सांगली जिल्हा परिषदेत अध्यक्षबदल भाजपसाठी ‘जुगार’च

अजित झळके
बुधवार, 3 ऑक्टोबर 2018

सांगली - जिल्हा परिषदेत अध्यक्ष आणि चार सभापती बदलासाठी भाजपच्या १२ सदस्यांनी बंडाचा झेंडा फडकावला आहे. येत्या आठ दिवसांत बदल झाला नाही तर भूकंप घडवू, असा इशारा देणारे सदस्य सामुदायिक राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत.

सांगली - जिल्हा परिषदेत अध्यक्ष आणि चार सभापती बदलासाठी भाजपच्या १२ सदस्यांनी बंडाचा झेंडा फडकावला आहे. येत्या आठ दिवसांत बदल झाला नाही तर भूकंप घडवू, असा इशारा देणारे सदस्य सामुदायिक राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत.

भाजपचे वरिष्ठ नेते या मागणीला बगल देताहेत. त्यामागे आकड्यांचे गणित जुळत नसल्याचे मुख्य कारण समोर येत आहे. भाजपने हा डाव खेळायचा ठरवला तर तो ‘जुगार’ अंगाशी येण्याची भीती आहे, शिवाय ज्यांच्या पुढाकाराने हे बंडाचे निशाण फडकले आहे, त्या खासदार संजय पाटील यांच्या जिल्ह्यातील राजकीय चालीच त्यांच्या समर्थकांसाठी अडचणीच्या  ठरत आहेत. 

जिल्हा परिषद सदस्यांची संख्या ६०. त्यात भाजप व भाजप पुरस्कृत आहेत २५. महाडिक गटाचे ४, माजी मंत्री अजितराव घोरपडे समर्थक २, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे १ तर शिवसेनेचे ३ अशी एकूण सदस्य संख्या ३५ आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादीचा बंडखोर अशी संख्या २५ आहे. बहुमताचा आकडा लागतो ३१.

भाजपने आता बदल करायचा ठरवला तर अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्यासह चार सभापतींना राजीनामा द्यावा लागणार आहे. ते पक्षाचा आदेश मानतीलही, मात्र पुढचा अध्यक्ष कोण? यावर हा ‘जुगार’ भाजपच्या अंगाशी येण्याचीच जास्त भीती वरिष्ठ नेत्यांना वाटते. हे भीती घालणारे जिल्हा भाजपचे अध्यक्ष पृथ्वीराज देशमुख आहेत, असा उघड आरोपच सदस्यांनी केला आहे. आजवर जे काँग्रेस, राष्ट्रवादीत चालायचे, ते आता भाजपमध्येही उघड सुरू झाले आहे.

पक्षात राहून पक्षातील वरिष्ठ नेत्यांवर चिखलफेकीची भाजपला लागण झाली आहे. यात खासदार संजय पाटील यांनी ही व्यूहरचना केली, त्यामागे त्यांचे चुलते डी. के. पाटील यांना अध्यक्ष करण्याची मनीषा लपून राहिली नाही. त्यांचे समर्थक सुरेंद्र  वाळवेकर यांचेही नाव चर्चेत आहे. या दोघांनी अध्यक्षपदावर दावा केला तर खासदार  गटाच्या विरोधात शिवसेनेचे आमदार अनिल बाबर उभे ठाकू शकतात. त्यांनी तसे संकेतही दिलेले आहेत. त्यांच्या खानापूर-आटपाडी मतदारसंघात खासदारांनी घेतलेली भूमिका त्रासदायक ठरते आहे. तेथीलच  भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांनी खासदारांशी थेट पंगा घेतला आहे. त्यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर सभापती आहेत. दुसरीकडे अजितराव घोरपडे गट खासदारांशी टक्कर घेतोय. त्यांच्या दोन्ही सदस्यांनी बदलाला पूरक पत्र दिले असले तरी ‘आम्हाला संधी मिळणार असेल तर’ अशी अट घातली आहे.

राहिला विषय महाडिक गटाचा. त्यांना एक सभापतिपद दिले की ते बदलाबाबत फार आढेवेढे घेणार नाहीत, असे सांगितले जाते. या गोंधळात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांना गृहीत धरले जात आहे. खासदार संजय पाटील यांनी काँग्रेसचे नेते आमदार विश्‍वजित कदम, श्रीमती जयश्री पाटील  यांच्याशी जुळवून घेतले आहे. त्यामुळे गणित मांडायची वेळ येईल तेव्हा काँग्रेस मदतीला उभे राहील, असा विश्‍वास त्यांना वाटतो.

कदाचित, ‘देशमुख हटाव’ मोहिमेमुळे हा विश्‍वास आला असेल. याअर्थाने काँग्रेस-राष्ट्रवादी या संधीचा लाभ घेतील, अशी  शक्‍यताच नाही, असे गणित बंडखोरांनी मांडले आहे. ते वास्तवात आले तर बदलाचे गणित जुळेलही, मात्र ते फसले तर काय? या प्रश्‍नावर ‘पुन्हा देशमुखांना अध्यक्ष करा’, असा प्रस्ताव बंडखोरांनी मांडला आहे. ‘पार्टी  वुईथ डिफरन्स’ असलेल्या भाजप पक्षातील वरिष्ठ नेत्यांसमोर ही कोंडी फोडण्याचे आव्हान असेल. 

...म्हणून शिवाजी डोंगरे
बदलाचा डाव जिंकायचा असेल तर खासदार संजय पाटील समर्थक नसलेला सदस्य अध्यक्षपदासाठी उमेदवार करण्याचा उपाय असू शकेल. त्यातूनच शिवाजी डोंगरे यांचे नाव पुढे आणले गेले आहे. डोंगरे यांनी जिल्हाभर फिरून बदलाच्या समर्थनासाठी सदस्यांकडून पत्र घेतले आहेत. पत्रकार परिषदेत तेच जास्त आक्रमक होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sangli Zhila Parishad politics special