सांगलीच्या चिमुकल्या उर्वी पाटीलचा विक्रम 

शेखर जोशी
बुधवार, 16 मे 2018

 हिमालयातील शिवालिक रेंजमधील उणे आठ अंश सेल्सिअस तापमान आणि ताशी 30 ते 40 कि.मी. वेगाने वाहणारे वारे, तितक्‍याच वेगाची बर्फवृष्टी, वीजांचा कडकडाट अशा वातावरणात 13 हजार 800 फुटावरील काळाकुट्ट परिसरातील 'सरपास' शिखर अवघ्या दहा वर्षाच्या उर्वी पाटीलने सर केले.

सांगली (कवठेमहांकाळ) -  हिमालयातील शिवालिक रेंजमधील उणे आठ अंश सेल्सिअस तापमान आणि ताशी 30 ते 40 कि.मी. वेगाने वाहणारे वारे, तितक्‍याच वेगाची बर्फवृष्टी, वीजांचा कडकडाट अशा वातावरणात 13 हजार 800 फुटावरील काळाकुट्ट परिसरातील 'सरपास' शिखर अवघ्या दहा वर्षाच्या उर्वी पाटीलने सर केले.

उर्वीचे मुळ गाव खरशिंग (ता.कवठेमहांकाळ) असून सध्या ती गोव्यात वास्तव्यास आहे. एवढया लहान वयात 'सरपास' सर करणारी ती पहिली महाराष्ट्रीयन मुलगी आहे. उर्वीने नवी दिल्लीतील महाराष्ट्र परिचय केंद्रास भेट देऊन विक्रमाविषयी माहिती सांगितली. 'सरपास' ट्रेकची सुरुवात हिमाचल प्रदेशातील कसोल बेस कँपवरून 4 मे रोजी झाली. पहिले तीन दिवस वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी छोटे छोटे ट्रेक केले. 7 मे पासून प्रत्यक्ष ट्रेकला सुरुवात झाली. कसोल 6 हजार 500 फुटावरचा बेस कॅंप आहे. 

नगारु ते बिस्करी दरम्यान सरपास हे 13 हजार 800 फुटांवरील शिखर आहे. ते ट्रेकींगसाठी अत्यंत अवघड आहे. साधारणपणे 14 कि.मी. चा संपूर्ण बर्फातला प्रवास अत्यंत धोकादायक आहे. मुख्य शिखर सर करण्याची सुरुवात मध्यरात्रीनंतर दोन वाजता झाली. चहा, गरम पाणी, गुळ व फुटाणे असा अल्पोपहार घेत तिने ट्रेकींगला सुरुवात केली. तेव्हा अचानक बर्फवृष्टी झाली. अशाही परिस्थितीत ट्रेक करण्याची सूचना कँप लिडरने दिली. 200 मिटरच्या अत्यंत अवघड चढाईनंतर 'सरपास' च्या पठाराला सुरुवात झाली. 14 मे 2018 तिने 'सरपास' सर केले. हा आनंद तिच्यासाठी मोठा होता. 

'सरपास' शिखराच्या ट्रेकींगसाठी युथ होस्टेल अशोसेशियन ऑफ इंडिया या संस्थेने वयोमर्यादा 15 वर्ष ठेवली आहे. परंतू मी 10 वर्षाची असल्याने संधी नव्हती. तरीही जिद्द ठेवली. वडीलांनी संमतीपत्र दिल्यानंतर परवानगी मिळाली. आता जगातील सर्वात अवघड एवरेस्ट शिखर सर करण्याच्या दिशेने पहिले पाऊल म्हणून एवरेस्ट बेस कँप करण्याचे ध्येय असल्याचे उर्वीने यावेळी सांगितले.

Web Title: sanglis urvi patil treking sarpas