esakal | सांगली जिल्हा परिषद बदल : जयंतरावांकडून संजयकाकांचा मार्ग मोकळा की नवा कार्यक्रम 

बोलून बातमी शोधा

Sangli Zilla Parishad Change: politics between Sanjay Patil & Jayant patil

खासदार त्यांन हवा तसा बदल जिल्हा परिषदेत करू शकतात, असे सूचक विधान पालकमंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विटा येथे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नावर केले आहे.

सांगली जिल्हा परिषद बदल : जयंतरावांकडून संजयकाकांचा मार्ग मोकळा की नवा कार्यक्रम 
sakal_logo
By
अजित झळके

सांगली ः खासदार त्यांन हवा तसा बदल जिल्हा परिषदेत करू शकतात, असे सूचक विधान पालकमंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विटा येथे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नावर केले आहे. त्यांची ही भूमिका म्हणजे जिल्हा परिषदेत बलासाठी त्यांनी संजयकाकांचा मार्ग मोकळा केला आहे की नवा कार्यक्रम आखला जातोय, याविषयी चर्चा रंगली आहे. 

जयंत पाटील यांनी विटा दौऱ्यात पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी जिल्हा परिषदेत पदाधिकारी बदलाबाबत खासदार संजय पाटील खूप आग्रही आहेत, मात्र तुमच्याकडून "कार्यक्रम' होण्याची भीती आहे, असे विचारले. त्यावर जयंत पाटील म्हणाले,""खासदार त्यांना हवा तसा बदल करू शकतात. त्यांना हवे त्यांना पद देऊ शकतात.'' त्यावेळी जयंतरावांनी "महापालिकेत जे घडले, त्याची मला कल्पना नव्हती, मला कोरोना झाला होता', या वाक्‍याचा पुनर्उच्चार केला. 


जयंतरावांची ही भूमिका संजयकाकांनी नियोजिलेल्या जिल्हा परिषद बदलाला हिरवा कंदील मानायला हवे, असे बदलासाठी आग्रही गटाला वाटते. येथे राष्ट्रवादी काही गडबड करणार नाही, कारण संजयकाकांनी सर्वांना विश्‍वासात घेतले आहे, असा हा गट सांगत आहे. दुसरीकडे आरग येथे झालेल्या एका कार्यक्रमात संजयकाकांनी "तुमच्या मनातील लवकरच घडेल', असे सांगत बदलासाठी आग्रही गटाला विश्‍वास दिला आहे. त्याची जिल्हा परिषदेच्या वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. 


सध्या जिल्हा परिषदेचे बलाबल पाहणाऱ्या भाजपसाठी पदाधिकारी बदल आव्हानात्मक बनलेले आहे. महापालिकेत महापौर बदलावेळी घडलेल्या नाट्यानंतर ते धाडस करायला वरिष्ठ नेते सहजासहजी तयार नाहीत.

त्याबाबत खासदार संजयकाकांनी विश्‍वास व्यक्त करत पुन्हा एकदा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासमोर चेंडू नेला आहे. त्यामुळे येथे बदलाची शक्‍यता बळावली असल्याचे इच्छुक पदाधिकाऱ्यांनी सांगितले. 

संपादन : युवराज यादव