जिल्ह्यात पक्षांतराचे काहूर शांतच 

ZP-Sangli
ZP-Sangli

सांगली - जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणूक पार्श्‍वभूमीवर प्रत्येक वेळी पक्षांतराचे काहूर उठते. मात्र यंदा अद्याप तरी वातावरण शांत आहे. भाजपमध्ये एक-दोन प्रवेश झाले. नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत शहरी भागाचे वातावरण होते. ग्रामीण भागातील भाजपसाठी काहीशी शांतताच आहे. कॉंग्रेस पक्षाकडेही कार्यकर्त्यांचा ओढा कायम आहे. राष्ट्रवादीतील कार्यकर्त्यांचे आऊटगोईंग सुरूच आहे. याच पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी व कॉंग्रेसच्या आघाडीची बोलणी सुरू होणार असल्याने भाजपला विजयासाठीच्या रणनीतीत बदलावी लागणार आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि सोयीच्या राजकारणासाठी "अंडरस्टॅंडिंग' झाले नाही तर भाजपसमोर स्थानिक स्वराज्यमधील निवडणूक एक आव्हान असेल. 

केंद्र आणि राज्यात भारतीय जनता पक्ष सत्तेवर आहे. मिनी मंत्रालयासाठी पक्ष ग्रामीण भागात प्रथमच ताकदीने लढत आहे. यासाठी भाजपच्या नेत्यांना शिवसेनेची साथ हवी आहे. शिवसेनेने मात्र केवळ ठराविक महापालिकांत युती नव्हे तर राज्यभरातील महापालिका आणि झेडपी, पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी युतीच्या अटीने भाजपात अस्वस्थता आहे. ग्रामीण भागात संधीसाठी शिवसेनेच्या बोटाला धरून जाण्याची गरज आजही भाजपला वाटते आहे. सत्ताधारी भाजपला नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत फायदा झाला. झेडपी निवडणूक तोंडावर जिल्ह्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झेडपीचे माजी सदस्य चंद्रकांत हाक्के यांचा एकमेव प्रवेश झाला. त्यानंतर तासगावातही माजी सदस्य सुभाष पाटील यांनी प्रवेश केला. कॉंग्रेस व राष्ट्रवादीतील कार्यकर्त्यांचे अंतर्गत किरकोळ प्रवेश सुरूच आहेत. झेडपी निवडणूक पार्श्‍वभूमीवर भाजपला कॉंग्रेस, राष्ट्रवादीतून मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा प्रवेश अपेक्षित होते. भाजपच्या जिल्हा बैठकीत जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्या विधानाला फारच महत्त्व आहे. ते बैठकीत म्हणाले, ""जिल्ह्यात चार आमदार, एक खासदार असतानाही अजून बस्तान बसलेले नाही. मेहेरबानी करून "अंडरस्टॅंडिंग' करू नका. आमच्यावरही ऑब्झर्व्हर नेमलेत.'' यावरून पक्षाची सद्यःस्थिती काय आहे हेच स्पष्ट होते. 

लोकसभा, विधानसभा निवडणुकीतील भाजपचा जोश राज्यातील नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत राहिला. दोन्ही कॉंग्रेसच्या दृष्टीने नगरपालिकांतील भाजपचे यश अनपेक्षित होते. या निवडणुकीनंतर राष्ट्रवादी कॉंग्रेससमोर अस्तित्वाचा प्रश्‍न निर्माण झाला. कॉंग्रेसही सावध झाली आहे. दोन्ही कॉंग्रेसने ही निवडणूक गांभीर्याने घेण्याचे ठरविल्याचे सध्याचे चित्र आहे. राष्ट्रवादीची वाताहत झाल्यामुळे नेते गंभीर आहेत. शिराळा तालुक्‍यात दोन्ही कॉंग्रेसची नेहमीची युती आहे. आटपाडी, खानापुरात त्यांची पुनरावृत्तीची शक्‍यता निर्माण झालेली आहे. 

भाजपला शहरी भागात चांगले यश मिळाले. झेडपीसाठीही काही जिल्ह्यात भाजपात प्रवेशासाठी रांगा लागल्याचे चित्र आहे. सांगली जिल्ह्यात मात्र एक-दोन प्रवेश वगळता परिस्थिती शांत आहे. उलट कॉंग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या जास्त आहे. निवडून येण्याची क्षमता असणाऱ्यांनाच उमेदवारी ही सर्वच पक्षांचे धोरण आहे. अगदी राखीव जागांवरही तशीच परिस्थिती आहे. भाजपची राज्य सरकारमध्ये असणाऱ्या मित्र पक्षांना सोबत घेण्याची भूमिका आहे. 

कार्यकर्ते एकत्र येण्याच्या मनःस्थितीत 
स्थानिक स्वराज्य संस्थांत एकदा का भाजप शिरले तर पुन्हा येथून त्यांना हाकलणे शक्‍य नाही, याच भीतीने दोन्ही कॉंग्रेसमधील कार्यकर्ते एकत्र येत आहेत. नेते एकत्र येवोत न येवोत, काही तालुक्‍यातील कार्यकर्त्यांनी मात्र एकत्र येण्याचा निर्णय होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com