सांगली जिल्हा परिषदेला डॉक्‍टर मिळेनासे; 420 पदांची भरती

अजित झळके
Monday, 21 September 2020

ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा कोरोना संकटकाळात सक्षम करण्याचा सांगली जिल्हा परिषदेचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी कंत्राटी पद्धतीने तीन महिन्यांसाठी करारावर 420 पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला.

सांगली : ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा कोरोना संकटकाळात सक्षम करण्याचा जिल्हा परिषदेचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी कंत्राटी पद्धतीने तीन महिन्यांसाठी करारावर 420 पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला. दरमहा सुमारे एक कोटी 98 लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. या भरतीला मात्र फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र दिसते. त्यामुळे कोरोना संकटात जिल्हा परिषदेच्या आरोग्य यंत्रणेची मोठी कोंडी झाली आहे. 

कोरोना संकट काळात जिल्हा परिषदेने ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेवर विशेष लक्ष पुरविण्यास सुरवात केली आहे. ग्रामीण भागातील कोरोनाबाधितांची संख्या 12 हजारांवर पोचली असून, ती वाढतच आहे. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये 240 बेड हे कोरोना रुग्णांसाठी सज्ज करण्यात आले. जिल्हा क्रीडा संकुलात 140 बेडचे सेंटरही सुरू झाले आहे. या सर्व ठिकाणी मनुष्यबळ हाच मोठा प्रश्न निर्माण झाला. पुरेशा वैद्यकीय कर्मचाऱ्यांअभावी या संकटाला तोंड देणे कठीण बनले आहे. 

त्यामुळे राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत तातडीने 420 पदांची भरती करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे. यात 22 फिजिशियन, 27 ऍनेस्थेटिस्ट, 209 वैद्यकीय अधिकारी, 40 आयुष वैद्यकीय अधिकारी, 100 परिचारिका आणि 22 इसीजी तंत्रज्ञ अशा पदांचा समावेश आहे. पुढील तीन महिन्यांसाठी ही भरती असेल. आवश्‍यकतेनुसार त्यांना मुदतवाढ दिली जाऊ शकते. 

यासाठी आजपासून मंगळवार (ता. 22)पर्यंत प्रत्यक्ष येऊन जिल्हा परिषद आरोग्य विभागात अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले. या भरतीचा हा पुढचा टप्पा आहे. या पदांसाठी डॉक्‍टर, कर्मचारी मिळेनासे झाले आहेत. चांगले मानधन देऊनही मनुष्यबळाची कमतरता आहे. त्यामुळे ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणा भक्कम करण्याच्या प्रयत्नांत अडचणी येत आहेत. 

संपादन : युवराज यादव 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sangli Zilla Parishad could not get a doctor; Recruitment of 420 posts