लॉकडाउनच्या पूर्वसंध्येला सांगलीकरांचा मटण-चिकणवर ताव 

घनश्‍याम नवाथे
Monday, 20 July 2020

आषाढ महिन्याची सांगता म्हणजेच आकाडी साजरी करण्यासाठी सांगली शहरातील तसेच उपनगरातील मटण आणि चिकन सेंटरवर काही प्रमाणात गर्दी झाली होती.

सांगली : आषाढ महिन्याची सांगता म्हणजेच आकाडी साजरी करण्यासाठी सांगली शहरातील तसेच उपनगरातील मटण आणि चिकन सेंटरवर काही प्रमाणात गर्दी झाली होती. "कोरोना' चे सावट असल्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत मटण व चिकन खरेदी करण्यात आली.

"लॉकडाउन' च्या काळात मटण-चिकनचे दर वाढले. परंतू आठवड्यापासून दरात थोडी घसरण झाल्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. तरीही अनेकांनी जादा दराने विक्री करत फायदा घेतला. आषाढ महिना संपत आला, की आकाडीचे वेध लागतात. श्रावणात मांसाहार वर्ज्य करण्याची अनेक कुटुंबात परंपरा आहे. आकाडी धडाक्‍यात साजरी केली जाते. यंदा आकाडी साजरी करण्यावर कोरोनाचे सावट होते. त्याचा थोडासा परिणाम जाणवत आहे. शहरातील मटण विक्री करणाऱ्या दुकानांसमोर नेहमी आकाडीला जी गर्दी होते, तेवढी गर्दी नव्हती. ठराविक दुकानांसमोर मात्र गर्दी होती. ठराविक अंतर ठेवून अनेकांनी खरेदी केली. मटण दराबाबत आठवड्यापासून ग्राहकांमध्ये संभ्रम आहे. 

आज अनेक ठिकाणी विक्रेत्यांनी 620 रूपये किलो दराने विक्री केली. तर इतरत्र 500 ते 600 रूपये किलोपर्यंत दर होता. मटण दरातील वाढीचा थोडासा परिणाम उलाढालीवर जाणवला. 

लॉकडाउनमध्ये मटण दराबरोबर चिकनचा दर 250 रूपयेपर्यंत गेला होता. दोन आठवड्यापासून त्यात घसरण झाली आहे. श्रावण महिना सुरू होणार असल्यामुळे आवक मर्यादीत झाली आहे. चिकनचा दर सध्या 180 ते 200 रूपये किलोपर्यंत झाला आहे. मटण दरवाढीमुळे अनेकांनी चिकनला पसंती दिली. त्यामुळे चिकन सेंटरसमोर नेहमीपेक्षा जास्त गर्दी दिसून आली. रविवारी सुटीच्या दिवशी मांसाहाराचा बेत अनेक कुटुंबात आखला जातो. तशात आज आकाडीचा आल्यामुळे दोन्हीचा मुहूर्त अनेकांनी साधला. 

मासळीही तेजीत 
मासळीचे दर सध्या तेजीत आहेत. शंभर ते सातशे रूपये किलोपर्यंत दर आहेत. त्यामुळे मासळी बाजारात फारसी गर्दी नव्हती. मासळीऐवजी मटण व चिकनला पसंती दिल्याचे दिसले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sanglikar's fever on mutton-clay