esakal | सांगली जिल्हापरिषदेची सभा प्रत्यक्ष; पालिकेची महासभा का नाही?
sakal

बोलून बातमी शोधा

Sangli Zilla Parishad meeting live; Why is there no municipality's general body meeting?

गेल्या दोन महिन्यात सांगली जिल्हा परिषदेच्या दोन सर्वसाधारण सभा प्रत्यक्ष झाल्या मात्र याच शहरात महापालिकेची महासभा मात्र अजूनही ऑनलाईनच सुरु आहे.

सांगली जिल्हापरिषदेची सभा प्रत्यक्ष; पालिकेची महासभा का नाही?

sakal_logo
By
जयसिंग कुंभार

सांगली ः गेल्या दोन महिन्यात जिल्हा परिषदेच्या दोन सर्वसाधारण सभा प्रत्यक्ष झाल्या मात्र याच शहरात महापालिकेची महासभा मात्र अजूनही ऑनलाईनच सुरु आहे. कोरोना एकच विषाणू, शासनही एकच मात्र एकाच शहरात दोन स्थानिक स्वराज्य संस्थांबाबत निर्णय मात्र वेगवेगळे. असे का हा सदस्यांचा कळीचा सवाल आहे. 

नुकत्याच झालेल्या महापौर-उपमहापौर निवडीवेळी भाजपच्या पाच सदस्यांनी पक्षादेश डावलत मतदान केले. मात्र त्यांनी पक्षाकडे खुलासा करताना त्यातल्या काहींनी आम्ही मतदान भाजप उमेदवारालाच केले होते मात्र तांत्रिक दोषामुळे ते विरोधी पक्षाला गेले असावे असा विश्‍वामित्री पवित्रा घेतला. ही गमजा ते केवळ ऑनलाईन सभेमुळेच करु शकले. त्याचा व्हायचा तो फैसला यथावकाश होईलच मात्र आज ऑनलाईन सभा घ्या म्हणून भाजपच्या शिष्टमंडळाला नगरविकास विभाग सचिवांच्या दारात खेटे घालावे लागत आहेत. दरम्यान ऑफलाईन म्हणजे प्रत्यक्ष सभा घ्यावी यासाठी ठाण्यातील एका नागरिकाने न्यायालयातही धाव घेतली आहे.

नगरविकास विभागाने स्थायी समितीची सभा घ्यायला परवानगी दिली आहे. मात्र महासभेला अद्यापही नाही. शिष्टमंडळासमोर आम्ही लवकरच तसा प्रस्ताव देऊ असा खुलासा सचिव महेश पाठक यांनी केला आहे. 
दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या दोन सभा आता प्रत्यक्षात झाल्या आहेत. या सभेसाठी सभागृहात साठ सदस्य, 21 अधिकारी, 10 पंचायत समिती सभापती, 5 शिपाई, तीन लेखनिक आणि 8 पत्रकार असा जवळपास शंभरहून अधिक जणांचा लवाजमा एकावेळी सभागृहात असतो. सुरक्षित अंतर पाळून सभा होत असल्याचा जिल्हा परिषद प्रशासनाचा दावा असतो. 

प्रत्यक्ष सभा व्हावी किंवा नको याबद्दल यापुर्वी कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे सदस्य आक्रमक असायचे. आता महापौर-उपमहापौर निवडीनंतर ते भाजपच्या मागणीला फक्त मम म्हणताना दिसत आहेत. भाजपची मंडळी या मागणीसाठी सत्तांतरानंतर अधिकच आक्रमक झाली आहेत. जे पुर्वी फक्त मम म्हणायचे. महापालिकेच्या स्थायीसह विविध समित्यांच्या बैठकांसाठीची सभागृहे-दालने खूपच छोटी आहेत. तेथे दाटीवाटीने बैठका होतच असतात. त्या चालतात मात्र मोठ्या सभागृहातल्या बैठका चालत नाहीत. 

पत्राला अद्याप उत्तर नाही
दोन महिन्यापुर्वी आम्ही सदस्यांच्या मागणीनुसार "नगरविकास'ला ऑफलाईन सभेसाठी पत्र पाठवले होते. तेव्हा फक्त समित्यांच्या बैठकांना परवानगी दिली होती. महिन्यापुर्वी पुन्हा पाठवलेल्या पत्राला अद्याप उत्तर नाही.
- चंद्रकांत आडके, नगरसचिव महापालिका 

त्यासाठी आंदोलन करायचे का?
प्रत्येक पक्षाचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रत्येकी पन्नास टक्के सदस्य हजर ठेवून सुरक्षितता नियम पाळून महासभा होऊ शकतात. कोल्हापूरमध्ये जिल्हा परिषदेच्या सभा सुरु आहेत. आधी महासभाही अशी झाली होती. अनेक दिवसांचे विधानसभा अधिवेशन होते मग काही तासांची महासभा का नको? त्यासाठी आंदोलन करायचे का?
- विनायक सिंहासने, गटनेते भाजप 

संपादन : युवराज यादव