सांगलीचं पाणी गढूळ; उन्हाळ्याचे संकट, दक्षता घ्या

Sangli water muddy; Summer crisis, be careful
Sangli water muddy; Summer crisis, be careful

सांगली ः सालाबादाप्रमाणे उन्हाळ्यात शहरातील पाण्याची गढुळता (TURBIDITY) वाढली आहे. 27 मार्चला शहरातील काही भागांत घेतलेल्या पाणी नमुन्यातून ती चिंताजनक असून, प्रमाणापेक्षा जास्त म्हणजे पंधरा एनटीयु इतकी अधिक आहे. सुदैव इतकेच या तपासणीत तूर्त ई कोलाय किंवा जीवाणूंचे निदर्शक आढळलेले नाहीत; मात्र गढूळ पाण्यामध्ये शेवाळ, साबणाचा अंश, किटकनाशकांचे अंश असू शकतात, असे तज्ज्ञांचे मत आहे. 


दरवर्षी उन्हाळ्यात गढूळ पाण्याच्या तक्रारी वाढतात. यामागे शुद्धीकरणबाबत तक्रारी असतात, तशाच त्या त्या भागातील वितरण व्यवस्थेतील त्रुटीही याचे कारण असतात. सांगलीच्या पाण्याबाबत असलेल्या सर्वच तक्रारींचे निराकरण करणे सध्यातरी अशक्‍य आहे. प्रयोगशाळेतील तपासणीतून पाण्याची अल्कता 7.3 पेक्षा अधिक असल्यास ते अल्कलीतेकडे झुकते. क्षारांचे प्रमाण चांगले असायला हवे. 


सांगलीच्या पाण्यातील सध्याचे क्षारप्रमाण नियंत्रणात आहे, मात्र उन्हाळ्याचा कडाका वाढेल तसे ते वाढत जाते. पाण्याचा जडपणा 50 टक्के इतका आहे. ते वाढेल तसा धोका वाढतो. त्यामुळे कपडे धुण्यासाठी जास्त सोडा लागतो. डाळी शिजत नाहीत. धुतलेल्या भांड्यावर डाग पडतात. यामागे कृष्णेच्या पाण्यात शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या रासायनिक खतांमधून नदीत मिसळले जाणारे नत्र, स्फुरद आणि पालाशचे प्रमाण हे प्रामुख्याने कारण आहे. कऱ्हाडपासून सांगलीपर्यंतच्या पाच साखर कारखान्यांचे सांडपाणी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे नदीत मिसळते. त्यामुळे यावर उपाय म्हणजे नदीची शुद्धता जपणे हाच आहे. महापालिकेची यंत्रणा इथे काहीही करू शकत नाही. 

किमान हे करा 

  • आरओ सिस्टम अतिशय खर्चिक आहे. ती आवश्‍यकच आहेच, असं नाही. 
  • साधी अल्ट्राव्हायलेट सिस्टीमद्वारेही पाणी शुद्ध करून वापरले तरी चालेल. 
  • तांब्याच्या घागरीत 24 तास पाणी साचवून दुसऱ्या दिवशी ते पिण्यासाठी वापरा. 
  • नळाच्या तोटीला सहापदरी धोतराच्या कापड गुंडाळून आलेले पाणी साठवा. 
  • उकळी आल्यानंतर पाणी दहा मिनिटांपर्यंत उकळा आणि नंतरच कोमट करा. 
  • सोडियम हायपोक्लोराइटचे दोन थेंब पिंपभर पाण्यात टाका. 
  • पाण्याचे ओझोनायेझेशन करण्यासाठी ओझोनचे पिंपात दोन थेंब टाका. 
  • पिंपभर पाण्यात तुरटी फिरवून 24 तासांनंतर ते पाणी पिण्यास वापरा. 

(यापैकी शक्‍य ते उपाय करून पाणी पिण्यायोग्य करता येईल.)

नागरिकांनीच दक्षता घेऊन पाणी शुध्द करून प्यायला हवे
सध्या पुरवले जाणाऱ्या पाण्याची गढुळता प्रमाणापेक्षा अधिक आहे. यामागे शुध्दीकरण क्षमतेच्या मर्यादा, पाण्याच्या जादाच्या गरजेमुळे शुध्दीकरण न करता काही प्रमाणात पाणी थेट सोडले जाणे आणि वितरण नलिकांमध्येच दोष अशी कारणे आहेत. नागरिकांनीच दक्षता घेऊन ते किमान शुध्द करून प्यायला हवे. 
- प्रा. सुहास खांबे, निखिल लॅब 

प्रदूषण हेच रोगराईचे कारण
सांगलीच्या पाण्याचा जडपणा चिंता वाटावा असा आहे. कृष्णा नदीचे वाढते प्रदूषण हेच रोगराईचे कारण आहे. प्रदूषणाकडे सर्वच यंत्रणांनी गांभीर्याने पाहिले पाहिजे. 
- डॉ. रवींद्र व्होरा, सामाजिक कार्यकर्ते 

नागरिकांनी पालिका यंत्रणेशी संपर्क साधावा
गढूळ पाण्याची कारणे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी असू शकतात. शुध्दीकरण यंत्रणेत कोणतीही अडचण नाही. जुन्या पाईपलाईन्स, गळती ही गढूळ पाणीपुरवठ्याची कारणे आहेत. स्थानिक पातळीवर नागरिकांनी पालिका यंत्रणेशी संपर्क साधावा. 
- अमीर मुलाणी, शाखा अभियंता, पाणीपुरवठा विभाग

संपादन : युवराज यादव 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com