Sangola News : जलजीवन मिशन अंतर्गत झालेल्या कामातील भ्रष्टाचाराची चौकशी करावी; शेतकरी कामगार पक्षाची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sangola Corruption in work under Jaljeevan Mission should investigated Farmers Labor Party demand politics

Sangola News : जलजीवन मिशन अंतर्गत झालेल्या कामातील भ्रष्टाचाराची चौकशी करावी; शेतकरी कामगार पक्षाची मागणी

सांगोला : सांगोला तालुक्यात जलजीवन मिशन अंतर्गत कामात मोठा गैरप्रकार झाला आहे. हा राजकीय मुद्दा नसून सर्वसामान्यांचा पाण्याच्या बाबतीतील विषय आहे. या भ्रष्टाचार प्रकरणी पाठीशी घालणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांना निलंबित करावे अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाने पत्रकार परिषदेत केली.

सांगोला तालुक्यात जल जीवन मिशनच्या कामात कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाला आहे. या कामांमध्ये कायद्यामध्ये तरतूद नसताना जिओ टॅन्गींग अट घालण्यात आली, निवेदनामध्ये स्पर्धा होऊ दिली नाही, कमी दराने आलेल्या पात्र निवेद अपात्र केल्या, संस्था क्षमतेची मर्यादा मान्य करून भ्रष्टाचारांच्या साखळीतील कामे दिली, शासन निर्णयानुसार दहा टक्के लोकवर्गणी भरणे अनिवार्य असताना न भरता ठेकेदारांना वर्कऑर्डर दिल्या, पाईप न आणताच 85 टक्के बिले अदा केले, सरपंच ग्रामसेवकाच्या रजिस्टर पाहणी न करता खोटी खरेदी पाईप दाखवून खोटी बिले आदा केल्या आहेत.

तालुक्यातील लक्ष्मीनगर, कटफळ, वाटंबरे, ववाणीचिंचाळे, मांजरी, धायटी, एखतपुर अचकदानी या गावांमध्ये अंदाजे चार कोटी रुपयांची जलजीवन मिशन योजनेची कामे न करता बिले अदा करून गैरप्रकार केला आहे. या पत्रकार परिषद करण्यात आल्या. जल जीवनमध्ये झालेल्या अनियमिततेची चौकशी करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी चौकशी समिती गठीत केली आहे. समिती त्या त्या गावात जाऊन पाहणी करणार आहे.

दरम्यान जल जीवन मिशनच्या कामात कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाला असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून कार्यकारी अभियंता दीपक कोळी, उपअभियंता सुरेश कमळे व साईट सुपरवायझर अमर कोळी यांना निलंबित करावे अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाने पत्रकार परिषदेत केली. या पत्रकार परिषदेला बाबासाहेब कारंडे, माजी सभापती बाळासाहेब काटकर, माजी उपसभापती संतोष देवकते, हणमंत कोळवले, डॉ. दादा जगताप, अमोल खरात आदी उपस्थित होते.

माजी आमदार दीपक साळुंखे-पाटीलांची मागितली माफी -

शेकापचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार स्व. गणपतराव देशमुख यांच्या अंत्यविधीच्यावेळी माजी आमदार दीपक साळुंखे - पाटील श्रद्धांजली वाहण्यासाठी उभे राहिले असता काही जणांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला होता. तब्बल दीड वर्षानंतर रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेत शेकापचे राज्य चिटणीस मंडळाचे सदस्य, माजी जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब करांडे यांनी या प्रकाराबद्दल दीपक साळुंखे - पाटलांची माफी मागितली. भ्रष्टाचार प्रकरणी झालेली पत्रकार परिषद साळुंखे - पाटलांच्या माफीमुळे चर्चेत राहिली.