतमोजणी
मतमोजणीसाठी दोन टेबल लावले जाणार आहेत. तेथे दोन्ही जिल्ह्यातील आठ मतपेट्या उघडण्यात येतील. त्यातील मतपत्रिका न उघडता प्रत्येकी 25 मतपत्रिकांचे गठ्‌ठे करण्यात येतील. सर्व गठ्‌ठे पूर्ण झाल्यानंतर ते एकत्र मिसळण्यात येतील. त्यानंतर ते गठ्‌ठे दोन्ही टेबलवरील कर्मचाऱ्यांना मोजणीसाठी देण्यात येतील. यामुळे कोणत्या मतदान केंद्रावरील गठ्‌ठा आहे हे स्पष्ट होणार नाही.

विजयी उमेदवार कसा ठरणार?
285 मते मिळवणारा उमेदवार विजयी होणार आहे. जर एखाद्या उमेदवाराने पहिल्या पसंतीतच 285 मते मिळवली तर दुसऱ्या पसंतीची मते न मोजताच त्याला विजयी घोषित केले जाईल. परंतु कोणत्याही उमेदवारास पहिल्या पसंतीची 285 मते मिळाली नाहीत, तर पहिल्या पसंतीची सर्वात कमी मते ज्याला मिळाली आहेत तो उमेदवार प्रक्रियेतून बाहेर पडेल. त्याला मिळालेल्या दुसऱ्या पसंतीच्या मतांचे उर्वरित उमेदवारनिहाय वाटप केले जाईल. त्यातून जो उमेदवार 285 मतांचा कोटा पार करेल, तो विजयी ठरेल. अन्यथा हीच प्रक्रिया सुरू राहील. पहिल्या पसंतीच्या मतांच्या संख्येत तिसऱ्या क्रमांकावर असलेला उमेदवार बाहेर पडेल आणि त्याची दुसऱ्या पसंतीची मते उर्वरित दोन उमेदवारनिहाय वाटप होतील. यामध्ये जो उमेदवार अधिक मते मिळवेल तो विजयी घोषित होईल. या स्थितीत विजयी उमेदवाराची मते 285 इतकी असेलच, असे नाही.

मतमोजणीसाठी बंदोबस्त
मतमोजणीसाठी 125 पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आल्याची माहिती अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी दिली. ते म्हणाले, ""मतमोजणीच्या ठिकाणी येणाऱ्या सर्व रस्त्यावर शंभर मीटर परिसरात बॅरिकेडस्‌ लावले आहेत. उमेदवार, प्रतिनिधींना आत प्रवेश दिला जाईल. पार्किंग व्यवस्था स्वतंत्रपणे केली आहे. मतमोजणीसाठी एक उपाधीक्षक, दोन पोलिस निरीक्षक, 9 सहायक निरीक्षक / उपनिरीक्षक, 112 कर्मचारी याप्रमाणे 125 जणांचा बंदोबस्त तैनात केला जाईल.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com