अवघा गाव एकचि झाला.. 

राजकुमार चौगुले : सकाळ वृत्तसेवा 
मंगळवार, 1 नोव्हेंबर 2016

कोणाला काही सांगावे लागत नव्हते. चेहऱ्यावर गांभिर्य होते. वातावरणात सुन्न पणा होता. परंतू हजारो हात कामाला लागले. काही दिवसापूर्वी गावच्या स्मशानभूमीकडे चालत जाणे मुष्कील होते. इतका खराब रस्ता होता. तिथे हजारो हात राबू लागले. चोवीस तासाच्या आत रस्ता मुरुम टाकून तयार करण्यात आला. 

दुधगाव (जि. सांगली) : दुधगाव. सांगली जिल्ह्यातलं समृद्ध असणारं गाव. वारणा या बारमाही नदीच्या काठावर असणाऱ्या गावात ऊस, भाजीपाला उत्पादक मोठ्या प्रमाणात आहेत. गावातील अनेक तरुण लष्करात भरती. दिवाळीची लगबग सुरु असताना गावचा सुपुत्र नितीन कोळी शहीद झाल्याची बातमी आली. अन रोषणाई करणारे हात थबकले, क्षणार्धात घरावर लावण्यात आलेले आकाशकंदील काढण्यात आले. ऐन दिवाळीत गावावर सुतकी कळा आली. पण नितीनच्या जाण्याने देशप्रेम आणि पाकिस्तान विरुद्‌धच्या संतापाच्या भावनेने अवघा गाव एक झाला. आपल्या रियल हिरोच्या अंतिम स्वागतासाठी जणू अहमिका लागली. कोणाला काही सांगावे लागत नव्हते. चेहऱ्यावर गांभिर्य होते. वातावरणात सुन्न पणा होता. परंतू हजारो हात कामाला लागले. काही दिवसापूर्वी गावच्या स्मशानभूमीकडे चालत जाणे मुष्कील होते. इतका खराब रस्ता होता. तिथे हजारो हात राबू लागले. चोवीस तासाच्या आत रस्ता मुरुम टाकून तयार करण्यात आला. 

दिवाळीसाठी नव्हे तर लाडक्‍या 'हिरो'साठी 

गावात फुलांची आवक झाली ती दिवाळीसाठी नव्हे तर आपल्या 'हिरो'च्या अंतिम स्वागतासाठी. प्रत्येक रस्ते अन रस्ते स्वच्छ करुन त्यावर पाकळ्यांच्या पायघड्या अंथरण्यात आल्या. गावातील एक ही रस्ता असा नव्हता की तिथे फुले अंथरली गेली नाहीत. की एकही समाज नव्हता तो यात सामील झाला नाही. फुले गोळा करण्यासाठी तरुण फिरु लागले. तर त्यांच्या कडे फुलांच्या राशीच्या राशी जमा झाल्या. अनेक शेतकऱ्यांनी तुम्हाला हवी तेवढी फुले घेवून जा असे सांगत फुलांचे प्लॉट खुले करुन दिले. देशाप्रती ऋण व्यक्त करण्याचा छोटासा प्रयत्न केला. कोणी आर्थिक मदत केली. तर कोणी प्रशासकीय पातळीवर काम करु लागला. रात्र रात्र जागून अंत्यसस्कार प्रसंगी उणिवा राहू नयेत यासाठी प्रत्येक तरुण झटत होता. नितिन च्या मृत्यूने गावचे वातावरणच बदलून टाकले होते. आबाल वृद्ध, स्त्री पुरुष, जात या भेदाच्या भिंती केव्हाच पुसून टाकल्या होत्या. 

प्रसंग दु:खाचा..एकी स्वयंस्फूर्तीची 
प्रसंग दु:खाचा होता. पण एकी स्वयंस्फूर्तीची होती. दु:खदायक प्रसंगातून एकी दिसते म्हणतात ते दुधगावने आज अनुभवले. दुधगावसह पंचक्रोशीतून आलेले ग्रामस्थ सकाळी सात पासूनच वारणा काठी थांबून होते. विस्तृत असणारा गावही गर्दीेने छोटासा भासू लागला. अंत्ययात्रा सुरु झाल्यानंतर प्रत्येक टेरेसवरुन पार्थिवावर होणारी पुष्ववृष्टी आणि अश्रूपुर्ण चेहरेच आपला 'मोहरा' गमावल्याची साक्ष देत होते. अंत्ययात्रा सुरु झाल्यापासून एकमेकांच्या हातात हात घालून कडे करण्यात आले. हिंदू मुस्लीम कोणीही असू दे स्वयंस्फुर्तीने एकमेकाच्या हातात हात जात होते. अंत्ययात्रा जवळ आल्यानंतर भारत माता की जय..असा हुंकार दुतर्फा ऐकू येत होता. हे अनुभवताना अंगावरील शहारे कमी होत नव्हते. 

रांगोळी पाडव्याची नाही..श्रदधांजलीची 

दिपावली पाडवा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहुर्त. या दिवशी घराघरासमोर रांगोळ्या काढून उत्सव साजरा केला जातो. पण आजचे दुधगावचे वातावरण वेगळे होते. रांगोळ्या निघाल्या..पण मने भावनिक होवूनच..रांगोळी होती..पण नक्षी नव्हती. आपसूकपणे शहीद अमित कोळी यांना श्रद्धांजली असे लिहून श्रद्धांजली वहाण्यात आली. दारी रांगोळी काढली..पण श्रद्धांजलीची..असे वातावरण संपूर्ण दुधगावने अनुभवले..

Web Title: Sangli village salutes martyr Nitin Koli