‘एकला चलो रे’ म्हणत तो खड्डे बुजवतोय

‘एकला चलो रे’ म्हणत तो खड्डे बुजवतोय

तासगाव - तासगाव ते जरंडी पत्रा या राज्यमार्गावरील सावर्डे फाटा ते कौलगे या रस्त्याचा भाग इतका खराब झाला आहे, की या रस्त्यावरून दुचाकी चालवणेही मुश्‍कील झाले आहे. या रस्त्यावरील खड्डे बुजवण्याची मागणी करूनही खड्डे भरले जात नसल्याने लोढे (ता. तासगाव) येथील संजय चव्हाण या युवकाने एकाकी श्रमदान सुरू करीत खड्डे भरणे आणि धोकादायक वळणावरील झुडपे तोडणे सुरू केले आहे.

पंधरा दिवस तो दररोज तो एकटा श्रमदान करीत आहे. त्याचे हे काम ढिम्म प्रशासनाला कानशिलात लगावत आहे. मात्र निबर यंत्रणा अजूनही हलत नाही, हे दुर्दैव. 

चिंचणीपासून पुढे सावर्डे फाटा ते कौलगे रस्ता धोकादायक बनला आहे. रस्त्यावर मोठे खड्डे पडलेत. पाईपलाईनच्या चरी, आधीच अरुंद रस्त्याच्या दुतर्फा  वाढलेली झुडपे, खचलेल्या साईडपट्टयामुळे रस्त्यावरून केवळ एस. टी. बस, ट्रक, ट्रॅक्‍टर जाऊ शकतात. रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. वास्तविक अधूनमधून कधीतरी रस्त्याची देखभाल दुरुस्ती होणे अपेक्षित होते. या रस्त्याकडे ना मैल कुली फिरकला ना सरकारी अधिकारी.

लोढे येथील संजय चव्हाण या युवकाने स्वतःच श्रमदान करीत खड्डे भरण्यास  सुरवात केली. आतापर्यंत ४०-५० खड्डे मुरूम, मातीने भरून वळणावर आडवी येणारी झुडपे तोडली आहेत.  रस्ता किमान सुरक्षित करण्याचा प्रयत्न त्याने चिकाटीने सुरू ठेवला आहे. या चिकाटीला कोणी तरी हात द्यावा, मदत करावी ही त्याची अपेक्षा नाही. पण कोणी तरी मदतीला यावे ही अपेक्षा जा-ये करणारे व्यक्त करीत आहेत.

गाडी चालवणारास सुखरूप घरी पोहोचू की नाही याबद्दल भीती वाटते इतकी वाईट  अवस्था रस्त्याची झाली आहे. सामाजिक जबाबदारी म्हणून दररोज श्रमदान करतोय.
- संजय चव्हाण,
लोढे  

या राज्यमार्गाच्या दुरुस्तीची निविदा प्रक्रिया सुरू आहे. ३ कोटी खर्च  करून कौलगे ते चिंचणी १० कि.मी.चा रस्ता  डांबरीकरण करण्यात येणार आहे.
-संजय पाटील,
उपअभियंता, 
सार्वजनिक बांधकाम विभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com